Ganeshotsav 2023: गणरायाकडून महिलांनी शिकावे 'हे' आर्थिक नियोजनाचे धडे

Ganeshotsav 2023: गणराया आर्थिक नियोजनात आलेले सर्व अडथळे पार करून आपलं भविष्य सुरक्षित करण्याची प्रेरणा महिलांना देतो.
Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023Sakal

- किरांग गांधी

Financial Planning Tips : गणेशोत्सवानिमित्त घरोघरी गणरायाचे आगमन झाले आहे. महाराष्ट्रातील घराघरात गणरायाचे मनोभावे स्वागत आणि प्रतिष्ठापना केली जाते. फक्त अध्यात्मातच नव्हे तर आपल्या रोजच्या जगण्यात आणि आपल्या आर्थिक नियोजनात उपयोगी पडेल असा संदेश गणेश चतुर्थीचा सण देतो.

हा संदेश समजून घेतल्यास महिलांच्या आर्थिक नियोजनाच्या बाबतीत त्यातून अनेक धडे मिळतात. त्याचे पालन केल्यास महिलांना आर्थिक स्वयंपूर्णता मिळवणे अत्यंत सोपे होऊ शकते. गणेशाला विघ्नहर्ता असेही म्हणतात. कोणत्याही संकटातून भक्तांना तारून नेण्याची किमया गणेशाला अवगत आहे.

त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक नियोजनात आलेले सर्व अडथळे पार करून आपलं भविष्य सुरक्षित करण्याची प्रेरणा तो महिलांना देतो. गणेशाकडून मिळणारे असे कोणते धडे आहेत की ज्यांचा अवलंब केल्यास महिलांना आर्थिक दृष्टीने स्वयंपूर्ण होणे सहज शक्य होईल? चला तर, पाहूया.

१. स्पष्ट ध्येय ठेवून सुरुवात करा

 कोणतेही कार्य सुरू करताना आपण गणेशाची आराधना करतो, त्याचप्रमाणे आर्थिक नियोजन सुरू करताना आपलं ध्येय अत्यंत स्पष्ट असायला हवं. सुरुवात करताना तुमची उद्दिष्टे निश्चित करा. मुलांचं शिक्षण असो, परदेश वारी असो, स्वतःचं लग्न असो वा निवृत्तीनंतरचे नियोजन असो... उद्दिष्ट स्पष्ट असल्यास आपल्याकडे असलेला पैसा योग्य ठिकाणी जातोय की नाही हेही पडताळून पाहता येतं.

२. बदल स्वीकारा आणि त्याप्रमाणे स्वतःला बदला

 गणेशोत्सव संपल्यावर आपण आपल्या घरात असलेल्या गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन करतो. भक्तांचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर बाप्पा विसर्जनासाठी सज्ज होतो, त्याचप्रमाणे आर्थिक नियोजन करताना आपण बदलांसाठी आणि बदलत्या परस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असलं पाहिजे.

महिलांना आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातही अशा अनेक बदलांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आर्थिक नियोजनाचा दीर्घकालीन फायदा मिळावा यासाठी बदलांना पूरक असलेलं मॉडेल स्वीकारलं पाहिजे.

  ३. उधारी आणि कर्जाचे अडथळे दूर करा

 विघ्नहर्ता या आपल्या नावाप्रमाणेच प्रत्येक विघ्न, मार्गातील अडथळे दूर करणं हे गणेशाचं काम आहे. त्याचाच आदर्श घेऊन आपल्या आर्थिक नियोजनात अडथळा ठरू पाहणाऱ्या उधारी आणि कर्जासारख्या गोष्टी आपण लवकरात लवकर दूर केल्या पाहिजेत.

कर्जापासून मुक्त राहणे हा समृद्धीकडे जाण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे अनावश्यक कर्ज किंवा उधारी घेणं थांबवा, आणि कर्ज असल्यास ते लवकरात लवकर कसं चुकवता येईल यावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा आपल्यावर कर्जाचा भार असतो तेव्हा चांगला परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित करू शकता.

४. बचतीची सवय लावा

 गणेशाला लंबोदर असेही म्हणतात. त्याचे विशालकाय पोट हे धनसंचयाचे प्रतीक मानले जाते. त्यापासून प्रेरणा घेऊन प्रत्येक महिलेने पैशांची बचत केली पाहिजे. आज बचतीचे बीज पेरल्यास भविष्यात त्यातून आर्थिक समृद्धीचा वटवृक्ष उभा राहू शकतो.

५. गणेशाप्रमाणेच तुमच्या संपत्तीसाठी मखर तयार करा

गणेशोत्सवानिमित्त घरोघरी गणरायाचे आगमन होते आणि सुंदर मखरात गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. याचाच आदर्श म्हणून महिलांनी स्वतःसाठी संपत्तीचं मखर उभारलं पाहिजे.

फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, विमा पॉलिसी अशा पारंपारिक पर्यायांवर अवलंबून न राहता जास्त परतावा मिळवून देणाऱ्या नवनवीन पर्यायांमध्ये आपली गुंतवणूक डायव्हर्सिफाय केली पाहिजे.

स्टॉक, बाँड, म्युच्युअल फंड, ETF, REITF अशा नवनवीन पर्यायांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. त्यातून रिस्क कमी होते आणि जास्त परताव्याची शक्यता वाढते. पुढे जाऊन असे पर्याय तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळवून देतात.

 ६. गुंतवणूक करताना संपत्तीचा युक्तीने वापर करा

गणेशाच्या एका कथेत त्याने आपल्या तुटलेल्या दाताचा वापर लेखणी म्हणून केल्याचा उल्लेख आढळतो. त्या कथेतून प्रेरणा घेऊन आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा युक्तीने वापर करत त्यातून जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न महिलांनी केला पाहिजे.

गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेऊन, गरज भासल्यास जास्त परताव्यासाठी घासाघीस करून, स्त्रियांनी उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधले पाहिजेत. असं केल्यास स्त्रियांचं आर्थिक नियोजन अत्यंत प्रभावी होऊ शकेल.

Ganeshotsav 2023
Bhagavad Gita: श्रीमद्‌भगवद्‌गीता- शरीर आणि मनात स्फुल्लिंग पेटवणारा 'प्रोग्रॅम'

७. चुकांमधून शिका

गणेशाचं इतर देवतांसोबत असलेलं नातं हे अत्यंत खेळीमेळीचं आहे. आयुष्य गरजेपेक्षा जास्त गांभीर्याने न घेता ते निवांतपणे जगण्याचा, पण तरीही झालेल्या चुकांमधून शिकत राहण्याचा आणि स्वतः मध्ये सुधारणा करण्याचा संदेश आपल्याला गणेशाकडून मिळतो.

गुंतवणूक करताना, आर्थिक निर्णय घेताना चुका तर होणारच, पण महिलांनी अशा चुकांमधून शिकत पुढे गेलं पाहिजे. तुमची गुंतवणूक किंवा एखादा निर्णय अयशस्वी ठरला, तर त्यात नक्की कुठे चुकलं याचा विचार करा, त्याप्रमाणे तुमचं पुढचं धोरण ठरवा. प्रत्येक अपयश हे त्यातून योग्य धडा घेतल्यास तुमच्या आर्थिक यशाकडे टाकलेलं पाऊल ठरू शकेल.

 ८. तज्ञांचे मार्गदर्शन, सल्ला घ्या

 गणेशाच्या अनेक नावांपैकी विघ्नहर्ता हेही त्याचं एक नाव. भक्तांची विघ्ने दूर करणारा विघ्नहर्ता! तुमचं आर्थिक नियोजन करताना, गुंतवणुकीचे निर्णय घेताना सल्लागारांच्या, आर्थिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा, फायनान्शियल मेंटरचा सल्ला घ्या.

आर्थिक अनिश्चिततेच्या जगात बचत, गुंतवणूक कशी करावी, त्यातून जास्तीत जास्त परतावा कसा मिळवावा यासाठी ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. अनुभवी मार्गदर्शक तुम्हाला वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करून तुमचं धोरण आखण्यात, त्यानुसार काम करण्यात मदत करू शकतात. त्यातून तुमची आर्थिक ध्येय गाठण्याचा प्रवास सोपा होऊ शकतो.

 ९. शहाणपणाची गुंतवणूक - भविष्यातल्या समृद्धीचं बीज

श्रीगणेश ही ज्ञानाची, बुध्दीची आणि विवेकाची देवता आहे. त्यापासून आदर्श घेत गुंतवणूक करताना, आर्थिक निर्णय घेताना प्रत्येक स्त्रीने संयम बाळगायला शिकलं पाहिजे.

तुमची रिस्क घेण्याची क्षमता आणि ठरलेली आर्थिक उद्दिष्ट्ये, या दोन्हींमध्ये समतोल साधणारी गुंतवणूक केली पाहिजे. त्यासाठी तुमची गुंतवणूक अनेक पर्यायांमध्ये डायव्हर्सिफाय करा. त्यातून जास्तीत जास्त आणि दीर्घकाळ परतावा मिळू शकतो.

 १०. तुम्हाला प्रिय असणाऱ्या गोष्टी आणि नाती जपा

 आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींसाठी सुरक्षित भविष्य घडवण्याची प्रेरणा आपल्याला गणेशाकडून मिळते. तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी योग्य ठरेल असा विमा घ्या. टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, क्रिटिकल इन्श्युरंस असे अनेक पर्याय त्यात उपलब्ध आहेत.

