...अन् गणपती बाप्पाने गर्विष्ठ आणि अहंकारी कुबेराला शिकवला धडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav Festival 2022

...अन् गणपती बाप्पाने गर्विष्ठ आणि अहंकारी कुबेराला शिकवला धडा

कोणाकडे किती संपत्ती आहे हे त्याचे प्रारब्ध, कर्म अन् नशीब ठरवत असते. असे असले तरी प्रत्येक जण हा आपापल्या परिने संपत्ती मिळवत आपले गुजराण करीत असतो. मात्र काही लोक अशी असतात जी आपल्याकडील धनसंपत्तीचे केवळ इतरांना दाखविण्यासाठी प्रदर्शन करत असतात. असेच प्रदर्शन धनाची देवता कुबेराने देखील केले होते मात्र त्यांना त्याची योग्य ती जाणिव गणपती बाप्पांनी करुन दिली होती. काय नेमकं घडल होत, त्यासाठी हा लेख पुर्ण वाचा.

भगवान शंकर आणि पार्वती एकदा कैलास पर्वातावर बसले होते. त्यावेळी तेथे धनाची देवता कुबेर आले. त्यांनी शंकर आणि पार्वतीला आपल्याकडे जेवणाचे आमंत्रण दिले. अगदी शंकर आणि पार्वतीने तेथे यावेच असा आग्रह धरला. मात्र भगवान शंकरांनी त्यांचे आमंत्रण स्विकारले नाही. कुबेरांनी खुप आग्रह केल्यानंतर शंकरांनी शेवटी आमचा पुत्र गणेश आपल्याकडे भोजनाला येईल असे सांगितले. शंकर, पार्वतीचे पुत्र गणेश हे आपल्याकडे भोजनासाठी येणार हे ऐकल्यावर कुबेरांना अतिशय आनंद झाला. आणि ते कैलास पर्वतावरुन आपल्या घरी गेले.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 ...अशी ओळखा मातीची गणेश मूर्ती

कुबेर कैलास पर्वतावरुन गेल्यानंतर माता पार्वतीने पती शंकरांना विचारले, की ते एवढं आग्रह अन् विनंती करीत होते, तरी आपण त्यांच्या विनंतीला मान द्यायला हवा होता. पण आपण असे न करता थेट त्यांचे निमंत्रण नाकारले.

तेव्हा शंकर पार्वतीला म्हणाले कि कुबेर हा धनाचा अधिपती आहे. त्यामुळे त्याला त्याच्याकडील संपत्तीचा अहंपणा आला आहे. तो आपल्याला भोजनाचे आमंत्रण नाही तर त्याच्या संपत्तीचे दर्शन घडावे यासाठी बोलवत होते. आणि त्यांचा हा अहंपणा दुर व्हावा यासाठीच मी गणेशाला त्यांच्याकडे पाठवणार आहे.

भगवान शंकरांनी लागलीच नंदीला सांगून गणेशाला बोलावणे धाडले. गणेश कैलास पर्वतावर आले, आपल्या माता- पित्यांना वंदन करुन काय आज्ञा आहे असे त्यांनी शंकरांना विचारले. तेव्हा शंकरांनी गणेशाला सांगितले, कि गणेशा तुम्हाला कुबेराने त्यांच्या घरी भोजनासाठी आमंत्रण दिले आहे. तरी आपण त्यांचा मान राखण्यासाठी त्यांच्याकडे भोजनासाठी जावे. पिता शंकरांचे बोलणे ऐकून गणपतीने पुन्हा माता- पित्यांना वंदन केले आणि त्यांनी कुबेराच्या घराकडे प्रस्थान केले.

कुबेरांनी शंकर- पार्वतीचे पुत्र गणेशाच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. गणेशाचे कुबेरांच्याकडे आगमन होताच मोठ्या थाटामाटात अन् सनई चौघड्यांच्या निनादात त्यांचे स्वागत करण्यात आले. गणेश कुबेरांकडे येताच कुबेरांनी त्यांना आपला महाल, त्यातील अनमोल रत्नजडीत सामग्री दाखविण्यास सुरुवात केली.

गणेश ते सर्व पाहात असताना कुबेरांना नम्रपणे म्हणाले, महाराज आपण मला आपल्याकडे भोजन ग्रहण करण्यासाठी बोलाविले होते, आणि आता मला प्रचंड भूक लागली आहे तरी आपण प्रारंभी भोजन करुया आणि मगच आपल्याकडील मौल्यवान साधन संपत्तीचे दर्शन घेवूया.

गणेशाचे बोलणे ऐकून कुबेरांनी त्यांना वंदन करत सेवकांना भोजनाची तयारी करण्याची आज्ञा केली. काही क्षणात गणेशासमोर स्वादिष्ट अशी एक अन् अनेक पक्वान्ने आली. गणेशाने भोजनापुर्वी अन्नपुर्णेच आणि आपल्या माता- पित्यांचे स्मरण केले. कुबेरांनी त्यांना पोटभर भोजन ग्रहण करावे अशी विनंती केली अन् गणेशाने भोजनाला सुरुवात केली.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : घरीच बनवा इको फ्रेंडली गणेश मूर्ती

एक- एक करुन गणेशाने पुढे असलेली सर्व पक्वान्ने संपविली आणि अजून हवी असल्याची मागणी कुबेरांकडे केली. कुबेरांनीसुद्धा लगेच सेवकांना आज्ञा केली. सेवक अन्न गणेशापुढे ठेवत असत अन् गणपती बाप्पा ते लगेच फस्त करत. असे सुरु होते. अगदी सेवकही स्वयंपाक घरातून अन्न आणे पर्यंत गणपतीचे पान रिकामे. सेवक लगबगीने अन्न आणत होते.

एक- एक करत स्वयंपाक घरातील तयार केलेले सर्व अन्न एकट्या गणेशाने फस्त केले होते, मात्र तरीही त्यांची भूक भागली नव्हती. पुन्हा अजुन अन्नाची त्यांनी मागणी केली. पुन्हा एकदा अन्न शिजवण्यात आले. तेही संपले पण गणेशाची भूक काही करता भागेना. हळुहळु भांडारातील धान्यही संपले. हे पाहून कुबरेही घामाघून झाले अन् ही गणेशाचीच लिला आहे असे मानून त्यांच्या पुढ्यात कुबेरांनी हात जोडले, आणि क्षमा मागित म्हणाले गणेशा मला खरच माझ्याकडील संपत्तीचा गर्व झाला होता अन् त्या गर्वापायी मी तुम्हाला आज येथे भोजनाचे आमंत्रण दिले. मात्र तु्म्ही मला पुरती शिकवण दिली आहे. यापुढे मी कधीही संपत्तीचा गर्व करणार नाही. गणेशाने त्यांची क्षमा याचना पाहून काहीही न बोलता ही तर आमच्या पिताश्रींची इच्छा असे म्हणत छान ढेकर दिला आणि आपल्या घराकडे प्रस्थान केले.

तर अशाप्रकारे गणेशाने धनाचे अधिपती कुबेरांना आपल्या कृतीतून त्यांच्यातील गर्व आणि अहंभावना नष्ट करत कधीही आपल्याकडील संपत्तीचे दर्शन कुणालाही कमी लेखण्यासाठी करवून देवू नये अशी शिकवणही दिली.

म्हणूनच तर गणपती बाप्पाला सर्व गुणांचा अधिपती म्हटले आहे.

हेही वाचा: गणेश उत्सवाची तयारी...

Web Title: Ganeshotsav 2022 Special Story About Lord Ganapati Broke Ego Of Lord

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..