मासे खाणाऱ्यांनो, तुमच्यासाठी खास बातमी! अशा पद्धतीने ओळखा ताज्या आणि शिळ्या माशांमधला फरक 

टीम ई सकाळ
Monday, 28 September 2020

या प्रकारात कुजकट वास आणि मरगळलेले मासे ओळखणे केवळ सरावाने शक्य होते. ताजा मासा निवडून कसा घ्यायचा? याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. 

नागपूर :  मासे किंवा सी-फूड  म्हणजे अनेकांच्या हृदयाजवळचा विषय. मासे जगात मासे खाणाऱ्यांची संख्या कमी नाही. समुद्रकिनाऱ्याजवळच्या लोकांसाठी मासेमारी, विक्री आणि माशांचे कालवण या तीन सर्वात आवडत्या गोष्टी आहेत असे म्हणतात. कोळी बांधवच नाही तर अनेक लोकं निरनिराळ्या प्रकारचे मासे आवडीने खातात. पण शिळे आणि ताजे मासे ओळखायचे कसे? खराब मासे काही वेळा ताज्या माश्यांच्या ढिगात मिसळून विकले जातात. या प्रकारात कुजकट वास आणि मरगळलेले मासे ओळखणे केवळ सरावाने शक्य होते. ताजा मासा निवडून कसा घ्यायचा? याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. 

'असा' मिळाला भारतीय ऊसाला गोडवा; हे मिळवून देणारी शास्त्रज्ञ आहे तरी कोण?

असा ओळख शिळ्या आणि ताज्या माशांमधील फरक 

  • ताजे मासे दिसायला ताज्या फुलांप्रमाणे तरतरीत व चकचकीत ओलसर दिसतात. थोडेसेही मरगळलेले असले तर ते मासे घेऊ नका. काही ताज्या माशांना किंचीत हिरमुस वास असला तरी घाण कुजकट वास येत नाही.वासावरुनन ताजेपणा ओळखा.
  • ताज्या माश्याचे डोळे चकचकीत काळेभोर आणि पारदर्शक दिसतील. लालसर किंवा धुरकट पांढरे नसावे. काही मासे काप पाडून विकले जातात. ताज्या माशांचे तुकडे दिसायला व्यवस्थित असतात व त्यावर पारदर्शक पांढऱ्या रंगाची झाक असते.
  • मासा ताजा नसेल तर बोटाने थोडासा दाब दिल्यावर तिथे खोलगट ठसा उमटतो. ताज्या माश्यात असे होत नाही. ताज्या माशाचे कल्ले थोडेसे उघडून पाहिल्यास आतमधून बऱ्यापैकी लाल किंवा गुलाबी दिसतील. ते जर फिकट असले तर ताजेपणा संपलेला आहे.
  • खेकडे घेताना काळसर रंगाचे, जिवंत आणि चालणारे बघुन घ्यावेत. खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबुन पहावी. पाठ कडक असल्यास खेकडे आतुन मांसाने भरलेले असतात. जर खेकड्याची पाठ दबली गेली तर खेकडे आतुन पोकळ असतात , त्यातुन खायला काही मिळत नाही. अमावस्येला खेकडे मांसाने भरलेले असतात तर पौर्णिमेला खेकडे आतुन पोकळ असतात असे सांगितले जाते.
  • भिंगी, सुरमई, रावस, कारली, हलवा हे मासे विकत घेताना बोटांनी थोडे दाबुन घट्ट बघुन घ्यावेत. माशांचे तोंड उघडुन बघुन आतमध्ये लालसर भाग दिसला तर ते मासे ताजे आहेत असे समजावे. काळसर दिसले तर ते शिळे किंवा खराब आहेत असे समजावे.
  • रंगाने पांढरी आणि चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालचा भाग दाबुन बघावा. त्यातुन सफेद पाणी आले तर ते ताजे असतात आणि लाल पाणी आल्यास ते शिळे असतात हे समजावे. तसेच पापलेट शिळी किंवा खराब होत आल्यास त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो.
  • बोंबील हे ताजे बोंबील पांढऱ्या स्वच्छ रंगाचे, घट्ट व चमकदार असतात. त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो. बोंबील खराब व्हायला लागल्यास त्यांना पिवळसर रंग येतो.
  •  शिंपले घेताना काळसर रंगाच्या व तोंड मिटलेल्या घ्याव्यात. जिवंत आणि तोंडाची उघडझाप करणाऱ्या शिंपल्याही घेऊ शकता. खराब आणि शिळ्या झालेल्या शिंपल्यांची तोंडे उघडी असतात आणि ती उघडत नाहीत.  
  • करंदी तांबुस सफेद रंगाची आणि घट्ट सालीची करंदी ताजी असते. तसेच काळसर सफेद रंगाचे चमकदार व घट्ट बांगडे ताजे असतात. तोंड उघडून बघितल्यास लालसर रंगाचे दिसणारे बांगडे ताजे असतात. शिळ्या व खराब बांगड्यांना पिवळसर रंग येऊ लागतो आणि ते मऊ पडतात. बोटांनी दाबल्यास खड्डा पडतो.

केस खूप गळताहेत? करून बघा घरगुती उपाय

 
संपादन, संकलन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to know difference between fresh fishes and old fishes