esakal | नैसर्गिक खाद्य दिवस: ऋषी पंचमी
sakal

बोलून बातमी शोधा

नैसर्गिक खाद्य दिवस: ऋषी पंचमी

नैसर्गिक खाद्य दिवस: ऋषी पंचमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ऋषी पंचमी: प्राचीनकाळी आदिमानव जंगलात राहुन कंदमुळे व रानभाज्या खाऊ लागला. या खाद्यपिकांच्या अभिवृद्धी चे तंत्रज्ञान त्याला अवगत झाले आणि कृषीसंस्कृतीचा जन्म झाला. कालांतराने शेतीमध्ये बदल होत गेले व शेतीसाठी लाकडी व दगडी अवजारे वापरुन त्याने शेती पिकवली. ऋषी संस्कृती च्या अगोदर कृषीसंस्कृतीचा उगम झाला.

नदीकाठी ऋषी मुनींनी वस्त्या सुरू केल्या. नंतर जनावरांच्या व धातुच्या अवजाराच्या साहाय्याने त्याने शेती केली. मानवाची भटकंती संपुन बैलजोडीच्या व‌ नांगराच्या साह्याने जंगलांचे सपाटीकरण करून तो शेती करु लागला; त्यावेळेस त्यास पर्यावरणाची हानी व जंगल संवर्धनाविषयी जागृती निर्माण झाली. जंगलातील काही भागाचे संवर्धन व्हावे म्हणून देवराई व ऋषी पंचमी या संकल्पना उदयास आल्या.

ऋषी पंचमी चा विचार केला तर बैलांच्या कष्टाच‌ किंवा नांगरलेल्या जमिनीतल खाता येत नाही, कारण हि जनावरांच्या साहाय्याने‌ निसर्गाची हानी करून नांगरलेली शेती त्यांच्यासाठी आधुनिक होती. म्हणूनच या दिवशी नांगरलेल्या जमिनीतील न खाता फक्त नैसर्गिकरित्या उगवलेली कंदमुळे आणि फळे किंवा हातशिवणीच खायचं असत, कन्दैर्वाथ फलैर्मूलैर्हकृष्टंम ना भक्षेयत्l* कालांतराने हि ऋषी पंचमीची परंपरा जोपासली गेली. यातुनच शेती या पारंपारिक जीवनाचा अविभाज्य भागाशिवाय घराच्या परिसरात महिला वर्गाने जीवनसत्वाने परिपूर्ण परसबागा तयार केल्या. या बागा सेंद्रिय भाज्यांचा आणि धान्यांचा अड्डा होत्या.

हेही वाचा: श्रावण विशेष : पारंपारिक भिरडी

त्यात चक्की भोपळा, काशीफळ, सुरण, सातपुते, अळू, लाल माठ, विविध प्रकारच्या वालाच्या पापडी शेंगा, काकडी किंवा वाळूक, आणि राजगीरा या भाज्यांना स्थान मिळाले. या अशा नैसर्गिक पिकविलेल्या भाज्या शहरात मिळत नाही म्हणून या दिवशी शहरी भागात त्यांचा पुरवठा होऊ लागला. कालांतराने रासायनिक कंपन्यांच्या आधुनिक तंत्राने आणि मंत्राने शेतीला युरीया, उज्वला आणि सुफला खतांमुळे शेतकऱ्यांना काळी आई नवसाला पावली! शेतीत आणि पीकपद्धती मध्ये बदल झाले. रानभाज्यां हे गरिबांचे खाद्य आणि बाजारातल्या रासायनीक खतांवर पिकविलेल्या भाज्या विकत घेण प्रतिष्ठेच मानलं जाऊ लागल... केवढी ही प्रतिष्ठा!. अर्थिक स्तर उंचावल्यामुळे शेतीचे व्यापारीकरण होऊन रानभाज्या किंवा परसबागेतील भाज्या खाणे लोकांच्या दृष्टीने कमी दर्जाचे झाले.

महाराष्ट्रातील नैसर्गिक खाद्य, रानमेवा आणि रानभाज्या यांचा जर विचार केला तर, मुळशी सारख्या दुर्गम घनदाट जंगलाचा अभ्यास करणाऱ्या डॉ. राणी भगत यांनी १०५ प्रकारच्या फळखाद्यांची आणि इतर बऱ्याच रान पालेभाज्या व फुलभाज्यांची नोंद केलेली आहे.डॉ अनुराधा उपाध्ये यांनी 'फॉरेस्ट फुड्स ऑफ नॉर्थरण रिजन ऑफ वेस्टर्न घाटस् ' या पुस्तकात १४५ प्रकारच्या रानखाद्यांविषयी माहिती नमुद केलेली आहे. दिवसेंदिवस बऱ्याच ठिकाणी या दिवशी रानभाज्या किंवा नैसर्गिक खाद्य खाण्याची परंपरा नामशेष झालेली आहे.

तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी करतात उदा. पूर्व विदर्भाची काशी समजलेल्या जाणाऱ्या वज्रेश्वर येथे नदीच्या काठावर घाटावर दरवर्षी २५ हजार महिला रानभाज्या व नैसर्गिकरीत्या पिकलेले धान्य शिजवतात. पारंपारिक पीक वाणाच संगोपन आणि संवर्धन करणाऱ्या बीजमाता पद्मश्री मा.राहिबाई पोपरे यांनी "बऱ्याच रानभाज्या खाल्ल्या जाऊ शकतात असे सांगितले परंतू उपलब्ध होणारी भाकरी हि बैलांच्या कष्टाची असते म्हणून शक्यतो म्हशीच्या दुधावरची उपवास केला जातो किंवा काहीही खाल्ले जात नाही"असं सांगितलं.

हेही वाचा: मुरुकूपासून ते इडियप्पमपर्यंत...चेन्नईतील लोकप्रिय पदार्थ

आंतरराष्ट्रीय इथनो बॉटनी पुरस्कार विजेत्या ज्येष्ट शास्त्रज्ञ डॉ.विनया घाटे यांनी "पूर्वी पुण्याच्या मंडई मध्ये देवभात ('ओरायझा रुफिपोगोन') बाजारात येत होता" असे सांगितले. चिचार्डी, करोंदा,गोमटी, कुर्डु, भारंगी, मेखी, पाथरी या बरोबर काही शेतीतल्या अशा २१ प्रकारच्या भाज्या मिळत होत्या अस त्यांनी एका 'अशियन अग्रो हिस्टरी' या जर्नल मध्ये नमूद केले आहे. कंद, फळ आणि मुळांबरोबरच काही उपधान्यांचा देखील वापर केला जातो..

शाकाहारस्तु कर्तव्यो नीवारैः श्यामकैस्तथा । म्हणजे या दिवशी ‌शाकाहार करून नीवारै म्हणजे देवभात आणि जंगली शामका हे धान्य खावे. यामुळेच जंगलातील तृणधान्य लागवडीखाली आले. पूर्वी मावळ भागात खास ऋषी पंचमी साठी वरई, साव आणि नाचणी डोंगराच्या उतरावर म्हणजेच फक्त कुदळीने खोदून माळकुसावर शेती केली जात असे. या सगळ्या वाणांना उपधान्य म्हणतात. आंदर मावळात पूर्वी या दिवशी मोहट्याच तेल वापरत होते. पण आता भारत सरकारने पारंपारिक तेल स्त्रोंना काट देउन पाम तेलासाठी ८८४४ कोटीचे घसघशीत अनुदान देऊ केले आहे मग नैसर्गिक तेलाचे‌ स्त्रोत असणारी मोहाची जंगले नष्ट होऊ शकतात.

भंडारा आणि चंद्रपुरसारख्या भागात नोवागुंजी, कुसरी आणि गुड्डा (Panicum spp) या तृणधान्यांची शेती स्वताच्या कुटुंबापुरती केली जाते मग हेच धान्य या दिवशी उपयोगात आणतात व ऋषी पंचमी हा महिलांचा उपवास वगळता घरातील इतर लोकांना हे सेंद्रिय धान्य वर्षभर उपलब्ध होते तेच इतरत्र पालेभाज्यां च्या बाबतीत देखील आहे .... युट्युब वरील ऋषी पंचमी भाजी विविध रेसपीमध्ये आजकाल बाजारात आलेल्या मका, मिरची, टोमॅटो या भाज्या दाखवल्या जातात. आजकाल शेती साठी बैलजोडी वापरलीच जात नाही. सगळी शेती यांत्रीक झाली आहे, त्यामुळे सगळ्याच भाज्या खालल्या जाऊ शकतात परंतु त्या सेंद्रीय राहीलेल्या नाहीत.बैलाच्या कष्टाच खायचं नाही म्हणजे शेणखताचा वापर टाळून रासायनीक खतांबरोबर यांत्रिक शेती करायची असा अर्थ होत नाही.

