esakal | Ganesh Chaturthi : गणेशाची मूर्ती कशी असावी?
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati festival 2021

गणेशोत्सव 2021 : गणेशाची मूर्ती कशी असावी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव 2021 : भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीनिमित्त घरी स्थापन केली जाणारी गणेशमूर्ती कशी असावी, याबद्दल मूर्तिशास्त्र व धर्मशास्त्रात विवेचन केलेले आहे. ‘अंगुष्ठपर्वादारभ्य वितस्तिं यावदेव तु। गृहेषु प्रतिमा कार्या नाधिका शस्यते बुधैः।।’

हेही वाचा: गणेशोत्सव 2021 : गणेशाचे वाहन मूषकच का?

अर्थात्‌, अंगठ्याच्या पेराच्या मापापासून ते १२ अंगुल परिमाण असलेली मूर्ती घरी स्थापन करावी, त्यापेक्षा मोठी मूर्ती स्थापन करू नये. गणपतीची मूर्ती आणताना ती शाडूमातीची व सुबक असावी. पद्मासन घातलेली, ४ हात असलेली, लाल वस्त्र किंवा लाल शेला परिधान केलेली गणेशमूर्ती जास्त प्रशस्त सांगितलेली आहे. गणेशमूर्तीचे विसर्जन हे पाण्यात करावे लागते. कारण गणपती ही देवता जलतत्त्वाची अधिपती देवता सांगितलेली आहे. कपिलतंत्रात ‘जीवनस्य गणाधिपः’ असा स्पष्ट उल्लेख आलेला आहे.

हेही वाचा: गणेशोत्सव 2021: कोल्हापूरातून एक लाख मूर्ती जाणार परराज्यात

प्रत्येक देवतेचे पूजन करताना त्या त्या देवतेचे स्वतंत्र अष्टगंध सांगितलेले आहे. गणेशाचे पूजन करताना ‘केशरं रोचना मांसी कस्तुरी अगरुस्तथा। सुचंदनं तथा मुस्था रक्तचंदनमष्टमम्‌।।’ अर्थात्‌ गणपतीचे अष्टगंध तयार करताना केशर, गोरोचन, जटामांसी, कस्तुरी, कृष्णागुरू, चंदन, नागरमोथा व रक्तचंदन हे ८ जिन्नस वापरावेत असे सांगितलेले आहे. तसेच, चिंतामणीकल्प या प्राचीन ग्रंथात गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत मोरयाला कोणते विशेष नैवेद्य दाखवावेत त्याविषयी माहिती दिलेली आहे.

चतुर्थीस - अनारसे, पंचमीस - उडदाच्या डाळीचे वडे, षष्ठीस - पुऱ्या, सप्तमीस - घारगे, अष्टमीस - पंचपक्वांनांचे जेवण, नवमीस - पायस (तांदळाची खीर), दशमीस - दूध, एकादशीस - पंचखाद्य, द्वादशीस - केळी, त्रयोदशीस - डाळिंब, अनंत चतुर्दशीस - जांभूळ याप्रमाणे नैवेद्य दाखवावेत.
- गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

loading image
go to top