esakal | गणेशमूर्ती आमची, किंमत तुमची! आधार प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशमूर्ती आमची, किंमत तुमची! आधार प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

गणेशभक्त येतात, मूर्ती पसंत करतात अन्‌ त्यांना योग्य वाटेल अशी रक्कम डब्यात टाकून आपल्या लाडक्‍या बाप्पाची मूर्ती आनंदाने घरी घेऊन जातात.

गणेशमूर्ती आमची, किंमत तुमची! आधार प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दक्षिण सोलापूर : गणेशभक्त येतात, मूर्ती पसंत करतात अन्‌ त्यांना योग्य वाटेल अशी रक्कम डब्यात टाकून आपल्या लाडक्‍या बाप्पाची मूर्ती आनंदाने घरी घेऊन जातात, असा एक अनोखा "मूर्ती आमची, किंमत तुमची' हा पर्यावरणपूरक उपक्रम सोलापूरच्या आधार प्रतिष्ठानच्या (Aadhar Pratishthan) वतीने राबवला जात आहे. (Ganesh Chaturthi) त्यास गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यंदा या उपक्रमाचे सातवे वर्ष असून, कोरोनाचा (Covid-19) धोका लक्षात घेऊन गर्दी नियंत्रित करण्यासाठी मूर्तींची संख्या कमी करण्यात आली आहे. सुमारे 60 गणेशमूर्ती यंदा उपलब्ध असल्याची माहिती अध्यक्ष मिलिंद माईनकर यांनी 'सकाळ'ला दिली.

हेही वाचा: दुपारी 1.50 पर्यंत करा गणेशाची स्थापना : पंचांगकर्ते मोहन दाते

बाजारात शाडूच्या मूर्तीची किंमत भरमसाठ आकारली जाते. त्यामुळे गणेशभक्त किमतीबाबत घासाघीस करतात अन्‌ स्वस्तातील पीओपी मूर्ती पसंत करतात. घरोघरी अशा पर्यावरणाला हानीकारक मूर्तींची प्रतिष्ठापना होते. याबाबत जनजागृतीसाठी विविध पर्यावरणप्रेमी संस्था जनजागृती करतात. मात्र त्यावर प्रत्यक्ष कृतीतून उपाय शोधत आधार प्रतिष्ठानने हा अनोखा उपक्रम सुरू केल्याचे मिलिंद माईनकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना गर्दीत उभं राहावं लागू नये यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने यंदा दोन ठिकाणाहून 60 गणेशमूर्तींचे वितरण होणार आहे. जुळे सोलापूर येथील गणेश भक्तांसाठी रुबी नगरजवळील बसवराज निलय नगरमध्ये रसिका तुळजापूरकर (मो. 9370098377) यांच्या निवासस्थानी 15 मूर्तींची व्यवस्था आहे. तर अन्य भागातील गणेश भक्तांसाठी होटगी रोडवर मिलींद माईनकर (मो. 7743892059) यांच्या निवासस्थानी 45 मूर्तींची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाला रसिका तुळजापूरकर, ऐश्वर्या कुलकर्णी, शुभम गोखले यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचे सहकार्य आहे.

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2021 : 'श्रीं'ची मूर्ती कशी असावी?

गणेशभक्तांना मूर्तीची किंमत सांगितली जात नाही. याशिवाय पर्यावरणपूरक मूर्ती असल्याने भक्तांचा मोठा प्रतिसाद असतो. भक्त येतात, मूर्ती पसंत करतात आणि त्यांना योग्य वाटेल ती रक्कम डब्यात टाकतात. त्यामुळे लाडक्‍या बाप्पाची मूर्ती आनंदाने घरी घेऊन जाताना भक्तांना समाधान मिळते. यंदाचा गणेशोत्सव शुक्रवार (ता. 10) पासून सुरू होत असल्याने गणेशभक्तांना गुरुवारी (ता. 9) व शुक्रवारी (ता. 10) मूर्ती दिल्या जाणार आहेत.

- मिलिंद माईनकर, अध्यक्ष, आधार प्रतिष्ठान, सोलापूर

बातमीदार : श्‍याम जोशी

loading image
go to top