esakal | सगुण-निर्गुणस्वरूपी भूमाता
sakal

बोलून बातमी शोधा

 Ganpati

सगुण-निर्गुणस्वरूपी भूमाता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

प्राकृतिक स्रोतांचा क्षय होत नसल्याने त्याला अक्षयऊर्जा म्हणून ओळखले जाते. श्री गणेशाच्या आगमनाने, त्याच्या रूपाने पृथ्वीवरील ही ऊर्जा अशीच अक्षय राहावी, यासाठी सर्वांनीच कार्य करणे आवश्यक आहे. पृथ्वीवरील ऊर्जेचा हा ठेवा जपण्याचा विचार गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकाने केला पाहिजे. ऊर्जेची विविध रूपे या सदरातून मांडत आहोत.

‘बिग बॅंग’ नामक स्फोटातून ‘ॐकार’ उमटला आणि पंचमहाभूतांच्या सान्निध्यात, वातावरण आणि जलावरणात लपटलेली, स्वतःच्याच तालात स्वतःभोवतीच गिरक्या घेत सूर्यदेवालाही प्रदक्षिणा घालणारी वसुंधरा विश्वात सामावली गेली, ४५० कोटी वर्षापूर्वी. तेव्हापासून वसुंधरेचं शिलावरण सूर्यदेवाची तप्त किरणे अंगावर झेलत, वरुणराजाला सहन करत, हवेचे झोत अंगावर खेळवत होणाऱ्या अपक्षयामुळं झिजत आहे.

अशा झिजण्यातून अग्निज खडकांचं स्तरीत आणि अखेरीस रूपांतरित खडकांत होणारी स्थित्यंतरे सहन करताना आपल्या उदरात सजीवांच्या उपभोगासाठी ऊर्जामय खनिजेही सामावून घेत आहे. अशा या खडकचक्राचे आविष्कार जपणाऱ्या शिलावरणाला, केवळ ५० हजार वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या, स्वतःला भूमिपुत्र म्हणवून घेणाऱ्या मानवाने निर्जीव म्हणून संबोधणे, ही कृतघ्नताच.

हेही वाचा: बेळगाव जिल्ह्यात हवाई, नौदलाने वाचविले 45 जणांना

अपक्षयांतून निर्माण झालेला माती मुरुमाचा थर, मृदावरण म्हणजे भूमातेचं वस्त्र आणि त्यात झिरपून निर्माण होणारं भूजल म्हणजे दूधच. हा थर म्हणजे, वसंत-ग्रीष्मातील दाहकता, वर्षा-शरदातील पर्जन्यवृष्टी, हेमंत-शिशिरातील थंडावा... ऋतुमानाप्रमाणे सारं सहन करत, सर्वांना सामावून घेत, त्यांच्याशी तादात्म्य साधत वेळोवेळी बदलणारे साक्षात देवी मातेचे रूपच. उन्हाळ्यात तहानलेली भूमी वरुणराजाच्या पहिल्या शिडकाव्यात रोमांचित होऊन आसमंतात मृदगंध पसरविणार, भूजल आणि जलसाठे समृद्ध करणार, त्या समृद्धीतून फळा-फुलांनी झाडे बहरणार, सुगंध दरवळणार, शेताशेतांमधून पीकं डोलू लागणार, कणसं भरू लागणार. यामुळेच आकाशात विहंगणाऱ्या पक्षांचे, जंगलात वास्तव्य करणाऱ्या प्राण्यांचे, वृक्ष-वेली आणि समग्र जीवसृष्टीचे अस्तित्व जपलं जाणार.

याच जीवसृष्टीच्या उत्क्रांतीतून विधात्याने मेंदू आणि मन, एक सगुणाचं तर दुसरं निर्गुणाचं रूप, असलेल्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांत गुरफटलेला मानव निर्माण केला. भूमातेच्या देण्यातून तो आपल्या भौतिक गरजा भागवू लागला. त्याचबरोबर भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्ती अनुभवू लागला. गरजांतून तो लोभी बनला तर आपत्तींमुळे होणाऱ्या विध्वंसाला आणि जीवनाच्या क्षणभंगुरतेला भिऊ लागला, सुखदुःखाच्या फेऱ्यात अडकला. अधिक सुख मिळण्यासाठी, भीती अन् दुःख दूर ठेवण्यासाठी, संकटात आधार शोधण्यासाठी, मनः शांती मिळविण्यासाठी त्याच्या मनात रुजलं श्रद्धेचं निर्गुण रूप आणि त्याच्याशी एकाग्रता साधण्यासाठी उभी राहिली सगुण रूपात प्रार्थनास्थळे, तीही भूमातेच्याच अंगणात!

हेही वाचा: पुण्यात संचारबंदी नाही, जमावबंदी लागू; वाचा काय आहे आदेश?

या श्रद्धेचं एक सगुण रूप म्हणजे सुखकर्ता आणि दुःखहर्ता श्री गणेश. यज्ञयाग असो वा मंगल कार्य प्रथम पूजेचा मान श्रींचाच. प्रतिवर्षी गणेशाची मूर्ती ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषात घराघरांत, चौकाचौकांत विराजमान होते. त्याच्या आगमनानं वातावरण चैतन्यमय होतं. त्याच्या पूजेसाठी लागणारी फुलं, तुळशी, दूर्वा, अक्षदा, पंचपळीपात्र, आरतीसाठी तेल तूप धूप, प्रसादासाठी खिरापत, नैवेद्यासाठी मोदक, आगमनाच्या वेळी निघणारे सनई-ताशाचे सूर, विसर्जनाच्या मिरवणुकीत घुमणारे टाळ-मृदुंग, ढोल-झांजांचे ध्वनी आणि होणारी गुलालाची उधळण. या साऱ्यांच्या उपलब्धतेतून निर्माण होणाऱ्या, श्रीगणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत, चैतन्यमय वातावरणाला निमित्तही भूमाताच.

तिच्या अशा सर्जनशीलतेतून ईश्वर चराचरांत आहे, सर्वव्यापी आहे ही जाणीव समृद्ध होते. या निर्गुणाशी अनुसंधान साधण्यासाठी, मातीची असो वा शाडूची, साक्षात अक्षय उर्जेचं स्वरूप श्रींची मूर्ती भक्तिभावानं पुजली जाते. श्रींची अशी आराधना म्हणजे भूमातेचीच पूजा. अशा पूजेतून ‘भेटी लागी जीवा’ या आर्त ओढीतून, आरत्यांच्या गजरांतून मूर्ती सभोवताल ऊर्जावलये निर्माण होतात आणि त्याचा अनुग्रह भाविकांना वेगवेगळ्या रूपांत पोहोचतो, म्हणून श्रींच्या आराधनेचा प्रपंच. तो श्रद्धेने मांडावा, ऊर्जाप्राप्ती, मन:शांती आणि समाधान लाभण्यासाठी.

(लेखक भूपर्यावरणाचे अभ्यासक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख आहेत.)

loading image
go to top