रक्तदाबावर उपचार...

राहणीमान, आहार, आचरण, विचार, ऋतुमान यांचा आपल्या आरोग्यावर मोठा प्रभाव असतो.
Blood Pressure
Blood PressureSakal
Summary

राहणीमान, आहार, आचरण, विचार, ऋतुमान यांचा आपल्या आरोग्यावर मोठा प्रभाव असतो.

- डॉ. भाग्यश्री झोपे

राहणीमान, आहार, आचरण, विचार, ऋतुमान यांचा आपल्या आरोग्यावर मोठा प्रभाव असतो. आधुनिक जीवनशैलीमुळे यामध्ये जो फरक झाला त्याचा परिणाम म्हणून जे विकार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात त्यातील एक म्हणजे वाढलेला रक्तदाब. पूर्वी वाढत्या वयात कधीतरी पाहायला मिळणारा हा विकार सध्या घराघरांत जाऊन पोचला आहे असे म्हणणे वागवे ठरणार नाही. अगदी ३५- ४० वर्षांच्या तरुण व्यक्तीलाही रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे घ्यायची गरज सध्या असलेली दिसते. आज आपण रक्तदाबाची कारणे, तो होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी आणि वाढलेला रक्तदाब पुन्हा सामान्य होण्यासाठी करावयाचे उपचार यांची माहिती घेऊ. शरीरातील सर्वाधिक प्रमाणात गतिशील असणारे रस-रक्तधातू संपूर्ण शरीराला व्यापून असले तरी ते हृदय व हृदयातून उगम पावणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये बंदिस्त असतात.

अहोरात्र सुरू असणारे रक्ताभिसरण जोपर्यंत व्यवस्थित होत राहते तोपर्यंत रक्तदाबही सामान्य असतो. मात्र दोषांमध्ये असंतुलन झाले किंवा रक्तवहसंस्थेत बिघाड उत्पन्न झाला तर रक्तदाब वाढतो. आयुर्वेदानुसार रक्तदाब हा गती-विकृतीशी संबंधित एक विकार आहे असे म्हटता येते. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे सांगतात, उच्चरक्तदाबाची तीन मुख्य कारणे असतात. एक म्हणजे हृदय किंवा रक्तवाहिन्यांमध्ये बिघाड, दुसरे म्हणजे शरीरातील अतिरिक्त ओलावा (क्लेद) मूत्रामार्फत शरीराबाहेर काढून टाकणाऱ्या किडनीच्या कार्यक्षमतेत बिघाड आणि तिसरे म्हणजे अतिविचार, अति मानसिक ताण यामुळे मेंदूला येणारा थकवा किंवा शीण. यामुळे आयुर्वेदात रक्तदाबावर उपचार करताना नेमके कारण शोधावे लागते व त्यानुसार प्रकृतीनुरूप योग्य असे उपचार करावे लागतात. सरसकट सर्वांना एकाच प्रकारचे औषध देऊन फक्त रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आयुर्वेदाला मान्य नाही.

रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता आनुवंशिकतेपेक्षाही खालील कारणांशी निगडित असते -

  • पचायला जड अशा मेदस्वी पदार्थांचे अति सेवन उदा. तेल, चीज, मांसाहार

  • खाण्यापिण्यातील व वागण्यातील अनियमितता, एकंदर जीवनशैलीतील अनिर्बंधता व बेशिस्तपणा

  • व्यायामाचा अभाव

  • अतिस्थूलता

  • अतिरिक्त धूम्रपान व मद्यपान

  • अतिचिंता तसेच कामामध्ये अति व्यस्तता

  • मधुमेह फक्त नियंत्रणात ठेवणे, बरा करण्यासाठी उपचार न घेणे.

  • स्त्रियांच्या बाबतीत गर्भारपणात रक्तदाब वाढण्याचा इतिहास असणे.

  • रजोनिवृत्तीदरम्यान किंवा काही कारणास्तव गर्भाशय काढलेले असणे वगैरे.

तेव्हा रक्तदाबाचा त्रास व्हायला नको असेल तसेच रक्तदाबासाठी गोळी घ्यावी लागत असेल तर या कारणांपासून दूर राहायला हवे.

