
डॉ. कांचनगंगा गंधे, पुणे
अशोक कुमार सिंग, लखनौ
'औषधी नाही अशी वनस्पतीच नाही' अशा आशयाचे एक वचन आहे. तरीही काही वनस्पती फक्त औषधी, काही विविध देव-देवतांच्या पूजेसाठी, काही सावलीसाठी तर काही फळांसाठी म्हणून ओळखल्या जातात. गणेशपत्रींपैकी बोर आणि डाळिंबाचे झाड फळांसाठी प्रसिद्ध आहेत.
बोराला संस्कृतमध्ये 'बदरीपत्र' म्हणतात. मध्यम उंचीच्या झाडाच्या फांद्या आणि उपफांद्यांमुळे सावलीही चांगली पडते. कोवळ्या फांद्यांवर मऊ केस असतात. पानाची वरची बाजू हिरवी आणि खालजी बाजू पांढरी असते. पानाचं वैशिष्ट्य म्हणजे तीन ठळक शिरा आणि पानाच्या देठाच्या तळाशी दोन्ही बाजूला अणकुचीदार काटे असतात.
एका बाजूचा काटा वरच्या बाजूला तर दुसऱ्या बाजूचा काटा खाली वळलेला असतो. हा वृक्ष कोरड्या जमिनीत, थोड्या पाण्यातही चांगला वाढतो. त्यामुळे दुष्काळी भागात जमिनीचं, मातीचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बोराची झाटे मुद्दाम लावली पाहिजेत.
पानांमध्ये 'सॅपोनिन' आणि 'झिझिपिन' ही ट्रायटर्पिन्स ग्यायकोसाइड हे रासायनिक घटक असल्यामुळे पानांची चव कडवट असते. परंतु फुलपाखरं आणि मॉश यांच्या अळ्यांना पानांमधून त्यांचं 'अन्न' मिळते.फळं पक्षी आनंदानं खातात.
त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने कमी पाण्यातल्या जमिनीतही चांगलं वाढणारं आणि अन्नसाखळीतला एक दुवा म्हणून हे झाड ओळखलं जातं! बोराचं झाड औषधी आहे. उन्हाळे लागले तर बोरीच्या कोवळ्या डिक्शा आणि जिरे एकत्र करून घेतात.
ताप आल्यास पानांचा लेप करून कपाळावर लावतात. बोराच्या फळांमध्ये 'व्हिटॅमिन सी' असल्यामुळे प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात फळं येत असल्यामुळे पर्णभार भाद्रपदात थोडा कमी करण्यासाठी गणेशपत्रीत समावेश केला आहे.
डाळिंबाचं खोड लहान परंतु मजबूत असते. डाळिंबाच्या पानाला 'दाडिमीपत्र' म्हणतात. पानं गडद हिरवी आणि तुकतुकीत असतात. फळात, डाळिंबाच्या दाण्यात 'व्हिटॅमिन सी' असते. घसा दुखत असेल, आवाज बसला असेल तर डाळिंबाच्या सालीच्या पाण्याच्या गुळण्या करतात. ताप आल्यास डाळिंबाचा रस प्यायल्यास अशक्तपणा कमी होतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.