मॅकेनिकल इंजिनियरिंग क्षेत्रात 'या' आहेत मोठ्या संधी...

मॅकेनिकल इंजिनियरिंग क्षेत्रात 'या' आहेत मोठ्या संधी...

यंत्र अभियांत्रिकीच्या म्हणजेच मॅकेनिकल इंजिनियरिंगच्या विस्तारित कक्षा कोणत्या आहेत आणि या क्षेत्रात भविष्यातील किती मोठ्या संधी आहेत, हे जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख...

यंत्र (मेकॅनिकल) अभियांत्रिकी ही अभियांत्रिकीच्या मूळ शाखांपैकी एक आहे. या शाखेचा विस्तार खूप  मोठा आहे. रचना (डिझाइन) अभियांत्रिकी, उत्पादन (प्रोडक्शन) अभियांत्रिकी, औद्योगिक (इंडस्ट्रियल) अभियांत्रिकी, साहित्य (मटेरियल्स) अभियांत्रिकी, औष्णिक (थर्मल) अभियांत्रिकी, अभियांत्रिकी व्यवस्थापन (मॅनेजमेन्ट) आणि स्वयंचलित (ऑटोमोबाईल) अभियांत्रिकी इत्यादी उपशाखा सर्वश्रुत आहेत. जगातल्या प्रत्येक वस्तूच्या निर्मितीशी निगडित असल्यामुळे यंत्र अभियांत्रिकीचा संबंध इतर प्रत्येक अभियांत्रिकी शाखेशी येतोच.

जिथे जिथे उत्पादन आणि निर्मिती तिथे तिथे यंत्र अभियंता असे जणू समीकरणच आहे. रचना, निर्मिती आणि वितरण ही त्रिसूत्री असल्याने हि शाखा अत्यंत प्रयोगशील आहे. बाजारपेठेत येणाऱ्या प्रत्येक नवीन उत्पादनामागे यंत्र अभियंत्याची ग्राहकाभिमुख कल्पना, सर्जनशीलता आणि कार्यकुशलता असते. तंत्रज्ञानातील प्रगती, ग्राहकांच्या बदलत्या आवडी निवडी आणि बाजारपेठेतील मागणी यानुसार या शाखेचा विस्तार होत आहे आणि तिच्या कक्षा रुंदावत आहेत. अशाच काही नवीन क्षेत्रांचा आणि त्यातील नौकरीच्या संधींचा आपण उहापोह  करूयात. त्रिमिती मुद्रण (3डी प्रिंटिंग वा अॅडिटीव्ह  मॅन्युफॅक्टरिंग) ही अत्यंत नाविन्यपूर्ण उत्पादन प्रक्रिया आहे. याद्वारे अत्यंत क्लिष्ट आकाराच्या वस्तू निर्माण करतात. या प्रक्रियेत कुठल्याही साहित्याचा अपव्यय होत नाही. ही उत्पादन प्रकिया आता प्रत्येक क्षेत्रात लागू होत आहे आणि यासाठी मुबलक मनुष्यबळाची भविष्यात अत्यंत गरज आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसरे महत्वाचे क्षेत्र म्हणजे अत्यंत सूक्ष्म वस्तूंचे उत्पादन (मायक्रो मॅन्यूफॅक्टरिंग, लेझर कटिंग, ईडीएम, एसीएम). या सूक्ष्म वस्तू जसे की अनुविद्युत, यंत्रे, शस्त्रक्रियेची साधने यांचे सुटे भाग उत्पादित करताना अत्युच्च अचूकता अपेक्षित असते आणि ती या प्रक्रियांद्वारे साधता येते. या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. तिसरे महत्वाचे क्षेत्र म्हणचे यंत्रमानव (रोबोटिक्स) निर्मिती आणि उपयोग. यंत्र मानवाचा उपयोग आता उत्पादन क्षेत्रा बरोबरच, सरंक्षण, आरोग्यसेवा, धोकादायक कामे, अंतराळ अभ्यास, घरकाम इत्यादी क्षेत्रांमध्ये होत आहे. ज्या कामांमध्ये मानवाच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशी नवनवीन क्षेत्रे ओळखणे आणि त्या विशिष्ट कामांसाठी यंत्र मानवाची रचना करणे ही काळाची गरज आहे.  या क्षेत्रासाठी निष्णात मनुष्यबळाची गरज आहे. अत्यंत उदयोन्मुख क्षेत्र आहे, ते यंत्र अभियांत्रिकी आणि आरोग्यसेवा याचे एकत्रिकरण.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्यसेवेसाठी कमी खर्चात आधुनिक आणि नाविन्य पूर्ण उपकरणे उपलब्ध करून देणे हे एक आव्हान आहे. कोरोना व्हायरसच्या आक्रमणामुळे व्हेंटिलेटरची कमतरता अधोरेखित झाली आहे आणि बऱ्याच अभियंत्यांनी फार कमी वेळात त्याची निर्मिती हि केली आहे, यात पुण्यातल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या प्राध्यापकांचा ही समावेश आहे. आरोग्यसेवत प्रत्यारोपण क्षेत्रातही यंत्र अभियांत्रिकीचा प्रकर्षाने उपयोग होत आहे. रुग्णाच्या शरीराच्या गरजे प्रमाणे प्रत्यारोपण तयार करणे आणि त्याचा रुग्णाच्या शरीरावर होणाऱ्या प्रभावाचा आधीच अंदाज वर्तविणे याचा समावेश होतो. दंतशल्यचिकित्सा आणि हाडाशी संबंधित शस्त्रक्रियेमध्ये याचा वापर सुरू आहे.

