esakal | साथीच्या रोगांना हरवेल एकत्र कुटुंबपद्धती !
sakal

बोलून बातमी शोधा

Joint Family

साथीच्या रोगांना हरवेल एकत्र कुटुंबपद्धती !

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

मनुष्याला स्वतःची ताकद माहिती असते, त्याला त्याच्यात असलेल्या उणिवा माहिती असतात, त्यातून काही अंशी भीती तयार होत असते. पण एकूण एका ठिकाणी एकाहून अधिक व्यक्ती असल्या तर भीती न वाटणे साहजिक आहे.

भीती कमी व्हायला लागली. कशामुळे? रोज किती लोक कोरोनाग्रस्त होतात किती कोरोनामुक्त होतात, किती मृत्युमुखी पडतात, या आकड्यांवरून का भीती ठरत असते? जोपर्यंत एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण होणार नाही तोपर्यंत भीती राहणारच. आपल्या जवळची एखादी व्यक्ती मृत्यू पावली तर अर्थातच भीती वाढू शकते, कारण ऐकीव बातम्यांपेक्षा आपल्या परिवारातच कोणाचा तरी मृत्यू झालेला असतो. एखादी स्त्री संध्याकाळच्या वेळी एकटी रस्त्यावरून जात असताना मागून मोटरसायकल वगैरे वाहनावरून आलेली व्यक्ती गळ्यातील साखळी ओढून तर नेणार नाही ना अशी भीती वाटणे साहजिकच असते. परंतु ५-६ मैत्रिणी मिळून फिरायला गेल्या तर फारशी भीती वाटत नाही. एकूण माणसाला एकटेपणाची भीती वाटत असते. मनुष्य इतरांना ओळखतो की नाही माहीत नाही, परंतु बऱ्याचवेळा मनुष्य स्वतःला मात्र बरोबर ओळखून असतो. मनुष्याला स्वतःची ताकद माहिती असते, त्याला त्याच्यात असलेल्या उणिवा माहिती असतात, त्यातून काही अंशी भीती तयार होत असते. पण एकूण एका ठिकाणी एकाहून अधिक व्यक्ती असल्या तर भीती न वाटणे साहजिक आहे. आपली उत्पादने विकली जावी यासाठी आधी लोकांच्या मनात भीती उत्पन्न करावी लागते असा व्यापारातील एक ठोकताळा असावा. म्हणून पूर्वापार चालत आलेली कुटुंबव्यवस्था मोडीत काढण्याचे षड्‌यंत्र कोणीतरी रचले असावे. मनुष्य एकटा- एकटा राहायला लागला, की प्रत्येकाच्या गरजा स्वतंत्रपणे भागवाव्या लागतात.

एका कुटुंबातील पाच व्यक्तींपैकी तीन मुले वेगवेगळ्या घरात राहायला लागली व आई वडील एका घरात राहायला लागले तर एकूण चार बिऱ्हाडे तयार झाल्यामुळे प्रत्येक घरात लागणाऱ्या सामानाची पूर्ती करण्याच्या दृष्टीने घरातल्या सामानाची खरेदीही चौपट होईल. मग यासाठी लागणारे पैसे मिळविण्यासाठी रात्रंदिवस काम करणे ओघाने आलेच. कुटुंबात पाच माणसे एकत्र राहत असताना कामाचीही विभागणी होते. विभक्त राहणाऱ्या घरांमध्ये ही विभागणी न झाल्यामुळे जेवणाची हयगय होते आणि सुरू होते नुसती पळापळ. एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे या महामारीच्या काळात लस घेण्यासाठी होणारी गर्दी किंवा हॉस्पिटलमध्ये भरती होण्यासाठी होणारी गर्दी, अशा प्रकारे गर्दी वाढत राहते आणि सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडल्याचे दिसते. पण करणार तरी काय?

एकत्र कुटुंबात रोग्याला घरातच एका खोलीत विलगीकरणात ठेवून इलाज होऊ शकतो. एकत्र कुटुंबातील कुणाला कोरोना झालाच तर इतर व्यक्ती मास्क लावून, विशेष काळजी घेऊन रोग्याची काळजी घेऊ शकतात. अशा कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा महामारीपायी मृत्यू झाला तरी पुढचे अंत्यविधी विशिष्ट प्रक्रियेखाली, मोजक्या मंडळीच्या उपस्थितीत का होईना, पण केले जाऊ शकतात. एका घरात एक अशा प्रकारे राहणाऱ्या कुणा व्यक्तीचा कोरोनासारख्या रोगाने मृत्यू झाला तर त्याची विल्हेवाट अत्यंत खालच्या पातळीवर लावली जाते, कारण अशा व्यक्तीची काळजी घेण्यासाठी कोणीच तयार नसते. त्यामुळे कुटुंबसंस्था फार महत्त्वाची आहे. एकत्र कुटुंबात सर्वांचे आरोग्य ठीक राहण्यासाठी एकमेकांना मदत करता येते. घरातील कुणाला थोडे अपचन झाले तर घरात स्वयंपाकघरात असलेल्या लिंबू, मीठ, आले, मध वगैरेंचा उपयोग करून काम होऊ शकते. मात्र व्यक्ती एकटी राहत असेल तर त्याला स्वतःकडे औषधांचा साठा करून ठेवावा लागतो. यामुळे खर्च वाढतो. साधे पाय दाबून घ्यावे असे वाटत असले किंवा पाय चोळून घ्यायचे असले तर प्रत्येक वेळी उपचारकेंद्रातून उपचारकाला बोलवणे शक्य नसते. परंतु एकत्र कुटुंबात घरातच कोणीतरी मदत करू शकतो, छोट्या-मोठ्या त्रासांवर उपचार करणे शक्य असते. क्वचित वादळ, पूर आल्यास घरात चार व्यक्ती असल्यास वेळ निभावून नेणे शक्य होते, परंतु घरात एकटी व्यक्ती असल्यास तिचे हाल होतात. नुसताच पैसे वाचविण्याचा मुद्दा नाही, तर एकत्र कुटुंबात अन्न चांगले मिळू शकेल, निदान आपल्या माणसांचा सहवास, प्रेम या गोष्टींचा लाभ मिळेल, एकलकोंडेपणामुळे येणारे बेताल वागणे व मनमानी थांबवता येईल. या महामारीची पुढची लाट येणार नाही किंवा या महामारीसारखी दुसरी महामारी येणार नाही याची कोणालाही खात्री देता येणार नाही, तेव्हा नुसती भीती घालविण्यासाठी नव्हे तर आज समाजात पुन्हा एकत्र कुटुंबपद्धती आणणे आवश्यक आहे.