esakal | Hartalika Puja : महिला का करतात हरितालिका व्रत?
sakal

बोलून बातमी शोधा

Hartalika

Hartalika Puja : महिला का करतात हरितालिका व्रत?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हरितालिकेचे हे आजचे स्वरूप केवळ सामाजिक आहे. या पूजनाची सौभाग्याशी सांगड घातल्याने महिला ते करतात पण गेट टुगेदरची एक चांगली संधी त्यांना मिळते. वास्तविक सणांची आखणी अनेक दृष्टिकोनांतून केलेली असते. पौराणिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक अशी सगळी मूल्ये या पार्श्वभूमीच्या मुळाशी असतात. हरितालिकेचे धार्मिक महत्त्व यासाठी आहे की या व्रतसिद्धीने आदिमाया आणि शिवशक्तीचे मीलन झाले, कल्याणाची एक पीठिका निर्माण झाली. भारतीय संस्कृती स्त्रीला शक्तिस्वरूप मानते ह्याचा प्रत्यय येतो. राजा दक्षाने केलेल्या अपमानाने क्रुद्ध शंकराला पार्वतीने तपश्‍चर्येने प्रसन्न केले, संतुष्ट केले. अनुपम लावण्यावती असूनही देवांच्या रक्षणार्थ शिवकृपेची गरज लक्षात घेऊन राजकन्येने स्मशानवासी शंकराशी विवाह केला. वैयक्तिकतेचा उत्कर्ष अशा समाजशील आवरणाने होतो, हे सिद्ध झाले.  (Hartalika puja importance in marathi)

हेही वाचा: गणेशोत्सव 2021 : गणेशाचे वाहन मूषकच का?

पुराणांनी स्त्रीशक्तीचा, तिच्या महिमेचा, गुणसंपन्नतेचा, सामर्थ्याचा जो साक्षात्कार घडविला आहे तो समस्त स्त्रीजातीला अभिमान वाटावा असाच आहे. पुराणकथांमध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, महादुर्गा अशी देवीची अनेक रूपे आपण बघत असतो. या सर्व देवी आदिशक्तीची रूपे असून या विश्‍वाला दुःखमुक्त, संकटमुक्त करणाऱ्या आहेत. हेच स्त्रीत्वाचे साक्षात दर्शन आहे. याच संकल्पनेवर आधारलेले देवी पार्वतीचे तेजस्वी रूप आपण पाहतो ते हरितालिका व्रताच्या निमित्ताने. हिमवन्ताची ही कन्या पूर्वजन्मी राजा दक्षाची कन्या होती. पिता विष्णूभक्त होता, पण ती शिवभक्त होती. पुढच्या जन्मातही ती शिवभक्तच आहे. जन्मोजन्मीचे नाते साकार करून दाखवणारी पार्वती स्त्रियांनी आदर्श मानली आणि हे व्रत सुरू केले. 

हिमालयाला शंकर जावई म्हणून नको होते. म्हणून पार्वतीने रानात जाऊन शिवाराधना केली. वनदेवतेच्या साक्षीने तिने या व्रताची सुरवात केली. हरित म्हणजे हिरवी आणि आली म्हणजे रांग. हिरव्या बेलपानांची अखंड रास पिंडीवर वाहिली गेली आणि "ओम नमः शिवाय'च्या जपाने ती पावन झाली. वनदेवीच तिची सखी होती आणि तिचे सर्वतोपरी साहाय्य तिला लाभत होते. पाठराखण करू शकणारी जिवाभावाची सखी आपल्यालाही जोडता आली पाहिजे. 

केवळ बिल्वदलेच पार्वतीचे पूजासाहित्य होते. पण तिची अढळ निष्ठा, अटळ विश्‍वास व उत्कट भक्तीची त्रिदले त्या पूजनात समर्पित होती. तिचा दृढ संकल्प हेच तिचे बळ होते जे तिला रानात सुरक्षित व निर्भय ठेवीत होते. व्रताने जागलेले आत्मतेज, आत्मविश्‍वास व आत्मज्ञान तिला शिवतत्त्वासमीप नेत होते व क्षणाक्षणाने ती शिवात्म होत होती. 

हेही वाचा: गणेशोत्सव 2021 : गणेश चतुर्थीचे महत्त्व

भाद्रपद शुद्ध तृतीयेला स्त्रिया हरितालिका करतात, पूजा करतात, साबूदाणा-भगर खाऊन उपास करतात, सामूहिक समारंभाचे आयोजन करून हळदी-कुंकू, विविध खेळ किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करतात, जागरण करतात व दुसऱ्या दिवशी गौरीविसर्जन करतात. हरितालिकेचे हे आजचे स्वरूप केवळ सामाजिक आहे. या पूजनाची सौभाग्याशी सांगड घातल्याने महिला ते करतात पण "गेट टुगेदर'ची एक चांगली संधी त्यांना मिळते. वास्तविक सणांची आखणी अनेक दृष्टिकोनांतून केलेली असते. पौराणिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक अशी सगळी मूल्ये या पार्श्वभूमीच्या मुळाशी असतात. हरितालिकेचे धार्मिक महत्त्व यासाठी आहे की, या व्रतसिद्धीने आदिमाया आणि शिवशक्तीचे मीलन झाले, कल्याणाची एक पीठिका निर्माण झाली. भारतीय संस्कृती स्त्रीला शक्तिस्वरूप मानते याचा प्रत्यय येतो. राजा दक्षाने केलेल्या अपमानाने क्रुद्ध शंकराला पार्वतीने तपश्‍चर्येने प्रसन्न केले, संतुष्ट केले. अनुपम लावण्यवती असूनही देवांच्या रक्षणार्थ शिवकृपेची गरज लक्षात घेऊन राजकन्येने स्मशानवासी शंकराशी विवाह केला. वैयक्तिकतेचा उत्कर्ष अशा समाजशील आवरणाने होतो हे सिद्ध झाले. 

आज हरितालिका पूजन करताना पार्वतीचा हा महिमा लक्षात घ्यायला पाहिजे. तिचे सद्‌गुण आपल्या अंगी कसे येतील, हा विचार व्हायला पाहिजे. आजच्या असुरक्षित महिला वर्गाने थोडेसे अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे. प्रलोभनांना बळी पडणाऱ्या कमकुवत मनाच्या स्त्रियांनी पैसा व प्रसिद्धीचे आपल्या जीवनातले स्थान निश्‍चित करायला पाहिजे. देखावा, खोटा मोठेपणा की खरे नैतिक बळ याचा विचार करायला पाहिजे. मनोरंजन की मनोदर्शन हे समजून घेतले पाहिजे. सारे काही विकत मिळते पण जीवनमूल्ये विकत मिळत नसतात. ती पार्वतीसारखे संकल्प, एकचित्त, एकनिष्ठ राहूनच मिळवावी लागतात. स्त्री ही ईशत्वाकडे नेणारी मंगलशक्ती मानली गेली आहे. हे जर स्मरणात ठेवले तर पार्वतीची "शिवा' होता येईल आणि तिला कृतार्थ नमस्कार करता येईल. 

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। 
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते।। 

 

(आशा पांडे यांचा संबंधित लेख सप्टेंबर २०१९ मध्ये 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाला होता. हरतालिकेनिमित्त हा लेख पुन्हा प्रकाशित करत आहोत)

loading image
go to top