
मुंबई - गणेशोत्सव आणि मोहरम या सणांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहे. मुंबईत बंदोबस्तासाठी तब्बल 50 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणांवर पाच हजार सीसी टीव्ही आणि ड्रोनची करडी नजर असेल.
मुंबई - गणेशोत्सव आणि मोहरम या सणांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहे. मुंबईत बंदोबस्तासाठी तब्बल 50 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणांवर पाच हजार सीसी टीव्ही आणि ड्रोनची करडी नजर असेल.
50 हजार पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दल, शीघ्र कृती दल, सशस्त्र पोलिस दल, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक व नाशकपथक, होमगार्ड व नागरी संरक्षण विभागाचे कर्मचारीही बंदोबस्तासाठी मुंबईत विविध ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनादरम्यानच्या मिरवणुकांदरम्यान महिलांची छेडछाड, पाकीटमारी आदींसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसही लक्ष ठेवून असणार आहेत. तसेच हरवलेल्या मुलांसाठी विशेष मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. यासोबतच विविध चौपाट्यांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्रेही उभारण्यात आली आहेत. याशिवाय चौपाट्यांवर बॅरिकेटिंग करण्यात आली असून, जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. विसर्जनादरम्यान महापालिका, तटरक्षक दल आणि नौदलाचीही मदत घेतली जाणार असल्याची माहिती उपायुक्त मंजुनाथ सिंग यांनी दिली.
गणेशोत्सवासाठी बाहेरच्या पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून अतिरिक्त कुमक पोलिसांना देण्यात आली आहे. त्यात आरएएफच्या एका कंपनीचाही समावेश आहे. याशिवाय 50 अधिकारी, 520 होमगार्ड व 500 नागरी संरक्षण कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यातील दहशतवादविरोधी कक्ष (एटीसी) यांनाही परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
लालबागच्या राजासाठी विशेष बंदोबस्त
लालबागच्या राजासाठी तीन टप्प्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. घातपाती कारवाई व चेंगराचेंगरीची भीती लक्षात घेता तेथे फोर्स वन व क्यूआरटीचे अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. परिसरातील पाच उंच इमारतींवर दुर्बिणधारी पोलिसही तैनात राहणार आहेत. संपूर्ण बंदोबस्तासाठी 11 उपायुक्तांसह 100 अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. त्यात चार सहायक पोलिस आयुक्त, 20 पोलिस निरीक्षक, 59 सहायक पोलिस निरीक्षक, 500 कर्मचारी, राज्य राखीव पोलिस दलाची एक कंपनी, दंगल नियंत्रण पथक, 24 डीएफएमडी व 24 एचएचएमडी, एक सीसी टीव्ही व्हॅन, चार कॉम्बॅट व्हॅन तैनात करण्यात येतील.