इतर व्याधीसंबंधी संशोधनासाठी हुशार यंत्र अभियंत्याची गरज आहे. भारतातील आणि एकूणच जगभरातील आरोग्यसेवेचा वाढता विस्तार लक्षात घेता उपकरणांची निर्मिती, त्यांची निगा राखणे तसेच या आस्थापणातील शीतगृहे आणि वातानुकूलित यंत्रणा याची देखभाल कराण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. मूळ शाखा असल्यामुळे नौकरी, उद्योग व्यवसाय आणि संशोधनाच्या पुष्कळ संधी विद्याथ्यांना उपलब्ध आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतात आता स्वयंचलित अभियांत्रिकी क्षेत्र चांगलेच विस्तारले आहे. मुंबई, पुणे, नासिक, औरंगाबाद, चेन्नई, बेंगलोर, हैद्राबाद, गुरगाव, पिथमपूर या ठिकाणी भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय वाहन उत्पादक कारखाने आहेत.  टाटा मोटर्स, बजाज, हिरो, फोर्स मोटर्स, पियागो, मेर्सिडिझ बेंझ, होंडा, मारुती सुझुकी, वोक्सवागेन, महिंद्रा, मॅन ट्रक्स यामध्ये नेहमीच कुशल मनुष्य बळाची गरज हसते. तसेच व्हिडिओकॉन, एलजी, अल्फा लाव्हल, भारत फोर्ज, कमिन्स, हनिवेल, कल्याणी स्टील, किर्लोस्कर, थरमॅक्स, 'फोर्ब्स' मार्शल, केएसबी पंप, एसकेएफ बेअरिंग्स या कंपन्या तर पुण्यात आहेत. या कंपन्यांना लागणारे सुटे भाग पुरविणारे हजारे लघु आणि मध्यम उद्योग पुण्यात आणि इतर शहरात आहेत. पुणे आता वाहनउद्योगाचे केंद्र (हब) म्हणून ओळखले जाते. ज्या यंत्र अभियंत्यांना संगणक प्रणालीमध्ये स्वारस्य आहे, त्यांना ही आता खूप संधी उपलब्ध आहेत. एनसिस, सिमेन्स, ऑलटेर,  थ्री डी सॉफ्टवेअर सोल्युशन्स, ऑटोडेस्क आदी प्रणाली निर्माते पुण्यात आणि देशात बंगलोर, हैदराबाद आणि चेन्नई येथे उपलब्ध आहेत. यंत्र अभियंत्याना राज्य व केंद्र शासनाच्या शासकीय सेवेत भरपूर संधी उपलब्ध आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महावितरण, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, परिवहन विभाग तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपरिषद आसथापनेवर यंत्र अभियंत्यांची गरज असते. केंद्र शासनाच्या रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जहाज बांधणी, तसेच तिन्ही सशस्त्र दले ह्यातही अनेक संधी उपलब्ध आहेत. 
ज्यांना संशोधना मध्ये रुची आहे त्यांच्यासाठी एचएएल, इस्रो, मेट्रो, डीआरडीओ आस्थापनांमध्ये संधी उपलब्ध आहेत. यंत्र अभियंत्यांना उद्योजक बनण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध सेवा सवलती जाहीर केलेल्या आहेत. यंत्र अभियंत्यांना भारतात नव्हेतर जगभरात नौकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. 

प्रवेशाविषयी...

पीसीएम ग्रुप घेऊन बारावी उत्तीर्ण झाल्यावर एमएचटी-सीईटी किंवा जेईई परीक्षेचा गुणांवर शासकीय तथा खाजगी महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, राज्य खाजगी विद्यापीठे यामध्ये प्रवेश घेता येतो. अभियांत्रिकीच्या या मूळ शाखेतील अमर्याद संधी विद्याथ्यांना खुणवीत आहेत.

- डॉ. गणेश मा. काकांडीकर (एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे येथे प्राध्यापक आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com