esakal | रेसिपी : खांडोळीची भाजी
sakal

बोलून बातमी शोधा

RECIPE

रेसिपी : खांडोळीची भाजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साहित्य – तीन वाटय़ा किसलेलं खोबरं, एक वाटी हरभरा डाळ, एक वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी सालासह मूगडाळ, अर्धी वाटी खसखस, एक ते दीड पाव तेल, हळद, तिखट, हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, किंचित बडीशेप, दोन लिंबू, एक संत्र. चार-पाच टोमॅटो, दहा-बारा पालकांची पानं, तीन वाटय़ा बेसन, एक वाटी कणीक, मीठ, सात-आठ मध्यम कांदे.

कृती – (रस्सा) – एक वाटी खोबरं, दहा-बारा शेंगदाणे, चार कांदे चिरून, दोन चमचे खसखस घालून हे सर्व पदार्थ थोडय़ा तेलात भाजून वेगवेगळे बारीक वाटावेत. दहा-बारा पालकाची पानं, चार टोमॅटो, सहा हिरव्या मिरच्या, थोडं संत्र घेऊन ते मिक्सरमध्ये बारीक करावं. कढईत थोडं तेल टाकून, मोहरी तडतडल्यावर एक एक करून बारीक केलेला पदार्थ टाकून ढवळावा. तेल सुटत आल्यावर, किंचित हळद, दोन चमचे लाल तिखट, एक चमचा धनेपूड टाकून मिश्रण चांगलं ढवळावं. हळूहळू उकळीचं पाणी टाकावं. पाहिजे तस्सा रस्सा पातळ किंवा घट्ट करावा. एक-दोन उकळ्या आल्या की, वरून मीठ आणि कोथिंबीर टाकावी.

हेही वाचा: डॉ. दिलीप मालखेडेंची अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

सारण आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेली हरभरा डाळ, मूगडाळ, शेंगदाणे, खसखस. हे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करून एकजीव करावेत. आधी त्यात मोहरी तडतडू द्यावी. नंतर लसूण-आलं पेस्ट घालावी. उरलेले सर्व कांदे कापून कढईत टाकावेत. ते खरपूस झाले की, त्यात किंचित हळद, बडीशेप, दोन चमचे लाल तिखट, दोन चमचे धनेपूड, टाकून मंद गॅसवर दहा ते पंधरा मिनिटं वरचेवर मोकळं होईपर्यंत ढवळावं. गॅस बंद करून सर्व मिश्रण मोठय़ा भांडय़ात ओतावं. वरून उरलेला खोब-याचा किस आणि भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घालावी. मिश्रण एकदम थंडगार होऊ द्यावं.

हेही वाचा: गणपती स्पेशल : गव्हाच्या सत्त्वाचे मोदक

पारी – तीन वाटय़ा बेसन आणि एक वाटी कणीक, मीठ आणि किंचित हळद घालून पाण्यानं घट्ट भिजवावी. पातळ पुरी लाटून त्यावर गार झालेलं मिश्रण दाबून त्याला लांबुळका आकार देऊन पुरीच्या मधोमध ठेवावं. पुरीच्या कडा दुमडण्यापूर्वी पुरीच्या आतल्या भागाच्या कडेला पाण्याचं बोट लावून, व्यवस्थित दुमडाव्या. लांबट-चौकोनी खांडोळी तयार होते.

खांडोळीचा आकार त्रिकोणी किंवा केळय़ासारखा किंवा कसाही होऊ शकतो. अशाप्रकारे सर्व खांडोळ्या तयार कराव्या. सर्व खांडोळ्या कुकरमध्ये/चाळणीत वाफवून घ्याव्यात. वाफवलेल्या खांडोळ्या रस्सा उकळत असताना त्यात टाकता येतात किंवा तळूनही घेता येतात. खांडोळी खाताना खांडोळीचे मधोमध दोन भाग करून खोलगट डिशमध्ये ठेवावे. त्यावर रस्सा गरम करून ओतावा. वाफाळलेल्या लाल, गरम रस्स्यावर लिंबू पिळून, गरम-गरम ज्वारीच्या भाकरी बरोबर खावी आणि हो मधल्यावेळी मुलांना खायला द्यायची असेल तर खांडोळीचे दोन भाग करून त्यात तेल-मीठ भरावं. मस्त लागतं. संध्याकाळी गरम रस्सा, तांदळाचा भात असा फक्कड बेत जमतो.

loading image
go to top