esakal | उमेदवाराने येथे नारळ फोडले कि विजयश्री मिळतेच असा 'खांदवे गणपती'
sakal

बोलून बातमी शोधा

Khandve Ganpati

उमेदवाराने येथे नारळ फोडले कि विजयश्री मिळतेच असा 'खांदवे गणपती'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

गणेशोत्सवाच्या निमीत्ताने आपण जाणून घेतोय नाशिक मधील गणपती मंदिरांचे विशेष महत्त्व आणि त्याला असलेला इतिहास. आज आपण जाणुन घेतोय जुने नाशिकच्या सोमवार पेठेतील खांदवे गणपती मंदिराचा इतिहास.

साधारण २०० वर्षांपुर्वीची ही गोष्ट. सोमवार पेठेतील खांदवे कुटुंब. त्यांच्या घराण्यात गणेश पुजनाची परंपरा. घरात एक सुबक दगडी गणेश मुर्ती होती. पिढ्यानपिढ्या त्याची उपासना ते करत होते. अनेक जण दर्शनाला येत. नवस बोलत.

परंतु घरात दर्शनाला येणं सगळ्यांना शक्य नव्हतं. म्हणून मग खांदवे कुटुंबाने या गणपतीचं मंदिर बांधायचं ठरवलं. पण जागा?

घराच्या अगदी समोरच तत्कालीन जहागीरदार श्री खेडकर यांचा भव्य वाडा होता. खेडकर जहागीरदारांनी वाड्यातीलच एक कोपरा मोठ्या मनाने मंदिरासाठी दिला. काही दिवसातच लाकडी बांधणीचं एक छोटेखानी मंदिर तयार झालं. त्यात या गणेशाची स्थापना करण्यात आली.

एका अखंड काळ्या पाषाणातुन कोरलेले कमळ आणि त्यावर विराजमान गणेशाची १० इंची मुर्ती. आणि त्यावर शेंदुराचे लेपन असे मुर्तीचे स्वरूप.

वर्षामागुन वर्षे गेली. शेंदुर लेपन करता करता मुर्ती आता चांगली फुटभर उंचीची झाली. कमळ तर त्यात दिसेनासे झाले. शेंदुर लेपीत एक शिळा असेच त्याचे रुप झाले.

आणि मग अगदी आत्ता ४० वर्षापुर्वी मंदिराचा जिर्णोध्दार करताना मुर्तीवरील शेंदराचे कवच गळुन पडले. आणि आतील सुबक, कलात्मक मुर्तीचे दर्शन पुन्हा एकवार झाले. अगदी कमळासकट. जुने लाकडी मंदिर पाडुन मग आता नवीन सुंदर मंदिर बनवण्यात आले.

त्यालाही आता बरीच वर्षे झाली. काही वर्षापुर्वीच खांदवे कुटुंबाने मुळ मुर्तीवर बसवण्यासाठी चांदीचे कवच बनवून घेतले. गणेश चतुर्थी, संकष्टी, अंगारकी वगैरे विशेष दिनी ते मुर्तीवर बसवण्यात येते. त्यावेळी मुर्तीची शोभा अधिकच वाढते.

हेही वाचा: "सततं मोदक प्रिय..."

भक्तांचे संकल्प सिध्दीस नेणारा सिध्दीविनायक

कोणतीही निवडणूक असो. उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा असो. निवडणुकीचा फॉर्म भरला की येथे येऊन श्रीफळ वाढवून मगच प्रचाराचा आरंभ करणार. आणि श्रध्दायुक्त केलेला नवस या गणपतीपर्यंत पोहोचतोच. आणि विजयश्री त्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माला घालतेच हा इतिहास आहे.

सर्वच भक्तांच्या मनोकामना पुर्ण करणारा हा गणपती. लोक कुठुन कुठुन येतात. नवस बोलतात. ते पुर्णही होतात. भक्तांचे संकल्प सिध्दीस नेणारा हा गणपती म्हणूनच सिध्दीविनायक म्हणुनही ओळखला जातो.

- सुनील शिरवाडकर, नाशिक.

हेही वाचा: हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक 'सोन्या मारुती गणपती'!

loading image
go to top