Ganeshotsav 2022 : ...यामुळे पडले गणेशाला सिंदुरवदन हे नाव, जाणून घ्या कहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : ...यामुळे पडले गणेशाला सिंदुरवदन हे नाव, जाणून घ्या कहाणी

आपल्या लाडक्या बाप्पाची अनेक नावे आहेत. आणि यापैकीच एक म्हणजे 'सिंदुरवदन'. हे नाव गणेशाला पडले याची एक रंजक कहाणी आहे. गणेशपुराणात उल्लेख असलेली ही कथा आता आपण जाणून घेवूया.

ब्रह्मदेव त्यांच्या निवासस्थानी निद्रा करीत असताना कैलासपर्वतावरुन शिव शंकर त्यांना भेटायला आले. मात्र ब्रह्मदेव निद्रावस्थेत होते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर शंकरांनी ब्रह्मदेवांना झोपेतून जाग केलं. झोपेतून जाग येताच ब्रह्मदेवांना जांभई आली. या जांभईतून एक बालक जन्मला. तोवर शंकर तेथून निघून गेले होते.

तो बालक नजरेस पडताच ब्रह्मदेवाने तू कोण असे त्याला विचारले. तेव्हा तो बालक म्हणाला, मी आपल्याच जांभईतून उत्पन्न झालेला आपलाच पुत्र आहे. आता मी कसे जगावे याची मला आज्ञा करावी. तेव्हा ब्रह्मदेव त्याला म्हणाले, पुत्रा मी तुला वर देतो की तू त्रैलोक्यामध्ये मुक्त संचार कर, तुला कोणापासूनही मृत्यू, तू ज्याला अलिंगन देशील त्याचा तात्काळ मृत्यू होईल. तुझ्या शरीराचा रंग तांबडा असल्याने लोक तुला 'सिंदुर' नावाने ओळखतील.

हेही वाचा: ...अन् गणपती बाप्पाने गर्विष्ठ आणि अहंकारी कुबेराला शिकवला धडा

हे ऐकताच हा सिंदुर थेट ब्रह्मदेवालाच अलिंगन देण्यासाठी जवळ येवू लागला. हे पाहून ब्रह्मदेव क्रोधीत झाले आणि म्हणाले, उन्मत्ता तू तर तुझ्या पित्याचाच काळ बनू पाहतो आहे. तुझ्या या कृत्याने तू दैत्य होशील. असे सांगत ब्रह्मदेव वैकुंठात निघून गेले. त्यांच्यामागोमाग हा दैत्यही वैकुंठात पोहोचला. तेव्हा विष्णूने तू कैलास पर्वतावर महादेव शंकराशी युद्ध कर असे सांगितले.

सिंदूर कैलासावर पोहोचला. तेव्हा पार्वतीला घेवून पळून जात असताना गजानाने त्याच्यावर परशूने वार केला. तो दैत्य त्या आघाताने तेथून पृथ्वीवर निघून गेला. व तेथून देवांना त्रास देवू लागला. सगळीकडे या दैत्याने अधर्म माजविला होता. तेव्हा सर्व देवांनी गणेशाचा धावा केला. तेव्हा गणेशाने मी लवकरच सिंदुरासुराचा वध करेन असे देवतांना सांगितले.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : पिटूकला उंदीर गणपती बाप्पाचे वाहन कसा झाला? जाणून घ्या

शंकर पार्वतीकडे गजमुखात गजाननाचा जन्म झाला. जन्मताच या बालकाने मला वरेण्या राजकडे पोहोचवा असे सांगितले. हे ऐकताच शंकरांनी नंदीसह या पुत्राला वरेण्या राजाकडे पोहचवले. वरेण्या राजाची राणी निद्रावस्थेत असताना हे बालक तिच्या शेजारी ठेवण्यात आले. चार हात, आणि मुखावर सोंड असलेले हे बालक वरेण्याची पत्नी पुष्पिका हिने पाहिले. ते पाहताच ती भीतीने जोरात किंचाळली. राजानेही घाबरुन ते बाळ जंगलात नेऊन ठेवले. तेव्हा मोराने अन् भुजंगाने या बाळाचे रक्षण केले. जवळच पाराशर ऋषींचा आश्रम होता. पाराशर ऋषींना संतती नव्हती त्यामुळे ही ईश्वराचीच देण आहे असे मानून त्या बालकाचे संगोपन केले. पाराशर ऋषींनी या बाल गजाननाला शस्त्रास्तर अस्त्र पारंगत केले. इकडे सिंदूरासुराला आकाशवाणी ऐकू आली ज्यात, हे सिंदुरासुरा तुझे प्राण घेणारा आला आहे. हे ऐकुन सिंदुरासुराने कैलासावर धाव घेतली.

हेही वाचा: Ganesh Aarti: तुम्ही सुद्धा 'संकष्टी पावावे' म्हणताय ? वाचा सगळ्या आरत्या योग्य व्याकरणासह

पार्वतीला मारण्यासाठी सिंदुरासुराने शस्त्र उगारताच त्याला बाल गजानन दिसला. सिंदुरासुराने त्याला पकडून आकाशात उड्डाण केले. सिंदुरासुराने आकाशात उड्डाण केले तेव्हा या बालकाचे वजन इतके वाढले कि सिंदुरासुराला त्याचे वजन पेलवेनासे झाले. सिंदुरासुराने त्याला खाली फेकून दिले. हा बाल गजानन नर्मदेत पडला. नर्मदेतील गोटे लाल झाले. बालक मेला असे समजत सिंदुरासुराला आनंद झाला मात्र काही क्षणात त्याला त्या प्रत्येक गोट्यात त्याला गजाननाची मुर्ती दिसू लागली. गजानन उंदरावर बसून सिंदुरासुराच्या राजधानीकडे गेले. हाती आयुधे आणि उंदरावर बसून आलेला क्रोधीत बालक पाहून सिंदुरासुराला वाटले आपण याला मिठीत घेवून यमसदनी पाठवू. मात्र तेव्हढ्यात गजाननाने विराट रुप धारण केले.

हेही वाचा: रावणाला लंकेत न्यायचे होते शिवलिंग; गणेशाच्या बुद्धीचातुर्यापुढे टेकले हात

अनंत मस्तके, अनेक हात आणि पाय असलेले हे विराट रुपात सिंदुरासुरालाच मिठी मारली आणि सिंदुरासुराचा चेंदामेंदा केला. त्यावेळी गजाननाला सिंदुरासुराच्या अंगाचे रक्त लागल्याने गजाननाचे अंग तांबडे झाले. तेव्हापासून गजाननाला 'सिंदुरवदन' म्हटले जाऊ लागले.

Web Title: Ganeshotsav 2022 How Ganesha Got The Name Sindurdan Know The Story

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..