esakal | फिरता गणपती पिंगुळीतील गणेशोत्सवाची वेगळी परंपरा
sakal

बोलून बातमी शोधा

Pinguli-Village-Ganpati

शेकडो वर्षांपूर्वीपासून पिंगुळी गुढीपूरवाडीतील आटक परिवाराच्या गणेशोत्सवाची परंपरा थोडी वेगळी आहे. या घराण्याच्या गणपतीला फिरता गणपती म्हणूनही ओळखले जाते.

फिरता गणपती पिंगुळीतील गणेशोत्सवाची वेगळी परंपरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव : कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) - शेकडो वर्षांपूर्वीपासून पिंगुळी गुढीपूरवाडीतील आटक परिवाराच्या गणेशोत्सवाची परंपरा थोडी वेगळी आहे. या घराण्याच्या गणपतीला फिरता गणपती म्हणूनही ओळखले जाते. या घराण्याने या गणेशोत्सवामुळे लोप पावत चाललेली एकत्र कुटुंबपद्धतही जोपासली आहे.

तेथे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी केवळ मुख्य पाचच घरांमध्ये दरवर्षीप्रमाणे गणपती पूजला जायचा. या घराण्यात वरसल किंवा वरसकी हा प्रकार आहे. म्हणजे ज्या वर्षी ज्या घराची पाळी त्याने सर्व जबाबदारी घेऊन सर्व खर्च उचलायचा असतो. विशेष म्हणजे ज्याची वरसल त्याच्या घरी याचे पूजन होते. कितीही गरीब घराणे असले तरी हा कार्यक्रम प्रत्येकजण आनंदाने करतात. आज पाच घरांची सुमारे पंधरा घरे झाली आहेत. त्यातील आठ ते नऊ घरे स्वेच्छेने येईल. तेव्हा गणपती पूजनाचा कार्यक्रम करतात. त्यामुळे प्रत्येक घरात नऊ वर्षांतून एकदा गणपती येतो. पहिल्या दिवशी आटक परिवारातील सर्व लोक एकत्रित कार्यक्रम करतात. या कार्यक्रमाला सुमारे शंभर सभासदांचा समावेश असतो. रोज दुपारी आणि रात्री आरती आणि प्रसाद होतो. गणपती विसर्जनादिनी पुन्हा सर्व आटक परिवार एकत्र येऊन पूजा-अर्चा, आरती, जेवण व विसर्जनाचा कार्यक्रम होतो. गणपतीचे पूजन ज्या आसनावर होते.

तिथे गणपतीच्या उजव्या बाजूला कुलदेवता खंडोबा आणि भवानी मातेचे पूजन केले जाते. दरवर्षी आटक परिवारांना एकत्र आणणारी ही वडिलोपार्जित घालून दिलेली परंपरा या कुटुंबाना तर फारच अवर्णनीय वाटते. या वर्षी गणपती पूजनाचा मान पेशाने शिक्षक असलेल्या पांडुरंग आटक आणि परिवाराला यांना मिळाला आहे. त्यामुळे परंपरेनुसार या वर्षीचे सर्व कार्यक्रम आमच्या घराण्यात साजरे केले जात आहेत, असे श्री. आटक यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

( संबंधित लेख सप्टेंबर २०१९ मध्ये 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाला होता. गणेशोत्सवानिमित्त हा लेख पुन्हा प्रकाशित करत आहोत)

go to top