esakal | निर्माल्य संकलनासाठी महापालिकेची विशेष मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

waste

निर्माल्य संकलनासाठी महापालिकेची विशेष मोहीम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका, स्वच्छ पुणे आणि कमिन्स इंडिया हे एकत्रितपणे ‘निर्माल्य टू निसर्ग’ हा उपक्रम शहरात यंदाही राबवीत आहेत. याअंतर्गत नागरिकांकडून निर्माल्य संकलन करण्यास ‘स्वच्छ’च्या कचरा वेचक बुधवारपासून (ता. १५) विशेष मोहीम राबविणार आहेत. हे निर्माल्य महापालिका नैसर्गिकरीत्या जिरवणार आहे.

गणेशोत्सवात भाविकांनी वाहिलेली फुले, हार, दूर्वा यांसारख्या नैसर्गिकरीत्या जिरवल्या जाऊ शकणाऱ्या निर्माल्याचे योग्य मार्गाने विघटन व्हावे आणि त्यातून पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने शहरात ११ वर्षांपासून ‘स्वच्छ’चे कचरा वेचक गणेशोत्सवादरम्यान निर्माल्य संकलन करतात. महापालिकेच्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया होते. कमिन्स इंडियाच्या माध्यमातून निर्माल्य गोळा करण्यासाठी लागणारी पोती कचरा वेचकांना उपलब्ध करून दिली जातात.

हेही वाचा: विद्यार्थ्यांना मिळेना पसंतीचे महाविद्यालय

या उपक्रमाविषयी स्वच्छ संस्थेचे आलोक गोगटे म्हणाले, ‘‘गणेशोत्सव हा पुण्यातील सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा उत्सव आहे. त्याचे सांस्कृतिक महत्त्व जपण्यासोबत शहराच्या पर्यावरणाचे संवर्धन ‘निर्माल्य टू निसर्ग’सारख्या उपक्रमातून होत आहे. यंदा हा उपक्रम १२ सप्टेंबर रोजी सुरू झाला आहे. नागरिकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. गेल्या तीन वर्षांत पुणे महापालिकेसोबत काम करून २८६ टन निर्माल्य यशस्वीपणे गोळा करून ते इतर प्रकारच्या कचरा व्यवस्थापन प्रणालीत जाण्यापासून स्वच्छच्या कचरा वेचकांनी रोखले आहे. पूर्वी कचरा वेचक नदीकाठी थांबून निर्माल्य गोळा करत असत. परंतु, कोविडच्या प्रादुर्भावानंतरही न थांबता दारोदारी जात हा उपक्रम राबविण्यात कचरा वेचकांना मोठे यश मिळाले आहे.’’

नागरिकांनी हे करावे...

  • घरातील निर्माल्याचे वेगळे संकलन करावे

  • १५ ते २० सप्टेंबर दरम्यान ‘स्वच्छ’चे कचरा वेचक ते संकलन करणार

  • निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच गोष्टींचा समावेश असावा

  • प्लास्टिक, थर्माकोल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, मूर्ती किंवा त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ निर्माल्यात नको

  • निर्माल्य नदी, विहिरी किंवा नाल्यांमध्ये टाकू नका

loading image
go to top