Success Story: 'मुस्लिमांसाठी ही आहे रोल मॉडेल'; मुख्यमंत्री योगींनीही केलं कौतुक!

टीम ई-सकाळ
Saturday, 28 November 2020

तिनं ज्या दिवशी शाहजहापूर येथे नोकरी जॉईन केली त्याच्या दुसऱ्याच दिवशी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला आणि तिला ४९९ वी रँक मिळाली.  

UPSC Success Story: गोरखपूर (उत्तर प्रदेश) : जिथं पोहचण्याचं कित्येकांचं स्वप्न आहे, ते आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवत ऐमान जमाल ही तरुणांसाठी आदर्श ठरली आहे. खास करून मुस्लीम तरुणींसाठी रोल मॉडेल बनली आहे. मुस्लीम समाजातील तरुणींनी ऐमानकडून प्रेरणा घ्यावी, असं खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. 

ऐमानच्या या यशाबद्दल मुख्यमंत्री योगी यांनी तिची गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिरात भेट घेऊन तिचं अभिनंदन केलं आणि समाज सुधारण्यासाठी सक्रिय योगदान देण्याची विनंतीही केली. 

SSB Recruitment 2020: सशस्त्र सीमा बलमध्ये १५२२ जागांची 'मेगा भरती'!​

ऐमानला हायस्कूलमध्ये ६३% गुण मिळाले होते, पण यूपीएससी २०१८ची परीक्षा क्रॅक करत आज ती प्रतिष्ठित अशा भारतीय पोलिस सेवेत कार्यरत आहे. यापूर्वी तिची बिहार लोकसेवा आयोगात महसूल अधिकारी म्हणून निवड झाली होती, पण तो जॉब जॉइन करण्यापेक्षा तिनं यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले. 

गोरखपूरच्या मोहल्ला खुनीपूरमध्ये राहणारी ऐमन आयपीएस होण्यापूर्वी शाहजहापूर येथे कामगार कल्याण उपआयुक्त म्हणून कार्यरत होती. तिनं ज्या दिवशी शाहजहापूर येथे नोकरी जॉईन केली त्याच्या दुसऱ्याच दिवशी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला आणि तिला ४९९ वी रँक मिळाली.  

Success Story: घर-शेतजमीन गहाण ठेवली, मित्रांनी केला खर्च, पण पठ्ठ्या IAS झालाच!​ 

कार्मेल गर्ल्स इंटर कॉलेजमध्ये ऐमानने प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. २००४ साली उच्च माध्यमिकमध्ये ६४ टक्के, तर २००६ मध्ये ६९ टक्के मिळवत इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण झाली. सेंट अँड्र्यूज कॉलेजमधून २०१० मध्ये प्राणीशास्त्र विषयाची पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. तर २०१६मध्ये अण्णामलाई विद्यापीठातून मानव संसाधनचा डिप्लोमा केला. जामिया इस्लामिया विश्वविद्यालय नवी दिल्ली आणि जामिया हमदर्द या अल्पसंख्यांकासाठी चालविल्या जाणाऱ्या संस्थेत राहून २ वर्षे यूपीएससीची तयारी केली. ते करत असताना २०१७मध्ये तिची केंद्रीय कामगार विभागात निवड झाली. आणि २०१८मध्ये तिची शाहजहांपूर येथे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Positive Story: IIT पासआउट पोरीनं सोडली २२ लाखाची नोकरी अन् करु लागली सेंद्रिय शेती!​

ऐमानने प्रीलिम्स आणि मेन्ससाठी जीएसवर सर्वाधिक जोर दिला होता. या व्यतिरिक्त वेळेचं योग्य व्यवस्थापन आणि अचूक रणनीती हा यशाचा मार्ग सुकर करतात. धैर्य आणि योग्य मार्गदर्शनाद्वारेच यश मिळते, असं ऐमानचं म्हणणं आहे. तिचे वडील हसन जमाल हे व्यावसायिक आहेत, तर आणि अफरोज बानो या शिक्षिका आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटल्यानंतर ऐमान म्हणाली, मी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना इतकं जवळून पाहिले आणि भेटले आहे. त्यांनी अत्यंत विनयशीलपणे माझ्याशी संवाद साधला. तू मुस्लिम मुलींसाठी आदर्श असून अल्पसंख्यांक समाजातील इतर मुलींना तू उच्च शिक्षणासाठी प्रेरणा द्यावी, असं योगींनी विनंती केली."

- एज्युकेशनसंबंधी इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UPSC Success story Eman Jamal muslim girl became IPS