esakal | Gauri Avahan 2021: ज्येष्ठगौरी आवाहन शुभ मुहूर्त आणि पूजन विधी
sakal

बोलून बातमी शोधा

Gauri Avahan 2021: ज्येष्ठगौरी आवाहन शुभ मुहूर्त आणि पूजन विधी

महालक्ष्मीने कोलापूर राक्षसाला ठार मारले आणि लोकांना सुखी केले. म्हणून हा उत्सव साजरा करण्याची प्रथा पडली. नंतर मध्यंतरीच्या काळात गौरी उत्सव व महालक्ष्मी उत्सव एकत्र साजरे होऊ लागले.

Gauri Avahan 2021: ज्येष्ठगौरी आवाहन शुभ मुहूर्त आणि पूजन विधी

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

-  दा. कृ. सोमण

भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष्ठागौरींचे आगमन होते. चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना पूजन करतात आणि चंद्र मूळ नक्षत्रात असताना ज्येष्ठागौरींचे विसर्जन करतात. यावर्षी रविवारी, 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9:49 वाजता चंद्र अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी 9:49 नंतर ज्येष्ठा गौरी आणाव्यात. सोमवारी, 13 सप्टेंबर रोजी ज्येष्ठागौरी पूजन करावे. मंगळवार 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7: 04 वाजता चंद्र मूळ नक्षत्रात प्रवेश करील. त्यामुळे यादिवशी सकाळी 7: 04 नंतर दिवसभर कधीही ज्येष्ठागौरीचे विसर्जन करावयाचे आहे. पूर्वी या उत्सवाला 'महालक्ष्मी उत्सव' म्हटले जाई. महालक्ष्मीने कोलापूर राक्षसाला ठार मारले आणि लोकांना सुखी केले. म्हणून हा उत्सव साजरा करण्याची प्रथा पडली. नंतर मध्यंतरीच्या काळात गौरी उत्सव व महालक्ष्मी उत्सव एकत्र साजरे होऊ लागले.

हेही वाचा: चार पिढ्यांपासून गणेश मूर्ती बनवणाऱ्या कुटुंबातील अवलिया; पाहा व्हिडिओ

परंपरेप्रमाणे ज्येष्ठागौरींचा हा उत्सव साजरा करतात. काही लोक परंपरेप्रमाणे खड्याच्या गौरी आणून त्याचे पूजन करतात. तर काही मुखवट्याच्या गौरी पूजतात. तर काही गौरींची मूर्ती तयार करून तिची पूजा करतात. काही लोक प्रथेप्रमाणे तेरडा वनस्पतीची पूजा करतात. खरी म्हणजे ही निसर्गाची पूजा असते. ज्येष्ठागौरी म्हणजे आदिशक्ती- पार्वतीची-गणेशमातेचीच पूजा असते. गौरीपूजनाच्या दिवशी सासरी गेलेल्या मुलीला माहेरी बोलावून तिला गोड जेवण देऊन ओटी भरतात. गौरीला परंपरेप्रमाणे खास जेवणाचा नैवेद्य करतात. काही ठिकाणी अनेक भाज्यांचा नैवेद्य देवीला अर्पण करतात. गौरीपूजनाच्या दिवशी सायंकाळी महिलासाठी हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला जातो. त्यावेळी महिला विशेष खेळही खेळतात. ज्येष्ठागौरींचा हा सण महिलांसाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा असतो.

हेही वाचा: मूर्ती कलेतील 'ते' जुने दिवस परतले; ज्येष्ठ कारागिरांची हात कलाकारी

भारतात फार प्राचीन काळापासून गौरीचे पूजन केले जात असले तरी हे सर्व पूजन पोथ्यां-पुराणातच राहिले असे दुर्दैवाने म्हणावे लागते. आपण एखाद्या देवतेचे किंवा देवाचे पूजन का करतो तर त्या आदर्शाचे गुण आपल्या अंगी यावेत. समाजात त्या गुणांचे अनुकरण केले जावे, हा त्यामागचा खरा उद्देश असतो. परंतु शक्तीचे हे पूजन फक्त देवघरातच राहिले. ते स्वयंपाकघर, माजघरापर्यंत किंवा घराच्या उंबरठ्याबाहेर आलेच नाही असे दिसून येते. घरात वावरणाऱ्या आजी, आई, मुलगी, बहीण, पत्नी, सून या जिवंत शक्तीदेवता तशाच दुर्लक्षित राहिल्या. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' हे वाक्य ग्रंथातच राहिले. हा सण साजरा करीत असताना घराघरात महिलांचा सन्मान केला गेला पाहिजे.

(लेखक- पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक आहेत)

loading image
go to top