esakal | हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक "सोन्या मारुती गणपती'!
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक 'सोन्या मारुती गणपती'!

श्री सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळ यंदा 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक 'सोन्या मारुती गणपती'!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : श्री सोन्या मारुती (Sonya Maruti) गणेशोत्सव मंडळ यंदा 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या मंडळाने 'हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक' बनून महान आदर्श समाजासमोर ठेवला आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांतून आपली ख्याती सर्वदूर पसरवली आहे. हिंदुत्ववादी नेते वि. रा. पाटील (V. R. Patil), माणिकराव महिंद्रकर, प्रल्हाद ऊर्फ पलोबा सिदवाडकर यांच्या प्रेरणेतून व नेतृत्वाखाली बापू मंठाळकर, दिगंबर सिदवाडकर, काशिनाथ महिंद्रकर, बलभीम खांडेकर (खलिफा), डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर, वसंतराव मंठाळकर, शंकर जानगवळी, विश्वंभर जाधव, ज्ञानेश्वर गुंड, श्रीकांत सिदवाडकर, विश्वनाथ बनशेट्टी, लक्ष्मणराव भांबुरे, तम्मा शिर्के यांनी 1947 मध्ये मंडळाची स्थापना केली.

हेही वाचा: टिळकांच्या प्रेरणेतून स्थापन झालेला श्रीमंत मानाचा कसबा गणपती!

प्रारंभी मंडळाचे नामकरण जय हनुमान तरुण मंडळ होते. मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना सुरवातीच्या काळात तरुंगवाडा संबोधल्या जाणाऱ्या विश्वंभर जाधव यांच्या बोळात होत असे. 1953-54 मध्ये दक्षिण कसब्यातील सोन्या मारुती मंदिरासमोर मुख्य रस्त्यावर डॉ. अंत्रोळीकर यांच्या घराशेजारी मांडव उभारून गणपतीची प्रतिष्ठापना होऊ लागली. पुढे "सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळ' अमे नामकरण झाले. स्थापनेपासून ते आजतागायत प्रत्येक वर्षी मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम होतात. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर जिवंत देखावे सादर करण्यात मंडळाचा हातखंडा आहे. मंडळाचा लौकिकप्राप्त लेझीम संघ आहे. बेरोजगार तरुणांना उद्योगासाठी कर्ज वाटप, रुग्णोपयोगी वस्तू वाटप, भूकंपग्रस्तांना मदत असे सामाजिक अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल मंडळास "सर्वोत्कृष्ट गणेश मंडळा'चा पुरस्कारही मिळाला आहे.

गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनामुळे विजापूर नाक्‍यावरील विलगीकरण कक्षात परराज्यातील नागरिक अडकले होते. मंडळातर्फे येथील लोकांना महिनाभर सकस पौष्टिक आहार पुरवण्यात आला होता.

हेही वाचा: वर्गणी तुमची, झाडे आमची! रिटेवाडीतील बच्चेकंपनीचा आगळावेगळा उपक्रम

चांदीची गणेशमूर्ती महाराष्ट्रात प्रसिद्ध

1983 साली मंडळाने कोल्हापूर येथील मूर्तिकार श्‍यामराव ओतारी यांच्याकडून एक चार फुटी चांदीची गणेशमूर्ती तयार करून घेतली. या गणेशमूर्तीस सोन्याचे अलंकारही बनविले आहेत. दक्षिण कसब्यात सोन्या मारुतीचे पुरातन मंदिर होते. यानंतर 2007 साली मनोज महिंद्रकर व मोहन वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली नवीन मंदिर बांधण्यात आले. मुंबईतील माहिम येथून मारुतीची 27 इंच उंचीची संगमरवरी मूर्ती आणण्यात आली. नवीन मंदिरामुळे सोन्या मारुती व गणेशाचे एकत्रित दर्शन घेण्याचा लाभ भाविकांना होऊ लागला. मंडळाने आपल्या चांदीच्या गणेशमूर्तीचे (जुन्या) श्रीक्षेत्र गणपती पुळे येथील समुद्रात विसर्जन केले असून, 2014 साली नव्याने नऊ फुटी गणेशमूर्ती बनवून घेतली आहे.

हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचा आदर्श

सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची उत्सवकाळात ज्या ठिकाणी प्रतिष्ठापना होते, त्याच्या शेजारी कुरेशी मशीद (खाटिक मशीद) आहे. या मशिदीच्या बाजूलाच गणपतीची प्रतिष्ठापना होणारे हे एकमेव मंडळ आहे. विशेष म्हणजे, मुस्लिम समाजातील तरुणही या मंडळाच्या गणेशोत्सवात हिरिरीने सहभागी असतात. दोन्ही समाजबांधव एकमेकांच्या सण- उत्सवात आनंदाने सहभागी होतात. सोन्या मारुती मंदिराजवळ कधी हनुमान जयंतीच्या वेळी मुस्लिम बांधवांची "बडी रात' येते. एकीकडे भजनाचा कार्यक्रम सुरू असतो, तर मशिदीत नमाज चालू असतो. पण इथल्या सामाजिक एकतेमुळे धार्मिक तेढ कधीच निर्माण होत नाही, ही ऐतिहासिक गौरवास्पद बाब आहे. दसऱ्याचे सीमोल्लंघन करून येणाऱ्यांची तहान इथल्या मुस्लिम बांधवांकडून सरबताने भागविली जाते. तर मंडळातर्फे रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते.

या वर्षीच्या अध्यक्षपदी मोहनराव वडगावकर

श्री सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच होऊन मंडळाच्या यंदाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अध्यक्षपदी, ज्यांचे स्वतःचेही यावर्षी अमृतमहोत्सवी वय आहे असे ज्येष्ठ पत्रकार मोहनराव वडगावकर यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाचे इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष संतोष शीलवंत, रोहित उत्तरकर. कार्याध्यक्ष प्रसाद कुमठेकर, श्रीकांत अनगरकर, सचिव केदार सोहनी, ज्ञानेश्वर महिंद्रकर. सहसचिव संतोष आहेरकर, खजिनदार विनायक महिंद्रकर, सागर हवले. प्रसिद्धिप्रमुख महेश वाले, गोकूळ चव्हाण, सल्लागार विलासराव महिंद्रकर, बाळासाहेब कुमठेकर, अशोक महिंद्रकर, चंद्रकांत सोहनी, अरुण महिंद्रकर, भारत महिंद्रकर, सुहास महिंद्रकर, रामभाऊ तडवळकर.

loading image
go to top