
Traditional Russian Salad origin story: अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असे रशियन सॅलड हा एक पारंपरिक रशियन पदार्थ असून, त्याची सुरुवात मॉस्को शहरातील हर्मिताज रेस्टॉरंटमध्ये झाली. त्याचे भागीदार ऑलिव्हियर यांनी तिथे एक आगळेवेगळे सॅलड बनवले. त्यात त्यांनी ग्राऊसचे मीट, कॅव्हियार, स्मोक्ड डक आणि काही खास पदार्थ वापरून बनवलेले ड्रेसिंग वापरले. अल्पावधीतच सॅलड इतके लोकप्रिय झाले, की ते खाण्यासाठी लोक मुद्दाम ऑलिव्हियरच्या रेस्टॉरंटला भेट देऊ लागले. हे सॅलड हर्मिताज रेस्टॉरंटची ‘सिग्नेचर डिश’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
ऑलिव्हियर हे सॅलड अगदी कलात्मक रितीने सजवत असत. काही दिवसांनी त्यांच्या असे लक्षात आले, की त्यांनी प्रयत्नपूर्वक नटवलेले सॅलड लोक काट्याने एकत्र करतात आणि मगच आपल्या बशीत वाढून घेतात. हे बघून त्यांना धक्का बसला; पण अतिथी देवो भव या उक्तीनुसार त्यांनी स्वत:च सॅलडमधील सर्व पदार्थ एकत्र करून ते सर्व्ह करण्यास सुरूवात केली.