esakal | Ganesh Chaturthi 2021 : गणपती, गौर आणि वनस्पती
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Chaturthi 2021 : गणपती, गौर आणि वनस्पती

Ganesh Chaturthi 2021 : गणपती, गौर आणि वनस्पती

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

-चित्कला कुलकर्णी

निसर्ग नेहमीच फुलत, फळत, बहरत असतो. प्रत्येक ऋतूत त्याचं वेगळंच रूप! श्रावण, भाद्रपदातला बहर तर अतिशय नयनरम्य! चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारे हे महिने. किती किती तऱ्हेच्या वनस्पती आजूबाजूला दिसत असतात! नाना तऱ्हेच्या वनस्पतींचा जणू उत्सवच! निसर्गाच्या याच उत्सवात भर पडते ती मंगळागौर, हरितालिका, गणपती आणि गौरी या उत्सवाची! हे उत्सव आले की आठवते ती एकवीस प्रकारच्या वनस्पतींची पत्री.

हेही वाचा: विदर्भात उभारली उजव्या सोंडेच्या गणपतीची मंदिरे

पूर्वी बऱ्याच प्रकारची पत्री परसदारीच मिळायची. माहिती असलेल्या वनस्पतींची पानं पाहताना त्यांच्यातली नवीनच कळा जाणवायची आणि मन लोभावून जायचं. गवत, झुडूप, वृक्षवेलींची ओळख, गुणवैशिष्ट्यं समजत जायची आणि वनस्पतींच्या रूपाची पाळंमुळं मनात घट्ट रुजायची. दूर्वा, आघाडा, केना, धोतरा, तुळस, बेल, माका, बोर, शमी, कण्हेर, मंदार (रुई), अर्जुन, मरवा, पिंपळ, डाळिंब, अगस्ती, केवडा, जाई, डोरली, देवदार, मालती अशा एकवीस वनस्पतींची ओळख झाली ती या उत्सवातच. आजही, जेव्हा जेव्हा या वनस्पती पाहते, तेव्हा त्या आठवण करून देतात पूर्वी साजरे केलेले उत्सव. आता परसदारही गेलं आणि एवढ्या प्रकारच्या वनस्पतीही मुबलक प्रमाणात उरल्या नाहीत. उरलं फक्त ओरबाडणं!

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2021: गणेश मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता?

सकाळच्या प्रसन्न वातावरणात घराच्या परसदारात किंवा आसपास असलेल्या एकवीस प्रकारच्या पत्री गोळा करताना कित्ती आनंद व्हायचा! प्रथम गोळा केल्या जायच्या दूर्वा! तरतरीत तीन पानांची एक-एक काडी खुडून एकवीस दूर्वांची जुडी बांधली जायची. ज्याला आपण दूर्वा म्हणतो, ते एक प्रकारचं गवतच! या दूर्वा अतिशय औषधी! उष्णता, पित्त, बद्धकोष्ठता, रक्तशुद्धी अशा अनेक विकारांवर दूर्वा अत्यंत गुणकारी! दूर्वांना मुळं भरपूर! म्हणून ती शतमूला या नावानंदेखील ओळखली जाते. पानं वाळली तरी मुळं जिवंत राहतात, म्हणून ती चिरंजीव! याशिवाय हरळी म्हणूनही आपल्याला ती परिचित आहेच.

हेही वाचा: गणरायाबद्दल 'या' काही खास गोष्टी तुम्हांला माहितीयेत का?

दूर्वांच्या जुडीत आघाड्याची पानं हमखास बांधली जातात. आघाडा तसा कुठंही पडीक मोकळ्या जागेत, अगदी सगळीकडे आघाडीवर! आघाड्याच्या पानांचा आकार, स्पर्श मला मोहवतो. ती गोलाकारात असली तरी थोडी लांबट! पानांची वरची बाजू इतर पानांसारखी असली तरी उलट बाजूला पाहा.. किती मऊ मऊ पांढरट लव असते! पुनःपुन्हा हात फिरवून तो मऊ स्पर्श अनुभवत राहावा असं वाटत राहतं. पावसाळा संपला की याच्या फांदीच्या टोकातून एक लांबट, लवचिक कणीस फुटून त्यावर अनेक हिरवट पांढरी इवलिश्शी फुलं येतात. याच्या फळांना असतात लहान-लहान काटे! याच्या जवळून चालत जाताना लक्ष नसलं, की काटे असलेल्या बिया कपड्यात घुसतातच. आपल्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा हे काटे, आपण जिथं असू तिथंच थोडं वैतागून काढून टाकतो. झाला ना आपोआप बीजप्रसार! आपल्यामार्फत बीजप्रसार झालाय ते आपल्यालाच कळतही नाही. आपला वैताग हीच आघाड्याची खुशी! आहे ना गंमत! गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्यांच्या अंगावर चिकटूनही आपोआप बीजप्रसार होत जातो. आपलं वंशसातत्य टिकून राहावं, पसरत राहावं यासाठी किती गुपचूपपणे योजना केलीय त्यानं! आघाडाही अत्यंत गुणकारी! स्त्रियांच्या आजारावर उपयुक्त असलेला हा आघाडा कफनाशक आणि विष दूर करण्यासाठीही विशेष उपयोगी आहे. असा हा सर्व आघाड्यांवर असलेला आघाडा!