चालताना, जिना चढताना दम लागणे, डोके दुखणे, जड होणे, चक्कर येणे, डोळ्यावर झापड येणे, अकारण चिडचिड होणे, काम न करताच गळून गेल्यासारखे वाटणे अशी लक्षणे जाणवत असली तर वेळीच रक्तदाब तपासून घ्यायला हवा. रक्तदाब मोजणे हे अक्षरशः दोन मिनिटांचे काम असते. आजकाल तर घरच्या घरी सुद्धा साध्या यंत्राच्या साहाय्याने रक्तदाब मोजता येणे शक्य आहे. या विकाराची अगदी सुरवातीला फार काही लक्षणे दिसत नाहीत. पण जेवढ्या लवकर निदान होईल तेवढ्या चांगल्या प्रकारे उपाययोजना करता येत असल्याने वयाच्या पस्तिशी नंतर वर्ष-सहा महिन्यांनी एकदा तरी रक्तदाब मोजून घेणे चांगले. कैक वेळेला रक्तदाब वाढला तरी व्यक्तीला काहीही लक्षणे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत बहुधा त्रास होत नाही म्हणून तपासणी केली जात नाही किंवा औषधांची नियमितता राखली जात नाही. या दोन्ही गोष्टी आरोग्यास घातक होत. रक्तदाबाचा त्रास सुरू झाला की तो शेवटपर्यंत राहणार, आयुष्यभर औषधे घ्यावी लागणार असे वाटते, मात्र प्रकृतीनुरूप योग्य आयुर्वेदिक उपचारांच्या मदतीने रक्तदाबासारख्या अवघड विकारातही उत्तम गुण येताना दिसतो. यामध्ये वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पंचकर्माचे योगदान महत्त्वाचे होय. संतुलन पंचकर्मादरम्यान योग, ॐकार ध्यान, संगीत, वेदमंत्रपठण, पथ्यकर आहार, सकारात्मक वातावरण यांच्यायोगे शरीरासह मन-विचारांचीही शुद्धी झाली की रक्तदाबाची औषधे क्रमाक्रमाने कमी कमी होतात, अनेकदा पूर्णपणे थांबतात असा अनुभव येतो. पंचकर्माबरोबर खालील उपायांचा रक्तदाबात उत्तम उपयोग होताना दिसतो.

  • नियमित अभ्यंग : रक्ताभिसरणाला मदत होण्यासाठी, गती-विकृतीतील बिघाड दूर करण्यासाठी, रक्तवाहिन्यांतील काठिण्य नष्ट होण्यासाठी रोज संतुलन अभ्यंग तेल लावणे उत्तम होय.

  • पादाभ्यंग : मानसिक ताणाशी किंवा शरीरातील विषद्रव्यांशी संबंधित असणाऱ्या रक्तदाबावर नियमित पादाभ्यंग म्हणजे तळपायाला शतधौतघृत लावून शुद्ध काशाच्या वाटीने चोळणे हा प्रभावी उपचार होय. आठवड्यातून किमान २-३ वेळा संतुलन पादाभ्यंग किटच्या मदतीने पादाभ्यंग करता येते.

  • योगासने, चालणे : नियमपूर्वक ३० मिनिटे चालणे, सूर्यनमस्कार, अनुलोम- विलोम, शवासन, योगनिद्रा करणे हे सुद्धा उत्तम होय.

  • योग्य वेळी व पुरेशी झोप : रात्री अकरा-साडेअकराच्या आत झोपणे, किमान ६-७ तासांसाठी झोपणे हे सुद्धा आवश्यक.

  • कच्चे मीठ खाणे म्हणजे वरून मीठ घेण्याची सवय बंद करणे, रात्रीचे जेवण कमी प्रमाणात व हलके घेणे, शक्यतो घरचे साधे जेवण घेणे, मैद्यापासून किंवा चण्याच्या पिठापासून बनविलेले पदार्थ टाळणे, तळलेले पदार्थ, पनीर, चीज, अंडी, मांसाहार टाळणे हे सुद्धा चांगले.

  • धूम्रपान, मद्यपान किंवा कोणत्याही व्यसनापासून दूर राहणे हे सुद्धा श्रेयस्कर.

रक्तदाबाची आनुवंशिकता किंवा प्रवृत्ती असणाऱ्यांना हे उपाय सुरू करता येतातच, पण रक्तदाबासाठी औषध घ्यावे लागणाऱ्यांनी या उपायांच्या बरोबरीने वैद्यांच्या सल्ल्याने औषधे घेणे श्रेयस्कर होय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com