esakal | सोज्वळ, पारंपरिक गौरींच्या मुखवट्यांना नेहमीच्याच उत्साहात प्रतिसाद!
sakal

बोलून बातमी शोधा

सोज्वळ, पारंपरिक गौरींच्या मुखवट्यांना नेहमीच्याच उत्साहात प्रतिसाद!

मूर्तिकार राजेंद्र सगर म्हणाले, संकटे आली म्हणून काय झालं, आपल्या परंपरा-प्रथा तर सांभाळाव्याच लागतात. शिवाय गौरीचा सण हा घरगुती स्वरूपाचा.

पारंपरिक गौरींच्या मुखवट्यांना नेहमीच्याच उत्साहात प्रतिसाद!

sakal_logo
By
अरविंद मोटे

सोलापूर : शहरातील लष्कर येथील कुंभार गल्ली येथे राजेंद्र सगर यांचे 'सगर आर्ट' वर्कशॉप व दुकान आहे. येथे पारंपरिक व आधुनिकतेची सांगड घातलेली दिसून येते. राजेंद्र सगर व बंधू विष्णू सगर यांच्यासह परिवारातील सात ते आठ सदस्य गणेशमूर्ती (Ganesh Idols) (Ganesh Chaturthi) व गौरींचे मुखवटे (Gouri Masks) तयार करतात. सध्या कोरोनाचे (Covid-19) संकट आहे. यंदा गौरींच्या मुखवटे खरेदीला प्रतिसाद मिळतो का? असे विचारले असता, मूर्तिकार राजेंद्र सगर यांनी "संकटे आली म्हणून काय झालं, आपल्या परंपरा- प्रथा तर सांभाळाव्याच लागतात. शिवाय गौरीचा सण हा घरगुती स्वरूपाचा. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा या सणावर कोणताच परिणाम झालेला नाही', असे सांगितले.

हेही वाचा: गणेशमूर्ती आमची, किंमत तुमची! आधार प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

लष्कर येथील कुंभार गल्ली येथे राजेंद्र सगर यांचे "सगर आर्ट' वर्कशॉप व दुकान आहे. येथे पारंपरिक व आधुनिकतेची सांगड घातलेली दिसून येते. राजेंद्र सगर व बंधू विष्णू सगर यांच्यासह परिवारातील सात ते आठ सदस्य गणेशमूर्ती व गौरींचे मुखवटे तयार करतात. मागील तीन महिन्यांपासून ते गणेशमूर्ती व गौरींचे मुखवटे बनविण्याचे काम करीत आहेत. गौरी-गणपती सणानंतर नवरात्रीसाठी देवीच्या मूर्तींचे काम सुरू करावे लागते. हैदराबाद, विजयपूरपासून देवीच्या ऑर्डर येतात. सगर बंधू हे गणपती पूर्णपणे शाडूचे बनवतात. तर गौरीचे मुखवटे काथ्या व प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवतात. गौरी मुखवट्यांचे विसर्जन होत नाही; तसेच ते मुखवटे कायमस्वरूपी असतात. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवतात. दर पाच ते सहा वर्षांनंतर रंगकाम केले जाते.

हेही वाचा: दुपारी 1.50 पर्यंत करा गणेशाची स्थापना : पंचांगकर्ते मोहन दाते

माहेरच्या मुखवट्यांचा मान

नव्याने लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला माहेरकडून मुखवटे देण्याची प्रथा आहे. पहिल्या गौरी- गणपतीसाठी माहेरकडच्या मुखवट्यांचा मान आहे. आता गौरींबरोबर गणपती व इतर साहित्यही देतात. ही प्रथा टिकून असल्याने दरवर्षी बरेच मुखवटे नव्याने करावे लागतात. नव्या मुखवट्यांची किंमत दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहे. जुने झालेले मुखवटे रंगकामासाठी येतात, त्यासाठी आठशे ते नऊशे रुपयांची आकारणी केली जाते.

गणपतीच्या सहा इंचापासून ते तीन फुटांपर्यंत मूर्ती उपलब्ध आहेत. गौरींचे मुखवटे सोज्वळ व पारंपरिक पद्धतीचे आहेत. शास्त्रोक्त पद्धतीच्या मूर्ती बनविण्याकडे आमचा कल आहे. पर्यावरणपूरक व संपूर्णपणे शाडू मातीचा वापर गणेशमूर्तीसाठी केला जातो.

- राजेंद्र सगर, मूर्तिकार, लष्कर

loading image
go to top