esakal | Food : सावधान! मिठाई घेताय तर जरा एक्‍स्पायरी डेटकडेही असू द्या लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान! मिठाई घेताय तर जरा एक्‍स्पायरी डेटकडेही असू द्या लक्ष

मिठाई दुकानदारांच्या हलगर्जीपणामुळे तुम्हाला अन्न विषबाधेला समोरे जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

सावधान! मिठाई घेताय तर जरा एक्‍स्पायरी डेटकडेही असू द्या लक्ष

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : सणासुदीच्या दिवसात मिठाई (Sweets) घेताय तर जरा जपून. कारण मिठाई दुकानदारांच्या हलगर्जीपणामुळे तुम्हाला अन्न विषबाधेला (Food poisoning) समोरे जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मिठाई विक्रेते हे मिठाईची बेस्ट बिफोर डेट (मिठाई चांगली असल्याची अंतिम तारीख) लावण्याबाबत बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाचे (Food and Drug Administration) दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हेही वाचा: पवारांच्या उपस्थितीत कॉंग्रेसला धक्का! सुशीलकुमार शिंदे म्हणाले...

मागील वर्षभरापासून मिठाई विक्रेत्यांना एक्‍स्पायरी डेट लावण्याच्या सूचना देण्यात येत आहेत; मात्र शहरातील अनेक मिठाई विक्रेत्यांनी या नियमाला केराची टोपली दाखविली आहे. दसरा-दिवाळी, भाऊबीज सणात मिठाईची भेसळ मोठ्या प्रमाणात होते. त्यात मिठाई किती दिवसांपर्यंत वापरता येईल, त्याचा निश्‍चित कालावधी किती आहे याची कोणतीच माहिती मिठाईच्या पॅकिंगवर नसते. यामुळे गेल्या वर्षापासून खुल्या पद्धतीने मिठाई विकताना विक्रेत्यांना मिठाई ट्रेसमोर बेस्ट बिफोर डेट फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, शहरातील विविध भागांमध्ये "सकाळ'ने केलेल्या पाहणीत काही दुकाने वगळता सर्वत्र फलक न लावता मिठाई सर्रासपणे विक्री होत असल्याचे दिसून आले.

शहरातील मधला मारुती, कुंभार वेस, कोंतम चौक, कन्ना चौक, राजेंद्र चौक आदी दुकानांमध्ये फलक नव्हते. याकडे अन्न व औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. सणासुदीच्या काळात खवा मिठाईला मोठी मागणी असते. शिळी मिठाई खाल्ल्याने अनेकदा अन्न विषबाधा होण्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने सर्व मिठाई विक्रेत्यांना सूचना देण्यात आल्याचे सांगितले. परंतु विक्रेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

निर्देशाकडे दुर्लक्ष

मिठाई विक्री करताना विक्रेत्यांना मिठाई ट्रेसमोर "बेस्ट बिफोर' डेट लावणे बंधनकारक आहे. यामध्ये मिठाईच्या उत्पादनाची तारीख टाकणे बंधनकारक नसले तरी मिठाई विक्रेते स्वेच्छेने माहिती ग्राहकांना देऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मागील वर्षीपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाने मिठाई विक्रेत्यांना तसे निर्देशही दिले होते. पेढा, बर्फी, बंगाली मिठाई, काजू रोल, काजू कतली, मोतीचूर लाडू, बेसन लाडू या पदार्थांची एक्‍स्पायरी डेट ग्राहकांना कळावी, हा त्यामागचा हेतू आहे.

हेही वाचा: पोलिस आयुक्‍तपदी बैजल! जाणून घ्या त्यांची आतापर्यंतची कामगिरी

दररोज मिठाई बनविली जाते. बेस्ट बिफोरचे फलक सर्वत्र लावले जातात. मात्र मिठाई शिल्लक राहात नसल्याने शिळी मिठाई राहात नाही. सर्व दुकानदार याची अंमलबजावणी करत असतात.

- चेतन नरखेडकर, मिठाई व्यापारी, सोलापूर

loading image
go to top