हेही वाचा: साधे पोहे खाऊन कंटाळलात? मग जरुर ट्राय करा आचारी पोहे

हे खाद्य जरी बैलांच्या कष्टाच नसलं तरी त्यांना किड, तणनाशक यांच्या पासून बचाव करण्यासाठी जेनेटिक इंजिनीअरिंग मार्फत मानवाने खुप कष्ट घेतले आहेत त्यामुळे माणसांना विविध आजार होत आहेत. पूर्वी‌ वापरल्या जाणाऱ्या रानभाज्यांच्या जागेवर आता अनेक व्यापारी भाज्या वापरल्या जातात या भाज्या मुळात भारतीय उगम असलेल्या आहेत का या पैकी किती भाज्या 'जेनेटिकली मोडिफाइड' आहेत? हे पाहील पाहीजे. उपवासाला जरी परदेशी भाज्या असल्या तरी त्या बैलाच्या कष्टाच्या नाहीत‌ ना? हि संकल्पना सध्या रुजू झाली आहे.

सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती हा संदेश या दिवशी मिळत असेल तर...पण मग आधुनिक शेतीचा अवलंब केला नाही तर वाढत्या लोकसंख्येला अन्न धान्य पुरवायचे कसे? हा मोठा प्रश्र्न आहे. कारण सेंद्रिय शेतीतून एवढे मोठे उत्तपन्न मिळणे शक्य आहे का ?? मानवाने निसर्गाच्या जास्त जवळ जाऊन देशी आणि पारंपारिक वाणांचा वसा हातात घेऊन स्वत: सहभागी झाले पाहिजे असा उद्देश आहे.

फक्त महिलांनी रानभाज्या व नैसर्गिक धान्य खाण्याची ऋषी पंचमी ची परंपरा जरी नामशेष होत असली तरी...रानभाज्यांमुळे कोरोना बरा होतो हा नविन शोध आणि आदिवासींचा सर्वांगीन या पार्श्वभूमीवर रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करुन नागरिकांपर्यत रानभाज्यांविषयी जनजागृती करून त्याची माहिती पोहचविण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून ३३ जिल्ह्यामधील २३० तालुक्यांमध्ये ५०० रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार अशी घोषणा कृषी विभागाने केलेली होती. काही ठिकाणी भरवलेल्या महोत्सवात शेकडोंच्या आकड्यात दुर्मिळ रानभाज्या विकल्या गेल्या आहेत असंही सांगण्यात आल.

महोत्सवाबरोबरच ऑनलाईन वेबिनार, रानभाज्यांच्या पाककला स्पर्धा इत्यादी गोष्टींचे आयोजन केलं जातं आहे. पण या सर्व गोष्टींमधून रानभाज्या अक्षरक्ष ओरबाडल्या जात आहेत.सह्याद्री मध्ये या रानभाज्यांचा अधिवास असणाऱ्या जंगलांची जेवढी वाट विदेशी खाद्यपदार्थ देणाऱ्या रिसॉर्ट आणि हॉटेल्स ने लावली तेवढी वाट कोणीच लावली नाही. या पर्यटनस्थळावरील विदेशी चायनीज‌ आणि पिझ्झा हे पदार्थ खाऊन कंटाळलेल्या तरूण पिडीला काहीतरी बदल हवा आहे म्हणून आता त्यांनी रानभाज्या कडे आपला मोर्चा वळवला‌ आहे.

हेही वाचा: नागपूरी तर्री-पोहे

पावसाळ्यात वर्षा विहारा बरोबरच रानभाज्यांची चव घेण्याचे पीक पसरत आहे.कपाळफोडी, कुर्डु, टाकळा, भुईआवळा, कुंजिरडा,तांदूळजा, भुईआवळा, केणी, पोकळा, चंदनबटवा,गोखरू या भाज्या आधीच तणनाशकांचा वापर करून शेतातून नष्ट केल्या जात आहे, कारण तण काढण्यासाठी शेतमजूर हि मोठी समस्या आहे. रोपांचा प्रसार करणारे अनेक अवयवांची भाजी कंद, कंरोदा, अमरकंद, हे प्रजनन करणारे आहेत.. आता जरी या रानभाज्या दुर्मिळ नसल्या तरी त्या भविष्यात संकटात येऊन जैवविविधतेवर कुऱ्हाड बसणार आहे.

किटकनाशके आणि रासायनिक खते हि मानवजाती ने स्वतःच्या विकासासाठी आणि भरभराटीसाठी तयार केलेले विष आहे .जोपर्यंत व्यापारीकरण हा दृष्टिकोन बाजूला ठेवून चालीरीती, लिंगभेद, रूढी आणि परंपरा या दृष्टिकोनातून या दिवसाकडे न पाहता त्याच्या संगोपन आणि संवर्धन हि आस्था जोपासली जात नाही तोपर्यंत नैसर्गिक अन्न धान्य आणि भाजीपाला जंगलांशिवाय शक्य नाही.

प्रा. किशोर सस्ते.. वनस्पती अभ्यासक

loading image
go to top