खेडेगावातून थेट ऑक्सफर्ड ते पुन्हा भारतात, वयाच्या 27 व्या वर्षी बनली IPS

ips ilma afroj
ips ilma afroj

लखनऊ - एका लहानशा गावातून स्वप्नांची भरारी घेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी गाठली. त्यानंतर तिला न्यूयॉर्कमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफरही मिळाली होती. मात्र तिने ती ऑफर नाकारून पुन्हा गाव गाठलं. गावासाठी, आपल्या मातीसाठी, देशासाठी काहीतरी करायला हवं या भावनेनं तिने परदेशातून भारतात येण्याचा निर्णय घेतला. उत्तरप्रदेशातील मुरादाबादमध्ये असलेल्या कुंदरकी नावाच्या गावातील इल्मा अफरोजची ही कहाणी. आज ती आयपीएस अधिकारी आहे. तिच्या या गावाचे नावही तसे ऐकिवात नसलेलं. पण इल्मामुळे ते चर्चेत आलं. शिक्षणासाठी संघर्ष केल्यानंतर मेहनतीने ऑक्सफर्डपर्यंत झेप घेतली पण देशाची सेवा करायची म्हणून तिथलं अलिशान जीवनही तिने नाकारलं.

इल्मा आणि तिचे कुटुंबिय मजेत राहत होते. पण अचानक इल्मा 14 वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. घरच्या प्रमुखाचेच निधन झाल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. इल्माच्या आईला अनेकांनी तेव्हा मुलीच्या शिक्षणावर पैसे खर्च न करण्याचा सल्ला दिला होता. त्यापेक्षा लग्न लावून द्या म्हणजे तेवढं ओझं कमी होईल असंही सागितलं होतं. पण कोणाचेही न ऐकता इल्माच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. इल्मानेही तिच्या शिक्षणात कोणतीच कमतरता ठेवली नाही. 

कुटुंबाच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असलेली इल्मा वर्गात पहिल्या क्रमांकाने पास व्हायची. अभ्यास करून तिने स्कॉलरशिप मिळवली. त्यानंतर उच्चशिक्षण स्कॉलरशिपच्या माध्यमातून पूर्ण केलं. 
कुंदरकीसारख्या गावातून इल्मा दिल्लीतील सेंट स्टीफेन्समध्ये शिक्षणासाठी आली. याठिकाणी घालवलेला वेळ आयुष्यातील सर्वात चांगला वेळ असल्याचं इल्माने म्हटलं आहे. इल्माला दिल्लीला पाठवलं तेव्हाही लोकांनी तिच्या आईला खूप काही ऐकवलं. स्टीफेन्सनंतर इल्माला मास्टर्स करण्यासाठी ऑक्सफर्डला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा पुन्हा एकदा तिच्या नातेवाईकांसह शेजाऱ्यांनी बरं वाईट ऐकवलं. ते असंही म्हणाले की आता ती परत येणारच नाही. 

घरचे लोक वगळता इतर सर्वांनी तिच्या शिक्षणाला विरोध केला. इल्मा परदेशात गेल्यानंतर तिच्या आईला नातेवाईक सतत टोचत रहायचे. इल्माने परदेशातील लहान मुलांची ट्युशन घेऊन, लहान मुलांची देखभाल करण्याची कामे करत शिक्षण पूर्ण केलं. सेंट स्टीफेन्समधून शिक्षण झाल्यानंतर उच्चशिक्षणासाठी आपण परदेशात आलोय आणि अशी कामे करायची का असा प्रश्नही कधी तिला पडला नाही. एका प्रोग्रॅमच्या निमित्ताने न्यूयॉर्कला गेली असताना तिला नोकरीची ऑफर मिळाली. तिला वाटलं असतं तर ऑफर स्वीकारून सहज परदेशात स्थायिक होता आलं असतं. पण इल्माने देशात परत येऊन इथल्या लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. 

न्यूयॉर्कहून परतल्यानंतर इल्माला तिच्या भावाने युपीएससीसाठी प्रेरणा दिली. इल्मा एका मुलाखतीत म्हणाली होती की, जेव्हा मी गावी यायचे तेव्हा लोकांच्या डोळ्यात वेगळाच आनंद असायचा. मुलगी परदेशातून आलीय आता गावाच्या अडचणी दूर करेल. लोकांच्या अडचणी सोडवताना तिला युपीएससी करून अशा लोकांची सेवा करता येईल असं मनात आलं.

इल्माने अभ्यास सुरू केला आणि 2017 मध्ये ती युपीएससी पास झाली. वयाच्या 26 व्या वर्षी युपीएससीमध्ये उत्तीर्ण होत तिने देशात 217 वी रँक मिळवली होती. जेव्हा सर्व्हिस निवडण्याची वेळ आली तेव्ही इल्माने आयपीएस व्हायचं ठरवलं. बोर्डाने विचारलं की आयएफएस का नाही. त्यावर इल्मा म्हणाली की, मला गावातील, तळागाळातील लोकांसाठी काम करायचं आहे. देशातील लोकांची सेवा करायची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com