esakal | कंठ दाटून आला, हुंदका अनावर झाला! इतकं 'मोठं' संकट पुन्हा नको
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh festival and corona

कंठ दाटून आला, हुंदका अनावर झाला !

sakal_logo
By
प्रकाश पाटील

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपली हाडामांसाची माणसं गेली. त्यांच्या आठवणीने यंदा गणरायाचे स्वागत करताना हजारो घरांत हुंदका अनावर झाला असेल. डोळ्यांच्या कडा भरल्या असतील. प्रत्येक जण गणरायाला नमस्कार करताना एकच मागणं करीत असेल, ‘हे गणराया, तू तर विघ्नहर्ता आहेस. इतकं मोठं संकट पुन्हा येऊ देऊ नकोस. प्रत्येकाला लढण्याचा बळ दे! सर्वांना सुखात, आनंदात ठेव आणि उत्तम आरोग्य दे’!

गणेशोत्सव यंदाही साधेपणाने साजरा करावा लागला. कारण, कोरोना ! रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी तो मुळासकट संपलेला नाही. तो या ना त्या कारणाने डोकं वर काढतोय. त्याला पसरायला काही तरी निमित्त लागतंय. पहिली लाट आली तेव्हा कोरोना आपल्याला नवा होता. दुसऱ्या लाटेत आपण त्याच्याशी मुकाबला करण्यास सज्ज झालो खरे, मात्र त्याने आपलं भयावह रूप धारण केलं. दुसऱ्या लाटेत त्याने भल्याभल्यांवर झडप घातली. जो मिळेल, त्याला तो गिळंकृत करीत राहिला.

यंदा गणेशोत्सवात पूर्ण लॉकडाउन नाही. मोकळीक मिळाली. तरीही, दक्षता म्हणून सरकारने मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेतली. गेल्या शुक्रवारी गणरायाचे आगमन झाले. प्राणप्रतिष्ठा केली. गेल्या शुक्रवारी हजारो घरांत गणपती बसविताना अनेकांचा कंठ दाटून आला. याला कारण म्हणजे, कोरोनाने आपल्या जवळची, हाडामांसाची, रक्ताची नाती असलेली माणसं हिरावून घेतली. घरात जर दु:ख झाले, तर वर्षभर आपण, जाणाऱ्या माणसाची आठवण म्हणून कोणताही सण उत्साहात साजरा करीत नाही. साधेपणाने सगळे व्यवहार करीत असतो. हे आपले संस्कार, रूढी किंवा परंपरा आहे.

हेही वाचा: अकोले : बीजमातेनी साकारला बियांचा गणपती बाप्पा

अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या दोन-चार महिन्यांपूर्वीचे दिवस आठवले, की आजही अंगावर काटा उभा राहतो. तसे चित्र पुन्हा कधी पाहायला मिळू नये, हीच गणेशाकडे प्रार्थना. रोज माणसं जळत होती. स्मशानभूमीत रांगा लागल्या होत्या. लाकडंही कमी पडत होती. स्मशानभूमीतील कर्मचारी अंत्यसंस्कार करताना पार थकून गेली होती. तरीही त्यांनी आपले कर्तव्य शेवटपर्यंत सुरूच ठेवले. ही माणसं जिवाची बाजी लावून संकटातही प्रत्येकाला आधार देत होती. प्रत्येक डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागाचे कर्मचारी, रुग्णवाहिकांचे चालक, पोलिस खाते असेल किंवा प्रत्येक सरकारी नोकर असेल, माणसं वाचविण्यासाठी दिवसरात्र एक करीत होते. सर्वत्र शांतता होती. लोक घरांत बसून होते. प्रत्येक कार्यालय बंद होते. रस्ते मोकळा श्वास घेत होते. माणसांनी जणू काही स्वत:ला कोंडून घेतले होते. असे संकट यापूर्वी कधीच आले नव्हते. माणसं वाचवायची कशी, हाच प्रत्येकापुढे प्रश्न होता. धनदौलत, पैसाअडका या काहीचा उपयोग होत नव्हता. जोपर्यंत रुग्ण रुग्णालयाबाहेर येत नव्हता, तोपर्यंत प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका वाढत होता. काय होईल, कसे होईल, आतून कोणता निरोप येईल, अशी भीती मनात दाटून राहत होती. कोरोनाने भल्याभल्यांचा जीव घेतला. एकेका घरातील तर दहा-दहा माणसं. कुठे संगळं कुटुंबच संपलं. कुठे एकुलतं एक पोरगं गेलं, तर कुठे नवरा-बायको गेले. मुलं उघड्यावर पडली. शेकडो महिलांचे कुंकू पुसले. हे सगळं किती आणि आज कसं सांगावं, असा प्रश्न पडतो. पण, हे सगळं घडून गेलं आहे.

हेही वाचा: कृषी कन्या प्रतिक्षा चौधरी कडून शेतकर्‍यांना मार्गदर्शन

मीही काळजी घेतो, तुम्हीही काळजी घ्या !

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तर कोकणगाव (ता. संगमनेर) येथे बोलताना म्हणाले, ‘‘मीही काळजी घेतो, तुम्हीही काळजी घ्या ! प्रत्येकाने कोरोनापासून सावध राहिले पाहिजे.’’ हे सांगताना त्यांनी जवळून ओळखणाऱ्या आणि कोरोनाने हिरावून नेलेल्या माणसांची आठवणही काढली. याचा अर्थ असाच आहे, की तिसरी लाट येऊ द्यायची नसेल, तर मास्कचा वापर करून गर्दी करण्याचे टाळले पाहिजे. आजही जिल्ह्यात रोज हजारांच्या घरात कोरोना रुग्ण आढळत आहेत. आपणा सर्वांसाठी ही धोक्याची घंटा आहे. म्हणूनच सावधान !

loading image
go to top