esakal | बालक-पालक : मोदकं गट्टमयामि!
sakal

बोलून बातमी शोधा

बालक-पालक : मोदकं गट्टमयामि!

बालक-पालक : मोदकं गट्टमयामि!

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

‘‘आई, तू खरंच मोदक करणार नाहीयेस?’’ थोरल्यानं काकुळतीला येऊन विचारलं.

‘‘नाही. एकदा मी ठरवलंय ना, तो संकल्प मी पार पाडणारच!’’ आईनं तिचा निर्धार जाहीर केला.

‘‘अगं पण एकवीस मोदक, एकशे अकरा मोदक, असा संकल्प करतात. तू मोदक न करण्याचा कसला संकल्प करतेस?’’ थोरला वैतागला.

‘‘मी यंदा गणपती बाप्पालाही डाएट करायला लावणार आहे!’’ असं तिनं जाहीर केलं, तेव्हा मात्र आई खरंच सांगतेय, हे थोरल्याच्या लक्षात आलं. बाबांपाशी गाऱ्हाणं गेलं, पण डाएटसाठी बाबांना आईनं आधीच टार्गेट देऊन ठेवलं होतं. किंबहुना, बाबांसाठी म्हणूनच आईनं सगळ्या घराला डाएटच्या तोंडी दिलं होतं, त्यामुळे बाबांपाशी बोलण्यासारखं काही उरलं नव्हतं. मग आजीला मध्यस्थीसाठी गळ घालावी, असं मुलांनी ठरवलं.

‘‘आजी, मोदकांचा नैवेद्य दाखवला नाही, तर बाप्पाला किती वाईट वाटेल!’’ थोरल्यानं आजीच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला.

‘‘आम्ही तर सोसायटीत दुर्वा कुठं मिळतायंत, दास्वंदाचं फूल कुठं मिळेल, सगळं बघून ठेवलंय. हो की नाही रे दादा?’’ छोटी म्हणाली.

‘‘दास्वंद नाही वेडे, जास्वंद’!’’ आजीनं सुधारणा केली.

‘‘हां, तेच ते. पण तू एवढं सगळं करणार आणि गणपतीला मोदकच नाही, कसं वाटेल ते?’’ छोटीनं तिचा मुद्दा काही सोडला नाही.

‘‘तुम्हाला दोघांना मोदक एवढे आवडतात, हे बघून मला आनंद झालेला आहे!’’ आजी म्हणाली. मुलांचे चेहरे उजळले. आजीच काहीतरी करू शकेल, अशी आशा निर्माण झाली. ‘‘पण या बाबतीत तुमची आई जे ठरवेल, तेच करायला हवं.’’ हे पुढचं वाक्य तिनं उच्चारलं आणि मुलं पुन्हा कोमेजली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मामानं घरी एकदम चार नारळ आणून टाकले. ‘गावाहून आलेत,’ म्हणाला. संध्याकाळी आजीनं ‘मोदक करण्याची नवी आधुनिक पद्धत’ असला काहीतरी व्हिडिओ यू ट्यूबवर बघायला घेतला. हे सगळे उद्योग आपल्याला भुलवण्यासाठी चालले आहेत, हे न कळायला आई काही आज सगळ्यांना पहिल्यांदाच ओळखत नव्हती! तिच्या वागण्याबोलण्यात आणि संकल्पात काहीही फरक पडला नाही. कमी गोड, मर्यादित आणि वेळेत जेवण, पालेभाज्या, फळांचा समावेश, प्रोटिन्स जास्त, मसाले कमी वगैरे वगैरे तिचे तऱ्हेतऱ्हेचे उपाय सुरूच राहिले. गणपती आणायची वेळ आली, तरीही आई मोदकाचं नाव काढेना, तेव्हा मात्र घरातली अस्वस्थता वाढली. विरोधी गटातली खलबतं वाढली. गुप्त बैठकांवर बैठका होऊ लागल्या. सत्ताधाऱ्यांना कसं नामोहरम करता येईल, याविषयी चर्चा सुरू झाल्या.

मोर्चा काढायचा, की निदर्शनं करायची, की काळे झेंडे दाखवायचे, वेगवेगळे पर्याय सुचवले जाऊ लागले. कुणीतरी उपोषणाचा मार्गही सुचवला, पण तो पर्याय कुणालाच परवडण्यासारखा नव्हता. आदल्या दिवशी रात्रीच गणपतीबाप्पांची सुबक सुंदर मूर्तीही घरी आली, तरी त्यांच्या नैवेद्याला काय, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं आणि बाबा जरा आरामातच उठले, तेव्हा मोदकांच्या खमंग वासानं घर भरून गेलं होतं. आजी आणि आईनं स्वयंपाकघरात मोदकांचा पहिला हप्ता पूर्णही केला होता. आई आणि आजी दोघी मिळून आपली फिरकी घेत होत्या, हे तिघांच्या लक्षात आलं.

‘‘डाएट चालूच राहणार आहे, पण मोदक केलेत. बाप्पालाही यंदा अकराच मोदकांचा नैवेद्य आहे!’’ आई म्हणाली आणि सगळं घर खिदळायला लागलं.

loading image
go to top