त्यातून तुमचं भविष्य सुरक्षित होऊ शकेल. योग्य विमा तुम्हाला मानसिक स्थैर्य देतो. भविष्यात एखादं मोठं आर्थिक संकट आल्यास त्यातून तुमचं आर्थिक नियोजन कोलमडत नाही.

Ganeshotsav 2023
Dnyaneshwari: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

११. बजेटिंग करा

 गणेशाला मोदकाचा नैवेद्य दिला जातो. नैवेद्य हे आपल्याकडे असेल्या रिसोर्सेसचं योग्य पद्धतीने नियोजन करण्याचं प्रतीक आहे. तुमचं उत्पन्न, खर्च आणि बचत करण्याचं ध्येय यांचा एकत्रितपणे विचार करून तुमचं बजेट ठरवा. अशा प्रकारे योग्य पद्धतीने बजेट तयार केल्यास त्यातून तुमच्या पैशांचा योग्य वापर होऊ शकेल आणि त्यातून तुमच्या गरजा आणि चैनी, दोन्ही पूर्ण होऊ शकतील.

१२. संयम बाळगा

 संयम बाळगण्याचा आणि त्यातून आपल्या क्षमता विकासित करण्याचा संदेश आपल्याला गणेशाकडून मिळतो. संयम ही वैयक्तिक आर्थिक नियोजनाची गुरुकिल्ली आहे. संपत्ती वाढवणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. भावनेच्या आहारी जाऊन खर्च करण्याचा, झटपट परतावा मिळवण्याचा मोह टाळा. गुंतवणुकीचे विचारपूर्वक नियोजन केल्यास त्यातून योग्य परतावाही मिळतो आणि तुमचं भविष्यही सुरक्षित राखता येतं.

१३. स्वतःमध्ये सतत सुधारणा करत रहा

 श्रीगणेश ही बुध्दीची आणि ज्ञानाची देवता आहे. गणेशाकडून प्रेरणा घेऊन प्रत्येक स्त्रीने आर्थिक नियोजनाच्या बाबतीत सतत नवनवीन ज्ञान घेत राहण्याची आणि शिकत राहण्याची तयारी ठेवली पाहिजे. आर्थिक नियोजन या विषयावरील पुस्तकं वाचून, प्रत्यक्ष मार्केटचा अभ्यास करून त्यातून आपलं ज्ञान वृद्धिंगत केलं पाहिजे. सतत बदलणाऱ्या मार्केटच्या पार्श्वभूमीवर तुमचा अभ्यास आणि ज्ञान तुम्हाला अत्यंत उपयोगाचे ठरू शकते.

Ganeshotsav 2023
हातातला Mobile आणि समोरचा Computer केव्हा बंद करायचा याचं हवं भान!

१४. प्रत्येक यशाचा उत्सव करा

 गणेशोत्सव हा आनंदाचा उत्सव आहे. तुमचा आर्थिक समृद्धीकडे जाण्याचा प्रवास हाही एक आनंदाचा उत्सव असला पाहिजे. या प्रवासात तुम्ही पार केलेले छोटे टप्पे, मिळालेलं छोटं यश साजरं करा. ठरवलेलं आर्थिक उद्दिष्ट्य पूर्ण झाल्यास स्वतःचं कौतुक करा. असा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सतत अर्थिक नियोजन करण्यासाठी आणि त्याप्रमाणे वागण्यासाठी प्रोत्साहित करत असतो.

गणेशोत्सव साजरा करत असतानाच, गणेशाकडून आपल्याला मिळणारे अध्यात्मिक ज्ञान आणि महिलांच्या आर्थिक नियोजनात आवश्यक असलेली मूल्ये यांचा समांतरपणे विचार आपण केला.

भयमुक्त आणि सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी आपण गणेशाचा दरवर्षी नित्यनेमाने आशीर्वाद घेतो, त्याचप्रमाणे सुरक्षित भवितव्यासाठी या आर्थिक नियोजनातील शिकवणीचा अवलंब प्रत्येक स्त्रीने करायला हवा.

आर्थिक ज्ञान मिळवून, कर्ज आणि उधारी यांचं लष्टक टाळून, योग्य पर्यायांमध्ये गुंतवणूक करून आणि आर्थिक नियोजनात झालेल्या चुकांमधून धडा घेऊन पुढे गेल्यास महिला आपलं आर्थिक भवितव्य सुरक्षित करू शकतात यात शंका नाही.

 (लेखक: किरांग गांधी हे एक अनुभवी आर्थिक मेंटोर आहेत, ज्यांना पर्सनल फायनान्स क्षेत्रात 25 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com