esakal | बाप्पाच्या नैवेद्यासाठी मिष्टान्नांची रेलचेल !
sakal

बोलून बातमी शोधा

बाप्पाच्या नैवेद्यासाठी मिष्टान्नांची रेलचेल !

बाप्पाच्या नैवेद्यासाठी मिष्टान्नांची रेलचेल !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक, पंचखाद्य, हलवा, विविध प्रकारचे लाडू अशा नानाविध मिष्टान्नांचे घमघमाट सध्या बाजारपेठेत दरवळत आहेत. उकडीच्या मोदकांसह मावा मोदक, आंबा मोदक अशा पदार्थांच्या पूर्वनोंदणीला सुरुवात झाली असून फ्रोझन मोदकांसारख्या नव्या प्रकारांचीही यंदा चलती आहे. भाव वाढूनही मागणीवर परिणाम झाला नसल्याने बाप्पाच्या स्वागतात कुठलीही कसर न सोडण्याची नागरिकांची भावना आहे.

उकडीच्या मोदकांना यंदाही मोठी मागणी असून आत्तापर्यंत दीड लाखांहून अधिक मोदकांची पूर्वनोंदणी विविध व्यावसायिकांकडे झाली आहे. गणेश चतुर्थीपासून पुढील दहा दिवस हे मोदक विक्रीला असतील. ३० रुपये प्रती नग किमतीला हे मोदक उपलब्ध आहेत. यासह मावा मोदक, आंबा मोदक, काजू मोदक, चॉकलेट मोदक, गुलकंद मोदक असे नानाविध प्रकार उपलब्ध आहेत. ५०० रुपये किलोपासून ते उपलब्ध आहेत.

याव्यतिरिक्त साखर, खोबरे, खारीक, बदाम आणि काजू यांचा समावेश असणारे पंचखाद्यही मिठाई व्यावसायिकांकडे मिळत आहेत. ३०० ते ५०० रुपये किलो किमतीत ते उपलब्ध आहेत. तर बेसन लाडू, रव्याचे लाडू, करंजी असे इतरही मिष्टान्नांच्या पर्यायांना नागरिकांकडून मागणी आहे.

हेही वाचा: गणेश चित्रशाळांमध्ये लगबग

फ्रोझन मोदकांना मागणी

फ्रोझन मोदक हा एक नवीन प्रकार सध्या आला असून त्याला चांगली मागणी असल्याचे केटरिंग असोसिएशनचे किशोर सरपोतदार यांनी सांगितले. आत्तापर्यंत पाच लाखांहून अधिक फ्रोझन मोदकांची विक्री झाली आहे. या प्रकारांत मोदक नेहमीच्या पद्धतीने तयार केले जातात व त्यानंतर उणे ८० अंश तापमानात ‘ब्लास्ट फ्रीझिंग’ केले जाते. पुढे उणे १८ अंश तापमानात ते साठवले जाऊ शकतात. ते गरम केल्यास त्यावरील बर्फ वितळून जाऊन ते खाण्यायोग्य होतात. पुण्याबाहेरील शहरांमध्ये आणि विशेषतः परदेशात या फ्रोझन मोदकांना चांगली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: गणेशोत्सवात सात गीते भेटीला

साखर, काजू, बदाम अशा मिष्टान्नांसाठी लागणाऱ्या सगळ्याच कच्च्या मालाचे भाव वाढल्याने साहजिकच मोदक व लाडूंचे दर वाढले आहेत. सगळ्याच पदार्थांच्या किमतीत १० ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. तरीही मागणीवर परिणाम झाला नाही.

- अनिल गाढवे, काका हलवाई मिठाई

loading image
go to top