esakal | गणेशोत्सव 2021 : गणेश चतुर्थीचे महत्त्व
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Chaturthi

गणेशोत्सव 2021 : गणेश चतुर्थीचे महत्त्व

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव 2021 : गणेश उपासनेमध्ये ‘चतुर्थी’ या तिथीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता चतुर्थी म्हणजे नक्की काय ते बघू. अमावास्येनंतर चंद्राची एकेक कला वाढते व पौर्णिमेला संपूर्ण कलांनी युक्त असे चंद्रबिंब दिसते. पौर्णिमेनंतर चंद्राची एकेक कला कमी होत जाते व अमावास्येला चंद्रबिंब दृश्‍यमान होत नाही. चंद्राची जी कला आहे त्यास ‘तिथी’ असे म्हणतात. ज्या वेळी चंद्र आकाशात ४ कलांनी युक्त असतो तेव्हा चतुर्थी तिथी असते. या चतुर्थी २ प्रकारच्या आहेत. शुक्‍लपक्षात येणारी व कृष्णपक्षात येणारी. शुक्‍लपक्षात येणाऱ्या चतुर्थीस विनायकी, तर कृष्णपक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.

हेही वाचा: गणेशोत्सव 2021 : गणेशाचे वाहन मूषकच का?

चैत्र ते फाल्गुन या महिन्यांत शुक्‍लपक्षात येणाऱ्या विनायकी चतुर्थीस वेगवेगळे गणेश अवतार पूर्वी झालेले आहेत. परंतु, भाद्रपद महिन्यात येणाऱ्या विनायकी चतुर्थीसच एवढे महत्त्व का?, असा प्रश्‍न पडतो. यामागे गूढ रहस्य आहे. ‘विनायकी’ शब्दाची संख्याशास्त्रानुसार मांडणी केल्यास : ‘व’ म्हणजे ४, ‘न’ म्हणजे ० (शून्य), ‘य’ म्हणजे १, ‘क’ म्हणजे १ अशा संख्या व्यक्त होतात. ‘अंकानां वामनो गतिः’ या सूत्रानुसार विनायकी शब्दाने ११०४ ही संख्या व्यक्त होते. ११०४ या संख्येची बेरीज केल्यास ६ ही संख्या येते. ६ संख्येने ६ वा महिना ‘भाद्रपद’ व्यक्त होतो. ११०४ या संख्येतील ०४ या आकड्याने चतुर्थी ही तिथी व्यक्त होते व ११ आकड्याने कृत्तिकेपासून ११ वे हस्त नक्षत्र व्यक्त होते.

हेही वाचा: गणेशोत्सव 2021 : गणेशाची मूर्ती कशी असावी?

‘शतपथब्राह्मण’ या ग्रंथानुसार प्राचीन काळी नक्षत्रांची गणना कृत्तिकेपासून होत होती, असे सांगितलेले आहे. थोडक्‍यात, ‘विनायकी’ या शब्दाने भाद्रपद शुक्‍ल चतुर्थी, हस्त नक्षत्र असा अर्थ निघतो. भाद्रपद महिन्यातील विनायकी चतुर्थी हस्त नक्षत्रावर आल्यास अतिशय प्रशस्त सांगितलेले आहे. त्यामुळे वर्षभरातील चतुर्थींमधील भाद्रपद महिन्यातील शुक्‍ल चतुर्थीस विशेष महत्त्व आहे.
- गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

loading image
go to top