आयुष्यातील गोडवा जपणाऱ्या अनोख्या स्वीट डिश.!

कुबेर
Thursday, 4 February 2021

खवैय्यांच्या या भारत देशात असे अनेक पदार्थ आहेत. प्रत्येक प्रदेश, प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावाची एक वेगळेपण आहे आणि एक वेगळी खाद्यसंस्कृती देखील आहे जी विविधतेने आणि चविष्ट पदार्थांनी नटलेली आहे.

पोटभर जेवणानंतर काहीतरी गोड खायलाच पाहिजे त्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही, हो ना? आपला देश विविधतेने नटलेला देश आहे आणि आपल्या देशाला खवैय्यांचा देश वावगे ठरणार नाही. भारताच्या विविधतेत खाण्याचे प्रकार देखील अग्रस्थानी आहेत असे म्हणता येईल. खाण्यावर ताव मारणे आपल्या देशातील लोकांना आवडते आणि अगदी आपल्या देशातील विविध पदार्थ खाण्यासाठी फॉरेनवरून पर्यटक देखील येतात. महाराष्ट्रातील पुरणपोळी असो किंवा पश्चिम बंगाल मधील फिश करी असो आपल्या देशात असे लाखो चविष्ट पदार्थ मिळतात पण जेवणानंतर खाल्ले जाणारे गोड पदार्थांची मज्जाच काही और आहे. मग आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अशाच काही स्वीट डिशची माहिती. 

१) इलानीर पायसम  
दक्षिण तामिळनाडू आणि केरळ मधील एक झटपट बनणारी चविष्ट खीर म्हणजे इलानीर पायसम. ही खीर विशिष्ट पारंपरिक पद्धतीने बनवली जाते. यामध्ये नारळाचा पल्प प्रामुख्याने वापरला जातो. याचबरोबर आटवलेले दूध, काजू , केसर देखील वापरले जाते. अतिशय सोपी आणि चविष्ट अशी ही स्वीट डिश नक्कीच तुम्हा सर्वांना आवडेल आणि आयुष्यात एकदा तरी त्याची चव चाखून पाहायलाच पाहिजे. 

फूड ट्रेंड : बहोत अच्छी ‘चीज’​

२) शोरभाजा 
पश्चिम बंगालचे नाव घेतले आणि बंगाली मिठाईचे नाव घेणार नाही असे शक्यच नाही. पश्चिम बंगालमधील बंगाली मिठाई जगप्रसिद्द आहे. रसगुल्ला, शोंदेश असे प्रकार तर सर्वांना माहित आहेत पण आणखीन एक अतिशय चविष्ट स्वीट डिश आहे आणि ती म्हणजे शोरभाजा. कोलकात्यामध्ये देखील खूप कमी दुकानांमध्ये शोरभाजा मिळतो. विशेषतः दुर्गा पूजा दरम्यान ही स्वीट डिश बनवली जाते. ही स्वीट डिश संपूर्णपणे आटवलेल्या दुधापासून बनते. दूध आटवून ते डीप फ्राय करून बनवली जाते. ज्यांना कॅलरीची चिंता आहे त्यांनी हे खाणं टाळलेलच बरं. पण खवय्यांनी ही स्वीट डिश आवर्जून खायलाच हवी. 

३) परवल मिठाई  
तोंडल्यापासून बनवली जाणारी ही मिठाई बिहारमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. तोंडली शिजवून त्यामध्ये खव्याचे मिश्रण भरून ही स्वीट डिश बनवली जाते. अतिशय स्वादिष्ट अशी असणारी स्वीट डिश शक्यतो उत्तर भारतात होळी आणि दिवाळी या सणांना बनवली जाते. दिसायला देखील ही डिश अतिशय सुंदर दिसते आणि या स्वीट डिश चा आस्वाद सर्वांनी एकदा तरी घ्यायलाच हवा. 

४) चेना पोडा 
चेना पोडा हे नाव बऱ्याच लोकांनी ऐकले नसेल. हा पदार्थ ओडिशा मधील खासियत मानली जातो. चेना पोडा चा अर्थ म्हणेज ' भाजलेले चीज '. चीज, मावा आणि साखर एकत्र करून ते बेक केले जाते. या पदार्थाचा रंग सोनेरी तपकिरी असा असतो. चीज आणि साखरेचा हा संगम अतिशय स्वादिष्ट असा असतो आणि या पदार्थाची चव खवैयांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद आणि समाधान घेऊन येईल यात काहीच शंका नाही. आयुष्यात एकदा तरी हा पदार्थ खाऊन पाहायलाच हवा. 

उस्मानाबादच्या ‘उस्मान’चे गुलाबजाम​

५) पूतारेकेलू  
आंध्र प्रदेशमधील ही एक विशेष स्वीट डिश आहे. वेफर्स सारखी दिसणारी ही डिश अतिशय स्वादिष्ट आणि जिभेवर गोडवा ठेऊन जाणारी आहे. वेफर्स सारखी आणि पांढरी असल्याने याला ' पेपर स्वीट ' असे देखील म्हटले जाते. तांदळाच्या पारदर्शक पेपर पासून ही स्वीट डिश बनवली जाते. तूप आणि साखरे मध्ये हा पेपर बुडवून वरचा थर बनवला जातो. गूळ, शेंगदाणे, काजू , बदाम याचे स्टफिंग त्यामध्ये भरले जाते. ही स्वीट डिश दिसायला देखील अतिशय आकर्षक दिसते आणि खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावीशी नक्कीच वाटते. मग तुम्हीही आयुष्यात एकदातरी नक्की ही स्वीट डिश खाऊन बघाच. 

खवैय्यांच्या या भारत देशात असे अनेक पदार्थ आहेत. प्रत्येक प्रदेश, प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावाची एक वेगळेपण आहे आणि एक वेगळी खाद्यसंस्कृती देखील आहे जी विविधतेने आणि चविष्ट पदार्थांनी नटलेली आहे. बहुदा अशाच गोड पदार्थांमुळे भारतातील प्रत्येकात एक वेगळाच गोडवा आहे आणि याच गोडव्याने भारताला जोडून ठेवले आहे. मग जेवल्यानंतर तुम्हालादेखील स्वीट डिश खावीशी वाटत असेल तर या सर्व स्वीट डिश एकदा तरी नक्कीच चाखून बघा आणि जेवणानंतरही जिभेवरील गोडवा कायम ठेवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: artile about Unique Sweet Dish