Success Story : जिद्द असावी तर अशी! अंथरुणाला खिळलेल्या पवनकुमारनं 'या' परीक्षेत मिळवलं घवघवीत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Success story PawanKumar Kadam

अपघात व उपचारामुळे पवनकुमारच्या शिक्षणात एक वर्ष खंड पडला. मात्र, जिद्द हरला नाही.

Success Story : जिद्द असावी तर अशी! अंथरुणाला खिळलेल्या पवनकुमारनं 'या' परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

दहिवडी : ६ जून २०१६... वेळ रात्री ११ वाजताची... विजेच्या लखलखाटासह भयानक वादळी पाऊस... वादळाने होत्याचे नव्हते केले... शेतात वस्तीला असणारे कच्च्या बांधकामाचे घर कोसळले नाही तर अख्खे एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. ही दुर्दैवी घटना गाढ झोपी गेलेल्या चिमुरड्याला कायमचं अपंगत्व देऊन गेली.

गेली आठ वर्षे अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेतील या मुलाने अपंगत्वावर मात करत यंदा बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले अन् आईवडिलांच्या डोळ्यांत कित्येक वर्षांनंतर आनंदाश्रू तरळले.

संजय व शुभांगी कदम हे शेतकरी दांपत्य आपल्या सूरज व पवनकुमार (Pawankumar Kadam) या दोन मुलांसह परकंदी (ता. माण) येथील कदम वस्तीत राहते. सूरजने दहावीची परीक्षा दिलेली असताना व पवनकुमार सहावी पास झाला असताना ६ जून २०१६ ची ती काळरात्र आली. रात्री दहाच्या सुमारास झोपण्याची तयारी सुरू असतानाच सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसास सुरुवात झाली. पवनकुमार हा गाढ झोपी गेला होता तर इतर तिघेजण जागेच होते.

संजय कदम यांना परिस्थितीचा रागरंग वेगळाच जाणवत होता आणि अचानक काही कळण्याच्या आत दुपाकी घरावरील पत्र्यासह घराच्या आडव्या सलग तीन भिंती कोसळल्या. यात पवनकुमार भिंती खाली गाडला गेला तर कदम दांपत्य गंभीर जखमी झाले. या भयावह परिस्थितीत सैरभैर झालेला सूरज तिथून तडक अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या बाळासाहेब कदम यांच्या घरी गेला. तर इकडे आपल्या जखमा विसरून संजय हा पत्नी व मुलाला दुचाकीवर घेऊन निघाला.

बाळासाहेब कदमांनी तत्काळ या चौघांना चारचारकीतून दहिवडीला हलविले. प्राथमिक उपचार करून नंतर सातारा येथे नेले. तिथे डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यावर पवनकुमारला पुणे येथे नेण्यात आले. पुण्यात सहा ते सात महिने दवाखान्यात उपचार केल्यानंतर परत दीड ते दोन वर्षे येऊन-जाऊन उपचार घेतले. त्यानंतर जे शक्य होतील ते उपचार पवनकुमारवर करण्यात आले. मात्र, लाखो रुपये खर्च करूनसुद्धा मज्जारज्जूवर आघात झाल्याने त्याला पंच्याहत्तर टक्के अपंगत्‍व आले. तो उभा राहू शकत नाही, चालू शकत नाही तसेच उजवा हात पूर्ण तर डावा हात पन्नास टक्के निकामी झाला.

अपघात व उपचारामुळे पवनकुमारच्या शिक्षणात एक वर्ष खंड पडला. मात्र, जिद्द हरला नाही. मलवडीच्या त्रिंबकराव काळे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कोविड काळात तो दहावी पास झाला. अंथरुणावर खिळलेल्या अवस्थेत त्याने अकरावी व बारावीचा अभ्यास केला. लेखनिकेच्या मदतीने त्याने बारावीची परीक्षा दिली. नुकताच या परीक्षेचा निकाल लागला. ६३ टक्के गुण मिळवून पवनकुमार उत्तीर्ण झाल्याचे समजताच कदम कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही. पवनकुमारचे शिक्षक, मित्र यांनी घरी जाऊन त्याचे अभिनंदन केले.

मला अजून शिकायचं आहे; पण परिस्थिती अडथळा ठरत आहे. मी बरा झालो तर मलाही सन्मानजनक आयुष्य जगता येईल.

- पवनकुमार कदम

माझ्या लेकरानं पहिल्यासारखं परत एकदा चालावं, पळावं अन् शिकून मोठं व्हावं, हेच माझं देवाकडं मागणं आहे.

- शुभांगी कदम, पवनकुमारची आई.

पवनकुमारवर अजून उपचार करण्याची आमची मानसिकता आहे; पण यासंबंधीचे तज्ज्ञ डॉक्टर तसेच उपचाराबद्दल आम्हाला माहिती नाही. तसं कोणी असेल तर आम्हाला माहिती द्या. कमीत कमी कुबड्यांच्या साह्याने तरी तो चालावा, अशी आमची अपेक्षा आहे.

- बाळासाहेब कदम, माजी सरपंच परकंदी.