नोकरी करा ‘डोळस’पणे! 

विनोद बिडवाईक
Wednesday, 13 January 2021

आपण नोकरी करताना याचा किती विचार करतो, डोळसपणे या गोष्टी कितीदा समजून घेतो? वरील सर्व गोष्टी दुर्लक्षित करून काम केल्यास तुम्ही एक निव्वळ कर्मचारी क्रमांक असाल.

‘नोकरी ही लग्नाच्या बायकोसारखी असते! दुसरी चांगली दिसते, म्हणून पहिली सोडण्यात काहीच अर्थ नाही,’ हा पु. ल. देशपांडे यांच्या ‘असा मी असामी’ या पुस्तकातील संवाद खऱ्या आयुष्यात तंतोतंत लागू पडते. नोकरी कोणत्या परिस्थितीत सोडावी याबद्दल आपण पुढे चर्चा करूच, पण नोकरी टिकवून एखाद्या संस्थेत प्रगती कशी करावी याबद्दल आधी थोडे बोलूया. एकदा नोकरी मिळाल्यावर बहुतांश लोक आयुष्याची इतिश्री झाली, असे समजतात. आता नोकरी मिळाली, कायम झाल्याचे पत्र हातात पडले की संपले. आता संस्थेमध्ये आपली आपोआप प्रगती होईल, दर दोन-तीन वर्षांनी बढती मिळेल, दरवर्षी पगारवाढ तर मिळणारच आहे, असे आडाखे बांधून आपण नोकरीला सुरुवात करतो. या अपेक्षा वाजवी आहेत, परंतु जग एवढे सरळ नसते. सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते, संस्थेला समजून घेणे. आठ तास काम करणे, वरिष्ठाने  सांगितलेले करणे, फारसे प्रश्न न विचारात रट्टा मारावा यापद्धतीने काम केल्यास फारसे काही हातात पडत नाही. प्रत्येक संस्थेचा स्वतःचा असा स्वभाव असतो. सर्वप्रथम ही कार्यसंस्कृती समजून घेणे महत्त्वाचे आहे. कार्यसंस्कृतीमध्ये खालील भाग येतात. 

१) संस्थेची मूल्यप्रणाली : संस्थेचे ठरवलेले, लिखित अथवा अलिखित नियम असतात. संस्थेतील निर्णय घेणारे वरिष्ठ जसे वागतात, तसेच सर्वजण वागतात. उदा. काही संस्थांमध्ये चुरुचुरु बोलणारी माणसे लवकर ओळखून त्यांना प्रगतीच्या संधी दिल्या जातात, तर काही संस्थांमध्ये अशांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे संस्थेमध्ये रुजू झाल्याबरोबर सर्वप्रथम संस्थेच्या मूल्ये समजून घेणे महत्त्वाचे ठरते. 

हेही वाचा : नोकरी टिकवायची कशी?

२) कर्मचाऱ्यांमधील संबंध आणि कार्यपद्धती : वरीलप्रमाणे मूल्ये कर्मचाऱ्याचे वर्तन ठरवते. उदा. काही संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांनी एकमेकांसोबत आदराने बोलावे असे गृहीत धरल्या जाते, तर काही संस्थामध्ये कर्मचाऱ्यांचा अनादर हा कामाचा भाग असतो. 

३) संस्थेतील वेगवेगळी सत्ताकेंद्रे : तुमचा बॉस सत्ताकेंद्र असेलच असे नाही, त्याच्या हातात तुमच्या बद्दलचे निर्णय असतीलच असे नाही. त्यामुळे संस्थेत कर्मचाऱ्याबद्दलचे निर्णय कोणत्या स्तरावर होतात, कसे होतात हे समजावून घेणे गरजेचे ठरते. 

४) संस्थेतील राजकारण आणि त्याचा केंद्रबिंदू : राजकारण हा मानवी स्वभावाचा स्थायी गुणधर्म आहे! त्यामुळे तुम्ही राजकारण विरहित राहू शकत नाही. तसेच, संस्थेतील राजकारण हे वाईटच असते असेही नाही. त्यामुळे संस्थेमधील वरिष्ठांचे एकमेकांसोबत कसे संबंध आहेत आणि त्यात आपली भूमिका काय असावी हे ठरवणे सुद्धा महत्त्वाचे ठरते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपण नोकरी करताना याचा किती विचार करतो, डोळसपणे या गोष्टी कितीदा समजून घेतो? वरील सर्व गोष्टी दुर्लक्षित करून काम केल्यास तुम्ही एक निव्वळ कर्मचारी क्रमांक असाल. वरील गोष्टींकडे डोळसपणे बघणे आणि त्याचा उपयोग आपल्या करिअरसाठी करणे ज्याला जमेल तोच पुढे जाऊ शकेल. अर्थात, हे करत असताना स्वतःच्या स्वभावासोबत तडजोड करण्याची गरज नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vinod bidwaik article about jobs

Tags
टॉपिकस
Topic Tags: