फूड ट्रेंड : बहोत अच्छी ‘चीज’ 

फूड ट्रेंड : बहोत अच्छी ‘चीज’ 

जगभरात अनेक फूड ट्रेंड्स येत असतात आणि ओसरत असतात. सद्यघडीला जगभरात whole food plant based diet फारच लोकप्रिय होत आहे. या प्रकारच्या डाएटमध्ये कोणतंही तेल, दूध, दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत आणि पूर्ण भर भरपूर फळ, भाज्या, डाळी आणि कडधान्य यावर असतो. दूध आणि तेल पूर्णतः बंद असल्याने या प्रकारच्या डाएटमध्ये पदार्थ तयार करताना मात्र त्यांची कसोटी लागते. गेल्या काही वर्षांत झपाट्याने हे डाएट लोकप्रिय झाले, परंतु त्यावेळेस बाजारात त्यांच्या गरजा पुरवू शकतील अशी प्रॉडक्ट्स उपलब्ध नव्हती. 

परदेशात निरनिराळी चीज आणि तळलेले पदार्थ खायची त्यांना सवय असते. अमेरिकेत तर शक्य तितक्या पदार्थात चीजचा भरपूर वापर केला जातो. चीजची इतकी सवय असताना अचानक चीज आहारातून पूर्णपणे बाद करणे ही कल्पनाच त्यांच्याकरता कठीण होती. पहिली काही वर्षे तरी त्यांनी कशीबशी ढकलली परंतु त्यातूनच त्यांना काजूपासून चीज तयार करायची कल्पना सुचली. काजूपासून चीज हे ऐकायला फारच अचंबित करणारे असले, तरी काजू चीज हे अतिशय छान लागते. भारत आणि आफ्रिका काजू उत्पादनात अग्रणी देश आहेत. गेल्या काही वर्षांत काजूचे भाव वरचढ झाल्याचे कारणही तुम्हाला इथेच सापडेल. काही वर्षांपूर्वी चीज रिप्लेसमेंट म्हणून घरच्या घरी काजू चीज तयार व्हायचे ते आता फॅक्टरीमध्ये बनू लागले, अर्थात त्याकरता मोठ्या प्रमाणात काजूची त्यांना गरज भासू लागली. काजूपासून केवळ चीजच नाही, तर काजू दूध, क्रीम, सॅलड ड्रेसिंग्ज, डिप्स, स्प्रेड असे नानाविध पदार्थ तयार होऊ लागले. ‘गरज हीच शोधाची जननी आहे,’ ही उक्ती इथे तंतोतंत लागू होते. ज्यांना चीजची ऍलर्जी आहे किंवा डाएटकरता चीजची रिप्लेसमेंट शोधत आहेत, त्यांच्याकरता पुढील रेसिपी अगदी परफेक्ट आहे. खात्री बाळगा, चीजऐवजी काजू पेस्ट वापरली तर चवीत कोणताही फरक पडत नाही आणि हेच त्याच्या यशाचं गुपित आहे ! 

डाएट पास्ता  
१ कप व्हीट पास्ता, १ मोठा कप भरून आवडीच्या भाज्या ( गाजर, फ्रेंच बीन्स, ब्रोकोली, फ्लॉवर, स्वीटकॉर्न इत्यादी), अर्धा कप काजू तुकडा, १ लसूण पाकळी, एक टेबलस्पून ऑरेगॅनो, पाव टेबलस्पून काळी मिरी पावडर, पाव टेबलस्पून जायफळ पावडर, मीठ आणि चिमूटभर साखर. 

- भाज्या चिरून वाफवून घ्या. 
- थोडे मीठ घालून पास्ता शिजवून घ्या. चाळणीवर काढून घ्या. 
- काजू आणि १ लसूण पाकळी पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. 
- नॉनस्टिक पॅनमध्ये काजू पेस्ट, १ कप पाणी, मीठ, साखर, ऑरेगॅनो, काळीमिरी पावडर, जायफळ घालून एकत्र करा आणि शिजवून घ्या. 
- त्यात पास्ता आणि वाफवलेल्या भाज्या टाकून मिक्स करा. एक वाफ आली, की सर्व्ह करा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com