मास्टर शेफ विकास खन्ना तिसऱ्या पीएचडीच्या तयारीत, ट्विटरवरून दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

'मास्टरशेफ' म्हणून ओळखले जाणारे शेफ विकास खन्ना आता आपल्या तिसऱ्या पीएचडीच्या (विद्यावाचस्तपती) तयारीत आहेत. याबाबतची माहिती त्यांनी नुकतीच ट्विटच्या माध्यमातून दिली.

नवी दिल्ली - 'मास्टरशेफ' म्हणून ओळखले जाणारे शेफ विकास खन्ना आता आपल्या तिसऱ्या पीएचडीच्या (विद्यावाचस्तपती) तयारीत आहेत. याबाबतची माहिती त्यांनी नुकतीच ट्विटच्या माध्यमातून दिली. तर त्यांच्या या कार्याला त्यांच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद व शुभेच्छा देण्यात आल्या. शेफ म्हणलं की चमचमीत आणि आकर्षित पदार्थ बनविणारा व्यक्ती डोळ्यासमोर येतो. शेफ खन्ना यांची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर असून ते नेहमी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या प्रयोगासाठी जाणले जातात. 

विकास खन्ना यांनी खाद्यपदार्थ आणि त्यामध्ये केलेल्या प्रयोगांवर आधारित विविध पुस्तके सुद्धा लिहिली आहेत. मात्र सध्या ते पुन्हा चर्चेत आले आहेत. ते म्हणजेच त्यांची तिसरी पीएचडीची तयारी. आपल्या पीएचडी बाबत ट्विट करताना खन्ना यांनी पीएचडीसाठीच्या विषयाबद्दल सुद्धा माहिती दिली आहे. स्वतःच्या क्षेत्रातील विषय न निवडता त्यांनी आता पर्यावरणावर आधारित विषयावर पीएचडी करण्याचे ठरवले आहे. या त्यांचे ट्विटप्रमाणे "हवामानातील बदलांचा विविध प्रजात्यांचा परागणवर (पॉलीनेशन), प्राकृतिक जीवनचक्रावर व त्यांच्या आकारात होणारा परिणाम या विषयावर मी माझ्या तिसऱ्या पीएचडीवर काम करत आहे."

हे वाचा - रेसिपी : मिक्स भाज्यांचे चटपटीत लोणचे

खन्ना यांनी आपली पहिली पदवी घेतली होती ती 'भारतीय सण व खाद्य पदार्थ' या विषयावर. तर त्यांचे सामाजिक कार्य आणि जागतिक स्तरावरील काम पाहता त्यांना दुसरी 'डॉक्टरेट' पदवी देण्यात आली होती. नवनवीन पदार्थ बनविण्यापासून ते समाजासाठी काही तरी योगदान देण्याच्या कामात ते नेहमी सक्रिय असतात. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी गरजू नागरिकांना सुमारे 17 दशलक्ष जेवणाचे पॅकेट वाटले होते. दरम्यान सध्या ते मुंबई येथील हजारोंच्या संख्येने डबेवाले आणि 'वृंदावन'संस्थेतील विद्वा महिलांसाठी जेवण आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे कार्य करणार आहेत.

हे वाचा - हेल्दी रेसिपी : चटपटीत, हेल्दी 'कडबोळी'

'फूटप्रिंट्स'च्या माध्यमातून गरजूंना दिले जाणार चप्पल
जेवण पुरविण्या व्यतिरिक्त शेफ विकास खन्ना आता देशातील मुख्य पाच शहरांमध्ये गरिबांना 'स्लीपर' (चप्पल) वाटत आहेत. या उपक्रमा अंतर्गत त्यांनी आतापर्यंत एक लाख 75 हजार स्लीपर वाटले आहेत. याबाबतही त्यांनी सोमवारी ट्विट करून माहिती दिली. हा उपक्रम दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, वाराणसी आणि चेन्नई येथे पार पाडत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: master chef announced his third phd is on environment subject