esakal | || देवा तुचि गणेशु ||
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati

|| देवा तुचि गणेशु ||

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- डॉ. आर्या जोशी , संशोधक, ज्ञानप्रबोधिनी

ओम् गणानां त्वा गणपतिं हवामहे,

कविं कवीनाम् उपमश्रवस्तमम् ।

ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पते,

आ नः श्रृण्वन् ऊतिभिः सीद सादनम् ।। ऋग्वेद २.२३.९

हा मंत्र सर्वांच्या परिचयाचा आहे. ऋग्वेदातील या मंत्रामध्ये आपल्याला गणपती असा शब्द दिसून येतो.

ओम् ब्रह्मणस्पते त्वमस्य यन्ता

सूक्तस्य बोधि तनयं च जिन्व ।

विश्वं तद् भद्रं यदवन्ति देवाः

बृहद् वदेम विदथे सुवीराः ।।

ऋग्वेद २.२३.१९

या मंत्रामध्ये आपल्याला ब्रह्मणस्पती या देवतेचा उल्लेख आढळतो. वैदिक साहित्यात गणपती हा शब्द गणांचा अधिपती अशा अर्थाने आलेला दिसतो.

हेही वाचा: जंगल मंगल : कठीण उभ्या चढाईचा देखणा राजगड

लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण, गजमुख रूपातील जो गणपती आपल्यासमोर उभा राहतो तो हा गणपती नव्हे. हत्तीचे मुख, मोठे पोट, सुपासारखे कान या रूपातील गणेश वैदिक साहित्यात आढळत नाही. ब्रह्मण म्हणजे वाणी. ऋग्वेदामध्ये वाणीचा अधिपती असलेल्या ब्रह्मणस्पतीला गणपती असेही म्हटले गेले आहे. तो मंत्रविद् म्हणजे मंत्र जाणणारा देव हा सर्व जगाचा नियामक मानला गेला आहे. तो देव इतर गणांचा म्हणजे समूहांचाही अधिपती आहे. त्यांचा नायक आहे. सर्व ज्ञानी लोकांमध्येही तो सर्वश्रेष्ठ आहे.

देवताविकासाच्या क्रमामध्ये ब्रह्मणस्पती या देवतेचा ज्ञानाशी असलेला संबंध, गणांचा अधिपती म्हणून संघटनेच्या नायकरूपाशी असलेला संबंध आजच्या प्रचलित गणेशरूपाशी जोडला गेला असावा असे विविध अभ्यासक नोंदविताना दिसतात. गणपती हा विद्येची, ज्ञानाची श्रेष्ठ देवता मानला गेला तोही याच कारणामुळे. विद्यारंभी ज्ञानदात्या गजाननाचे आदरपूर्वक स्मरण केले जाते. शिव, विष्णू, गणेश, देवी या देवतांना उपास्य दैवत मानणारे विविध संप्रदाय कालक्रमात उदयाला आले. शैव, वैष्णव, गाणपत्य, शाक्त या नावाने ते ओळखले जातात.

हेही वाचा: हॅपी डेज : समाजसेवा अन्‌ शिक्षणात रमून गेलो

शैव संप्रदायाच्या धारणेनुसार शिव म्हणजे शंकर या देवतेचे जे गण म्हणजे समूह किंवा समुदाय त्यांचा अधिपती किंवा प्रमुख म्हणूनही गणपतीला विशेष मान दिलेला आहे. शिव आणि पार्वतीचा पुत्र म्हणूनही पुढे गणपती शिव परिवारात सामील झालेला दिसून येतो.

अशाप्रकारे विद्येची, ज्ञानाची आणि अर्थात संघटनेची देवता असलेला हा गणपती. संघटनेचा नायक म्हणून तो कुशल नेताही आहे. त्याचा सेनानायक किंवा गणांचा नायक हा गुण विशेष आत्मसात करण्यासारखा वाटतो. भारतातील नवयुवक आणि युवतींनी गणेशाचा हा गुण अंगिकारत देशाच्या कल्याणासाठी स्वत:मधील नेतृत्वशक्ती जागी करण्याचा संकल्प या गणेशोत्सवाच्या निमित्ताने जरूर करावा.

loading image
go to top