हेही वाचा: Ganesha Festival 2021 : पूजन आराध्य देवतेचे!

आघाड्याला जोडून नाव येतं ते केन्याचं! पावसाळ्यात बघा... रस्त्याच्या कडेनं, मोकळ्या जागेत कुठंही मनसोक्त पसरलेला हा केना! याची पानं आकारानं लांबट! याच्या पानांची कधी भजी तळून खाल्ली? हो, पाऊस पडत असताना मुद्दाम करून खाऊन पाहा. आहाहा! खमंग, कुरकुरीत! केन्याची फुलंदेखील अत्यंत देखणी! आकर्षक निळसर रंगाची! जणू या अफाट निळसर आकाशाचा अंशच उतरलेला असतो या फुलात! निळसर रंगाच्या दोन पाकळ्या चटकन लक्ष वेधून घेतात. त्यावर दिसते एक पांढरट रंगाची पाकळी. त्या पांढरट पाकळीवर असते आणखी एक इवल्याशा पिवळसर पाकळ्यांची रचना आणि त्यातून बाहेर पडतात तरतरीत स्त्रीकेसर आणि पुंकेसर! निसर्गाची एक अप्रतिम कलाकृती!

maka

maka

माका ही देखील बहुवर्षायु वनस्पती! माका म्हटलं की आठवतं ते माक्याचं तेल! लांबलचक, काळ्याभोर केसांचं रहस्य दडलेलं असतं यात! खरं तर हा माका आपल्या आसपासच्या जागेत असतोच; पण जरा डोळे नीट उघडे ठेवून पाहायला हवं ना आपण! रस्त्याच्या कडेला, अगदी गटाराच्या कडेला देखील उगवलेला असतो. माक्याचं खोड आणि फांद्या केसाळ असतात. माक्याची पानं खरखरीत! साधीच आणि समोरासमोर असलेली. भालाकृती! यांचं वैशिष्ट्य म्हणजे, पानांना देठच नसतं. पानं थोडी चुरडून पाहा. काही क्षणांतच बोटांना काळसरपणा येतो. म्हणून तर या पानांपासून तेल तयार करतात! पानांच्या बगलेत किंवा फांदीच्या टोकावर गोल पांढऱ्या रंगाची फुलं येतात. जणू चांदण्याचीच फुलं! माक्याची पंचांगं औषधी! कावीळ, मूळव्याध अशा अनेक विकारांवर माका उपयोगी! पण केसांचं पोषणमूल्य जपण्यासाठीच माक्याचा अधिक उपयोग केला जातो.

terada

terada

पावसाळ्यात फुलणारी आणखी एक वनस्पती म्हणजे तेरडा! गौरीसाठी विशेष महत्त्वाची! या झाडाला गौरी किंवा गौरीची फुलं असंच म्हटलं जातं. जांभळा, गुलाबी, लाल, पांढरा... एकापेक्षा एक सुंदर रंगानं नटलेली नाजूक फुलं असतात गौरीची! पाकळ्यांची रचनाही तऱ्हेतऱ्हेची! एकेरी, दुहेरी!! या महिन्यात कास पठारावर नजर टाकावी तिकडं दिसतो फुललेला तेरडाच तेरडा! अक्षरशः रंगपंचमी! तेरड्याची फुलं झाडावर दोन-तीन दिवस छान टिकतात. फुलं गळून पडली की त्यावर फळं धरतात. या फळांचं वैशिष्ट्य म्हणजे थोड्या तयार झालेल्या फळांना हात लागला की तडकून उडतात. जणू ती सांगतात, ‘टच मी नॉट!’ भारतात तेरड्याच्या वंशातील जवळपास दीडशे जाती आढळतात, असं विश्वकोशात वाचनात आलं.

एकवीस पत्री किंवा वनस्पतींमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. या वनस्पतींचं गुणगान किती गावं! विशेषतः भाद्रपदात निसर्ग फुलतो, फळतो. पृथ्वी धान्यानं समृद्ध होते. खरिपाचं धान्य घरी येतं. आपले पूर्वज कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपदात पृथ्वीरूपी गौर आणि गणपतीची पूजा करत. ती कशी? तर, नदीकाठच्या मातीचा गणपती तयार करून तिथेच असलेल्या वनस्पतींनी त्या मूर्तीची पूजा करत, आणि तिथेच नदीकाठी विसर्जित करत. यामागचा उद्देश, पृथ्वीविषयी कृतज्ञता हा भाव! वनस्पतींची गुणवैशिष्ट्यं समजून घेऊन उपयोग करावा, या वनस्पतींची जोपासना करावी, हाच उद्देश होता आपल्या पूर्वजांचा! मातीच्या पोटी नाना तऱ्हेच्या औषधी वनस्पती आहेत. ‘पत्रेपुष्पे फळेमुळे नाना वर्ण नाना रसाळे ।’ असं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे तेच खरं! या उत्सवाच्या निमित्तानं हे वनस्पती विश्व समजून घेऊन, जोपासना करायला हवी. हो ना?

loading image
go to top