esakal | सिद्ध होईल पुरुषार्थ, मुलीचा बाप होऊन बघ! बाहुल्या अन्‌ कवितांमधून मांडले स्त्रीचे जीवनविश्‍व
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्ध होईल पुरुषार्थ, मुलीचा बाप होऊन बघ! बाहुल्या अन्‌ कवितांमधून मांडले स्त्रीचे जीवनविश्‍व

महिलेच्या आयुष्यातील वेदना व सुख-दु:खाचे प्रसंग साकारण्याचा प्रयत्न गणेश देखाव्यातून केला आहे.

'सिद्ध होईल पुरुषार्थ, मुलीचा बाप होऊन बघ!'

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर : ती एक बालिका म्हणून जन्माला येते अन्‌ तेव्हापासून तिच्या जगण्याला समाजाची, शरीराची अन्‌ मनाची वेदना अखंडपणे जोडली जाते. या वेदनेसोबत सुरू होणारा तिचा प्रवास कवी सोमेश हिरेमठ (Somesh Hiremath) यांनी गणेशोत्सवाच्या (Ganesh Chaturthi) देखाव्यातून साकारला आहे. बलिदान चौकातील सोमेश हिरेमठ हे उत्तम कवी आहेत. तसेच दरवर्षी सामाजिक संवेदनशील विषयावर स्वतःच्या कवितांच्या (Poems) माध्यमातून देखावा ते सादर करतात. यावर्षी त्यांनी महिलेच्या आयुष्यातील वेदनेचा प्रवास मांडला आहे.

हेही वाचा: स्वातंत्र्यपूर्व स्थापन झालेल्या पत्रा तालीम मंडळाचे सामाजिक उपक्रम

ती जन्माला आल्यानंतर बाहुलीसोबत खेळते. बाहुलीचे हे खेळणे खेळताना ती मोठी होते. तिच्या मासिक पाळीने वेदनेचा प्रवास सुरू होतो. तिच्या वेदना समजून घेणारे जग मात्र तिच्याबद्दलचा जुनाट दृष्टिकोन मात्र बदलत नाहीत, हे बाहुल्यांच्या आणि कवितांच्या मांडणीतून हिरेमठ यांनी देखाव्यात मांडले आहे. शिक्षण घेऊन ती मोठी झाली. ज्या घरात ती वाढली ते घर ती विवाहानंतर सोडते. या त्यागाची किंमत समाजाला नसते. माहेर सोडणाऱ्या बाईला तिच्या बापाच्या केवळ अश्रूंची सोबत होते, या आशयाच्या देखाव्यातून त्यांनी मुलीच्या विवाहाप्रसंगीचा निरोप समारंभ मांडला.

'जबाबदारीने वाकलेल्या खांद्याला

अन्‌ जखमांनी माखलेल्या काळजाला

सुखी असल्याचं सोंग घेता येत नाही'

या काव्य ओळीत हा प्रसंग मांडला आहे. नंतर ती जेव्हा बालकाला जन्म देते तेव्हा पुन्हा मुलगा झाल्याचे कौतुक व मुलगी झाली तर अनास्था, हा समाजाचा न्याय, दवाखान्याचा देखावा दर्शवतो.

हेही वाचा: राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवलेले पंचमुखी गणेश मंडळ

'पीळ बसेल काळजाच्या कातडीला,

बाहुली तुझी सासरी पाठवून बघ !

तुला तृप्त विसावा मिळेल प्रेमाचा...

सुनेला तू लेक मानून तर बघ !'

या प्रकारचे आवाहन कवितेतून केले जाते. नंतर मुलाचे शिक्षण व करिअर करून पतीसोबत घरट्यात सुखावलेल्या स्त्रीचे रूप पाहण्यास मिळते. पुन्हा वृद्धावस्थेत बालकासारखे जगत नवजन्माच्या प्रवासाला निघते. या सर्व देखाव्यातून सोमेश हिरेमठ यांनी बाहुल्यांचे मॉडेल्स व कवितांच्या ओळीतून महिलेचे जीवन विश्‍व साकारले आहे.

ठळक...

  • 12 दिवसांत केली देखाव्याची उभारणी

  • प्रत्येक देखाव्याला काव्य ओळीची जोड

  • वेदनेशी स्त्रीचे नाते केले शब्दबद्ध

  • समाजाची स्त्रीविषयी अनास्थेचे प्रभावी चित्रण

  • तीनशे बाहुल्यांचा देखाव्यासाठी वापर

महिलेच्या आयुष्यातील वेदना व सुख-दु:खाचे प्रसंग साकारण्याचा प्रयत्न मी गणेश देखाव्यातून केला आहे. कविता व मॉडेल्स यांच्या फ्यूजनचा उपयोग मी त्यात केला आहे.

- सोमेश हिरेमठ, बलिदान चौक, सोलापूर

loading image
go to top