esakal | जर्मनीत लेझीम; बर्लिनमध्ये मिरवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati

जर्मनीत लेझीम; बर्लिनमध्ये मिरवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणरायाच्या स्वागतासाठी अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, फ्रांस, बेल्जियम, नेदरलँड, लक्समबर्ग आदी देशांत राहणाऱ्या भारतीयांमध्येही लगबग आहे. जर्मनीमधील महाराष्ट्रीय मंडळींनी तर महिला पथकासाठी यंदा महाराष्ट्रातून लेझीम मागविल्या आहेत आणि बर्लिनमध्ये मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचे नियोजन केले आहे. तर, हाँगकाँगमधील मराठी जणांनी पुण्यातून मोदक मागविले आहेत.

बर्लिन शहरात ‘मराठी मित्र बर्लिन’ यावर्षी गणेशाची पालखीतून मिरवणूक काढणार असून लेझीम व ढोल पथकासहीत गणपती बप्पांचे आगमन करणार आहे. त्यांच्याकडे २०१८ पासून ढोल पथक असले तरी, यंदा महिलांच्या लेझीम पथकाचाही त्यांनी समावेश केला आहे. त्यासाठी गेल्या ३ महिन्यांपासून दर शनिवार-रविवारी त्यांचा सराव सुरू आहे.

त्यासाठी ढोल पुण्यावरून तर लेझीम आणि वेशभुषेसाठी लागणारे साहित्य महाराष्ट्रातून मागविले आहेत. मिरवणुकीतील पालखी बर्लिनमध्येच तयार केलेली आहे. या पथकात सहभाग घेणारे नागरिक फक्त बर्लिनच नाही तर शेजारील शहरातील आणि फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड, लक्समबर्ग आदी देशातीलही आहेत. गणरायाची मिरवणूक बर्लिन शहरातील एका प्रमुख रस्त्यावरून निघणार आहे.

हेही वाचा: हरियाणामध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर पुन्हा पाण्याचे फवारे

अमेरिकेतील उत्तर कॅरोलिन राज्यातील रॉली या शहरात महाराष्ट्र मंडळ ढोल-ताशा पथकासहीत गणपती बाप्पांचे स्वागत करणार आहे. गणपतीसाठी जास्वंदांची फुले असावी म्हणून उन्हाळ्यातच ती झाडे लावण्यात आली आहे. ढोल ताशा पथकांचा सराव सुरू आहे. तेथे सहभाग घेणाऱ्यांचे कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस झाले आहेत. इंडियन स्टोअरमध्ये गणपतीच्या मूर्त्या, पूजेचे साहित्य, नारळ, धूप, कापूर, सजावटीचे सामान, पणत्या उपलब्ध आहेत. सजावट ईको फ्रेंडली असावी असा प्रयत्न अमेरिकेत होत आहे.

गणपतीच्या १० दिवसांमध्ये महाराष्ट्र मंडळात अनेक स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. हाँगकाँगमध्येही जुलैपासून गणेश उत्सवाची तयारी सुरू आहे. जुलैमध्ये सुट्ट्या असतात. त्याचदरम्यान लाहान मुले वेगवेगळ्या सादरीकरणांची तयारी सुरू करतात आणि घरगुती सजावटही करतात. या मंदिरात १० दिवस गणपती बसवून सुंदर आरास मांडून आरती आणि नैवेद्य केला जातो. काही भारतीयांनी तर, पुण्यातून मोदकांचीही ऑर्डर केली आहे.

हेही वाचा: 'पाकिस्तान मुर्दाबाद' घोषणा देणाऱ्यांवर तालिबानकडून गोळीबार

मराठी मित्र बर्लिन हे मराठी भाषा आणि संस्कृतीबद्दल प्रेम असणाऱ्या सर्वांसाठीच खास आहे. विविध ठिकाणचे जरी लोक असले तरी सराव कोणी चुकवला नाही. बर्लिन शहर प्रशासन आणि गणेश मंदिराने केलेले सहकार्य कौतुकास्पद आहे. यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करणे शक्य आहे

- सानिका बर्वे, बर्लिन, जर्मनी

आमची जन्मभूमी भारत आहे आणि कर्मभूमी अमेरिका, मात्र बाप्पा कायम हृदयात आहे. सातासमुद्रापार जरी असलो तरी उत्साह तितकाच आहे. गणपतीच्या आगमनाची आतुरता आहे.

- जाई पवार, रॉली, अमेरिका

स्वदेशापासून दूर असलो तरी आम्हाला सर्व सण साजरे करायला आवडतात. मी वाळू आणून गणपती चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेची पूजा करते. इकडे होणाऱ्या गणेश उत्सवात मी आणि माझे कुटुंब आवर्जून सहभाग घेतो.

- जान्हवी चंद्रात्रे, हाँगकाँग

loading image
go to top