esakal | Ganesh Chaturthi 2021 : श्रीगणेश पूजेची प्रथा कधी सुरू झाली? चतुर्थीचा दिवस कसा ठरतो?
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीगणेश पूजेची प्रथा कधी सुरू झाली? चतुर्थीचा दिवस कसा ठरतो?

श्रीगणेश पूजेची प्रथा कधी सुरू झाली? चतुर्थीचा दिवस कसा ठरतो?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

- दा. कृ. सोमण

गणपती बाप्पाचे यावर्षी शुक्रवार, १० सप्टेंबरला आगमन होत आहे. गणेश हा चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. श्रीगणेशाचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी आपण श्रीगणेशपूजा करीत असतो. गणेशाची पूजा भीतीने करू नका. गणपती हा कुणाचे वाईट करीत नसतो. तो सुखकर्ता आहे, तो दु:खहर्ता आहे. गणेशपूजनाने आपल्यात चांगला बदल व्हायला पाहिजे. तसे करणे हे आपल्यलाच करायचे असते. अजून आपली कोरोनाशी लढाई चालूच आहे. म्हणून याहीवर्षी सर्व नियम पाळूनच गणेशोत्सव साजरा करावयाचा आहे.

हेही वाचा: पर्यावरणपूरक मूर्तीद्वारे करणार मदत

श्रीगणेशपूजेची प्रथा कधी सुरू झाली , या विषयी विद्वानांत मतभेद आहेत. डॅा.रामकृष्ण भांडारकरांच्या मते गणेशपूजा पाचव्या ते आठव्या शतकात सुरू झाली असावी. परंतु काही पंडितांच्या मते श्रीगणपती अथर्वशीर्ष इतके जुने आहे, त्याअर्थी गणेशपूजा साडेतीन हजार वर्षांपूर्वी वैदिक काळीही प्रचलित असावी . भारताप्रमाणेच नेपाळ, तिबेट,ब्रह्मदेश, थायलंड, इंडोचायना, चम्पा, जावा, बाली, बोर्निओ, श्रीलंका, चीन, तुर्कस्थान, जपान आणि मेक्सिको येथेही प्राचीन गणेशमंदिरे आहेत.

हेही वाचा: मातीचा गणपती कसा ओळखाल? वाचा भन्नाट टिप्स

प्राचीनकाळचे गणेश विषयक माहिती असलेले श्रीगणेशपुराण आणि श्रीमुद्गलपुराण हे ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. भाद्रपद शुक्ल चतुर्थी मध्यान्हकालव्यापिनी असेल तर तो दिवस श्रीगणेश चतुर्थीचा मानावा असे शास्त्रात सांगितलेले आहे. मध्यान्हकाल म्हणजे कोणता तेही सांगतो. दिनमानाचे पाच समान भाग करावे. पहिला प्रात:काळ, दुसरा संगवकाळ, तिसरा मध्यान्हकाल, चौथा अपराण्हकाल आणि पाचवा सायंकाळ मानला जातो. दोन्ही दिवशी संपूर्ण, अथवा कमी-जास्त मध्यान्हकालव्यापिनी असेल किंवा दोन्ही दिवशी मध्यान्हकालव्यापिनी नसेल तर पूर्व दिवशीची घ्यावी असेही शास्त्रात सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे यावर्षी शुक्रवार, १० सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी आली आहे.

हेही वाचा: Ganesha Festival 2021 : पूजन आराध्य देवतेचे!

गणपतीची एकूण अकरा प्रमुख व्रते सांगण्यात आली आहेत.

(१) वरद चतुर्थी व्रत

(२) दूर्वा गणपती व्रत

(३) एकवीस दिवसांचे गणपती व्रत

(४) कपर्दी विनायक व्रत

(५) पार्थिव गणेशपूजा व्रत

(६) गणेश चतुर्थी व्रत

(७) वटगणेश व्रत

(८) संकष्ट हर चतुर्थी व्रत

(९) तिळी चतुर्थी व्रत

(१०) अंगारकी चतुर्थी व्रत

(११) संकष्ट चतुर्थी व्रत, अशी व्रते सांगण्यात आली आहेत.

(लेखक ; पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक)

loading image
go to top