#BappaMorya पूजासाहित्यांनी सजली बाजारपेठ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 September 2018

पुणे - पळीपंचपात्र, ताम्हण, मखमली आसन, चौरंग, विड्याची पाने, जानवी जोड, रुमाल, कापसाची माळावस्त्रे, सोवळे, सुपाऱ्या, हळद-कुंकू, तांदूळ, धूप, दीप, उदबत्त्या, ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेसाठी पुस्तके अन विविध प्रकारच्या सीडीजने बाजारपेठ सजली आहे. विशेष म्हणजे बाप्पांच्या स्वागतासाठी आणि हजरत हसन, हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ताबूतची स्थापना करण्यासाठीही सर्वधर्मीय नागरिक सेवा देत असल्याचे चित्र शहरात मंगळवारी दिसले. 

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला (ता. १३) गणेशोत्सवास सुरवात होत आहे. उद्यापासून (ता. १२) मुस्लिम धर्मीयांच्या नवीन वर्षाची अर्थातच मोहरम महिन्याचीही सुरवात होत आहे. मोहरमच्या पहिल्या तारखेला ताबूतची स्थापना करण्यात येते. त्यामुळे ताबूत अन्‌ गणेशोत्सवाच्या तयारीला भाविक लागले आहेत. पेशवेकालीन ताबूतची परंपरा आजही पुण्यात जपली जाते. वंशपरंपरेने आत्तार, बागवान समाजाचे नागरिक असोत की सोन्या-चांदीचे दागिने घडविणारे कारागीर असोत प्रत्येक जण कार्यमग्न असल्याचे पाहायला मिळत आहे. तांबे-पितळीची बाजारपेठ, कापड बाजार, फर्निचर, सजावट साहित्य, मिठाईचे व्यापारी, पूजासाहित्याचे विक्रेते, घाऊक व किरकोळ विक्रेत्यांपासून ग्राहकांपर्यंत सर्वांचीच मुख्य बाजारपेठेत लगबग पाहायला मिळत आहे. 

केवळ पूजासाहित्याच्या खरेदी-विक्रीतून कोटींची उलाढाल पुण्यनगरीत होते. बचत गटांमधील महिलांसह अनेकांना या उत्सवात रोजगार मिळतो. अनेक लहान-मोठे कारखानदारही तीन-चार महिने अगोदरच विविध उत्पादनाच्या तयारीला लागतात. 
- कल्पना गंजीवाले, विक्रेत्या 

हजरत हसन, हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही ताबूत बसवतो. विड्याच्या पानांचे तोरण ताबूतला व पंजांना वाहतो. माहूरची रेणुका व तुळजापूरच्या भवानी देवीलाही आमच्याकडून पाने जातात. गणेशोत्सवासाठी लिंबगाव, सातारा, सांगली येथून विड्याची पाने आली आहेत. 
- मदिना तांबोळी, पान विक्रेत्या

अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाला आत्तार समाजातर्फे दरवर्षी नारळाचे तोरण असते. आमची पाचवी पिढी बाप्पाच्या सेवेत आहे. वंशपरंपरेप्रमाणे आत्तार समाज पूजेचे साहित्य विकतो. यंदा ६०० रुपये किलोचा कापूरचा भाव सोळाशे रुपये झाला आहे. 
- गुलजार आत्तार, विक्रेते

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bappa Morya Ganesh pooja materials in market