esakal | पडीक जमिनीवर साकारले 15 बाय 30 फुटांचे गणराय ! चित्रकार मस्केची अनोखी मानवंदना
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रकार मस्केने साकारले पडीक जमिनीवर 15 बाय 30 फुटांचे गणराय !

एका डोळ्याने दिव्यांग असलेल्या चित्रकार महेश मस्केने पडीक जमीन क्षेत्रावर गणरायाची कलाकृती साकारून अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली.

चित्रकार मस्केने साकारले पडीक जमिनीवर 15 बाय 30 फुटांचे गणराय !

sakal_logo
By
शांतिलाल काशीद

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील (Barshi Taluka) जामगाव (पा) येथील एका डोळ्याने दिव्यांग असलेल्या चित्रकार महेश मस्केने (Mahesh Maske) पडीक जमीन क्षेत्रावर गणरायाची (Ganesh Chaturthi) कलाकृती साकारून अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली. बार्शी- तुळजापूर रोडवर जामगाव येथील वैभव यादव यांच्या पडीक जमीन क्षेत्रावर पंधरा बाय तीस फुटावर गणरायाचे चित्र साकारण्याची किमया महेशने केली आहे. हे सुंदर चित्रकौशल्य पाहण्यासाठी अनेक कलाप्रेमी येथे भेटी देत आहेत.

हेही वाचा: हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक 'सोन्या मारुती गणपती'!

चित्रकार महेश मस्के यांनी या अगोदर शिल्पकला, कार्डशीट, पिंपळाचे पान, वडाचे पान, सागाचे पान, नारळाचे झावळ, टरबूज यावरसुद्धा राजकीय नेते, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, कृषी, धार्मिक आदी क्षेत्रातील सुंदर कलाकृती साकारत राज्यासह देशभरात नावलौकिक मिळवला आहे. नेहमीच काही तरी वेगळे करणाऱ्या महेशने श्री गणेशाच्या आगमनानिमित्त एक वेगळी संकल्पना घेऊन तब्बल दोन दिवसात सहा व्यक्तींच्या सहकार्याने पडीक क्षेत्रामध्ये खोदकाम आणि रांगोळीच्या माध्यमातून, पंधरा बाय तीस फूट आकारामध्ये गणेशाची मूर्ती साकारून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे.

हेही वाचा: वर्गणी तुमची, झाडे आमची! रिटेवाडीतील बच्चेकंपनीचा आगळावेगळा उपक्रम

जामगाव परिसरात समाधानकारक झालेल्या पावसामुळे धरणीमातेने हिरवी शाल पांघरली आहे. त्यामध्ये महेशने साकारलेली गणरायाची सुबक कलाकृती ड्रोनच्या माध्यमातून अधिकच खुलून दिसत आहे. यासाठी सुरवातीस संपूर्ण चित्राचे लेआऊट करून घेतली आणि त्यानंतर पडीक जमीन क्षेत्रात गणरायाचे चित्र कोरले. अशा प्रकारचा वेगळा प्रयोग साकारण्यासाठी वैभव यादव, अण्णा सातपुते, गणेश मस्के,अमू जठार, पूजा वाघमारे, क्रांती शिंदे, माउली सातपुते यांचे सहकार्य मिळाले. या हरहुन्नरी कलाकाराची इंडियन बुक ऑफ नॅशनल रेकॉर्ड व ग्रेट वर्ल्ड स्किल अवॉर्डने दखल घेत त्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. तसेच विविध सामाजिक संस्थांनी देखील पुरस्कार देऊन महेशचा सन्मान केला आहे. चित्रकार महेश मस्के या उदयमुख व नवतरुण कलाकाराने साकारलेले अनोखे चित्र खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. महेशच्या या आगळ्यावेगळ्या कलेने सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात एक वेगळा ठसा उमटवला आहे.

loading image
go to top