esakal | कागदीपुऱ्यातील ऐतिहासिक गणपती : सूर्यमुखी गणेश
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

कागदीपुऱ्यातील ऐतिहासिक गणपती : सूर्यमुखी गणेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गणपती शिवलिंगाची पूजा करीत आहे, असे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर कसबा पेठेतील कागदीपुरामध्ये आहे. गणपतीचे तोंड पूर्वेकडे असल्याने सूर्यमुखी गणपती म्हणूनही याची ओळख आहे. सोमवार पेठेतून नागझरीकडे येताना असलेल्या पुलावरून कसबा पेठेत पुढे सरळ गेल्यावर हे मंदिर दिसते.

साधारणपणे देवळात मूर्ती दगडी बैठकीवर जमिनीपासून उंचावर असते. मात्र येथे गणेशमहाराज भूमीवरच ठाण मांडून बसले आहेत. चतुर्भुज शेंदरी आणि सुमारे तीन फूट उंचीची ही मूर्ती आहे. पुढचे दोन्ही हात पुढून दिसतात तर मागील बाजूस गेल्यावर मागेही दोन हात असल्याचे कळून येते.

सोंड डाव्या हातावर असून बहुदा तेथे मोदक अथवा मोदकपात्र असावे. एक पाय दुमडून, दुसरा पाय काहीसा पसरलेला अथवा लांब केलेला आहे. पायाशी मोठे काळ्या दगडातील शिवलिंग असून समोर छोटा नंदी आहे. गणपती जणू काही शिवलिंगाचीच पूजा करीत आहे. शिवलिंग आणि गणपती हे एकाच अखंड दगडात आहेत. गणपतीसमोर मोठे शिवलिंग क्वचित बघावयास मिळते. एका अखंड दगडातील गणपती व शिवलिंगाचे हे एकमेव स्थान असावे. मूर्तीच्या स्थापनेबद्दल निश्‍चित माहिती मिळत नाही, मात्र फार पूर्वी ही मूर्ती शेतात झाडाखाली होती, असे काही जण सांगतात.

loading image
go to top