कोरोना संकटात 'पंचमुखी'नं जपलं सामाजिक भान; केली लाखमोलाची 'मदत' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchmukhi Ganesh Mandal

कोरोनाकाळात साताऱ्यातल्या काही गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचं दिसून आलं.

कोरोना संकटात 'पंचमुखी'नं जपलं सामाजिक भान; केली लाखमोलाची 'मदत'

सातारा : कोरोनाकाळात साताऱ्यातल्या काही गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचं दिसून आलं. कोणताही उत्सव साजरा करताना समाजातील दुर्लक्षित घटकांची गरज लक्षात घेत, या मंडळांनी विविध उपक्रम राबवलेत. यापैकी आहे, साताऱ्याचे पंचमुखी गणेश मंडळ. साताऱ्यातील सदाशिव पेठेत 1954 मध्ये प्रताप मंडळाची स्थापना झाली. तद्नंतर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी गणेश मंदिर उभे करण्याची संकल्पना घेऊन 1977 साली श्री पंचमुखी गणेश मंदिराची स्थापना करण्यात आली.

सन 1977 पासून श्री पंचमुखी गणेश मंदिर ट्रस्टतर्फे कोणत्याही प्रकारची वर्गणी न घेता भाविकांनी दान केलेल्या पैशातून विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविले जाताहेत. मंडळाने आजवर सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून अनेक संकटप्रसंगी मदत केलीय. यात कारगिल निधी, गुजरात भूकंप, किल्लारी भूकंप, 2003 मध्ये खटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा, 2004 मध्ये त्सुनामीग्रस्तांसाठी मदत निधी, 2005 साली पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी अन्नधान्यसह मदत निधी दिला आहे. आजवर मंडळाने आरोग्य शिबिरं, नेत्रचिकित्सा शिबिरं, चष्मा शिबिरं, गरीब रुग्णांना मदत, रक्तदान शिबिरं यासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पुस्तकं-वह्या वाटप, क्रीडा स्पर्धा, महिलांसाठी विविध उपक्रम, पूरग्रस्तांना, आपद्गस्तांना मदत यासारखे समाजोपयोगी उपक्रम-कार्यक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2021 : गणेशोत्सवात 'या' चुका जरुर टाळा

गृहराज्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली लाखमोलाची 'मदत'

कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव साजरा करताना अनेक नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक केले आहे. प्रशासनाच्या या अटी लक्षात घेऊन पंचमुखी गणेश मंडळाने मांडवाचा बेत रद्द केलाय. शिवाय, मंडळाने एक फूट उंचीच्या शाडूच्या गणरायाची प्रतिष्ठापना मंदिरातच करून सामाजिक भान देखील जपलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, यंदा ट्रस्टकडून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सन 2020 मधील मार्च महिन्यात भारतात सर्वत्र कोरोनाच्या महामारीचं संकट आलं होतं. या कोरोनाच्या संकटात गणेश उत्सव साजरा न करण्याचं आवाहन महाराष्ट्र शासनानं मंडळांना केलं होतं. या काळात गणेशोत्सवात होणाऱ्या खर्चावर बंधनं आणून सदरचा खर्च सामाजिक उपक्रमांत देण्याचा निर्णय ट्रस्टकडून घेण्यात आला. त्यानुसार ट्रस्टनं जून 2020 मध्ये कोरोना संकटाची दहशत लक्षात घेता मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा निधी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपूर्द करत सामाजिक बांधिलकीही जपली होती.

हेही वाचा: राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवलेले पंचमुखी गणेश मंडळ

गणपतीच्या सजावटीचा खर्च टाळून 'मुख्यमंत्री साहाय्यता'ला निधी

कोरोना संकटात पंचमुखी गणेश मंडळानं दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचं गृहराज्यमंत्री देसाई यांनी कौतुक केलं होतं. पंचमुखी गणेश मंडळाच्या सदस्यांनी गणपतीच्या सजावटीचा खर्च टाळून एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची रक्कम कोरोना निर्मूलनासाठी मुख्यमंत्री निधीसाठी दिली. ही रक्कम शासनाच्या वतीने शंभूराज देसाई यांनीच स्वीकारली होती. या सामाजिक जाणीवेची आठवण आज शंभूराज देसाई यांनी केली. पंचमुखी गणेश मंडळाने नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय आम्ही मार्च महिन्यातच घेतला होता, असंही मंडळाचे अध्यक्ष कमलाकर घोडके यांनी आवर्जुन सांगितलं. या काळात मंडळातील सभासद अशोक काटकर, सुधाकर पेंडसे, दत्ता भिडे, किशोर नावंधर, रविंद्र तळेगांवकर, उपेंद्र नलावडे, सचिन बाफना, दत्ता धुरपे, राहूल काटकर, उपेंद्र पेंडसे यांच्यासह मालपाणी बंधू, बाफना बंधूंचं देखील सहकार्य लाभल्याचं अक्षध्यांनी सांगितलं.

Web Title: Ganeshotsav 2021 Panchmukhi Ganesh Mandal Helped The Citizens In Corona Crisis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..