esakal | Ganesha Chaturthi 2021 : गणेश पुजनासाठी मातीचीच मूर्ती का?
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesha Chaturthi 2021 : गणेश पुजनासाठी  मातीचीच मूर्ती का?

Ganesha Chaturthi 2021 : गणेश पुजनासाठी मातीचीच मूर्ती का?

sakal_logo
By
टीम ई सकाळ, राजकुमार भीतकर/विनोद कोपरकर

- दा. कृ. सोमण

गणेश हा चौदा विद्या , चौसष्ट कलांचा अधिपती आहे. भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे आज घरोघरी आगमन होत आहे. कित्येक जण घरीच मातीची मुर्ती तयार करून बाप्पाची मनोभावे पुजा करतात. सध्या शाडुच्या मातीच्या गणेश मुर्तीला खूप पसंती मिळते.

मातीचीच मूर्ती का ?

वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर श्रीगणेश चतुर्थीबद्दल सांगायचे असेल तर भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्यामुळे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन करून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. नंतर पितृपक्ष येतो. त्यावेळी आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यानंतर आश्विन महिना येतो. त्या महिन्यात शेतात तयार झालेले धान्य घरात येत असते. पृथ्वीच्या निर्मिती शक्तीमुळे हे धान्य तयार होत असते. म्हणून आश्विनातील नवरात्रात निर्मितीशक्तीची पूजा केली जाते. निर्मितीशक्ती हीच आदिशक्ती आहे. त्यानंतर दसरा, दिवाळी इत्यादी सण येत असतात. भारत हा शेतीप्रधान देश असल्यानेच शेतीवर व ऋतूंवर आधारित अशी सणांची रचना केलेली आहे. आवाहन, आसन, पाद्य,अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत , गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचारांनी केलेल्या पूजेला ‘ षोडशोपचार पूजा ‘ असे म्हणतात.

ganesha-1.jpg

ganesha-1.jpg

हेही वाचा: उत्सव वैश्विक चिंतनाचा, जनकल्याणाचा, लोकजागराचा!

घराघरात श्रीगणेशमूर्तीची स्थापना करून गणेश चतुर्थीला तिची पूजा केली जाते. प्राणप्रतिष्ठा मंत्राने मूर्तीमध्ये देवत्त्व आणले जाते. दीड, पाच, गौरींबरोबर सात किंवा दहा दिवस गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. विसर्जनाच्या दिवशी उत्तरपूजेच्या मंत्रांनी मूर्तीमधील देवत्त्व काढून घेऊन गणेशमूर्तीचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते. घरगुती गणेशोत्वाच्या निमित्ताने घराची स्वच्छता केली जाते. श्रीगणेशाचे दर्शन घेण्यासाठी आप्तेष्ट, मित्रमंडळी एकत्र येत असतात. सर्वजण दु:ख, चिंता, काळजी विसरून गणेशोत्सवात सामील होत असतात. श्रीगणेश हा सुखकर्ता आहे, तो दु:खहर्ता आहे. तो विघ्नांचे निवारण करणारा आहे. तो बुद्धिदाता आहे अशी उपासकांची श्रद्धा असते. हा उत्सव घराघरात आनंद निर्माण करून जातो. हा आनंद पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत भाविकांना सुखी ठेवत असतो.

हेही वाचा: Pune : दूर्वाही झाल्या दुर्लभ...

Ganesha's vahana Mouse

Ganesha's vahana Mouse

आधुनिक काळातील गणेश पूजन

आधुनिक कालातील घरगुती गणेशोत्सवाबद्दल सांगायचे म्हणजे लोकसंख्या वाढल्याने घरगुती गणेशोत्सवांची संख्याही वाढली आहे. तसेच पूर्वींपेक्षा माणसांची आर्थिक क्षमताही वाढली आहे. गणेश दैवताची लोकप्रियताही वाढली आहे. लोक घरगुती गणेशोत्सवावरही जास्त खर्च करू लागले आहेत. लोक धार्मिकतेपेक्षा सांस्कृतिक गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. वाढती असुरक्षितता, प्रत्येक क्षेत्रामध्ये जीवघेणी स्पर्धा, कमी श्रमात मोठे यश मिळविण्याची इच्छा यामुळे माणसांचा स्वकर्तृत्वापेक्षा दैवावर जास्त विश्वास बसू लागला आहे. घरगुती गणेशोत्सवांची संख्या वाढल्याने पर्यावरणासंबंधीचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. गणेशोत्सवामुळे जलप्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात येऊ लागले आहेत. लोकांचा त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. निर्माल्य कलश ठेवून त्या निर्माल्याचा उपयोग खत निर्मितीसाठी करण्यात येऊ लागला आहे.

‘ इको फ्रेंडली गणेशोत्सव ‘ हे शब्द तुम्ही ऐकलेच असतील. आपण गणेशोत्सव साजरा करीत असतांना पर्यावरणास बाधा येईल अशा वस्तूंचा उपयोग टाळायचा. मातीचीच छोटी मूर्ती, प्लॅस्टिक-थर्मोकोलचा वापर न करता केलेली सजावट, ध्वनिवर्धकाचा संयमाने वापर आणि गणेशमूर्तीचे विसर्जन हे जलप्रदूषण होणार नाही अशा पद्धतीनेच करायचे. यालाच ‘ इकोफ्रेंडली गणेशोत्सव ‘ म्हणतात.

(लेखक ; पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक)

loading image
go to top