गुडबाय बाप्पा!

गुडबाय बाप्पा!

नागपूर - गेले दहा दिवस सकाळी कानावर पडणारी गणेशस्तुतीवरील गीते, आरतीमुळे घराघरांत संचारलेली भक्ती व ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाची मंगळवारी गणरायाच्या विसर्जनासह सांगता झाली. ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात गणेशभक्तांनी आज घराजवळील कृत्रिम तसेच मोठ्या तलावांत विघ्नहर्त्याला जड अंतःकरणाने निरोप दिला. ढोल-ताशांच्या गजरासह गणेश मंडळांच्या मोठ्या गणरायाच्या मूर्तीचे फुटाळा तलावावर रात्री उशिरापर्यंत विसर्जन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे विसर्जनाच्या दिवशी उपचाराला का होईना वरुणराजानेसुद्धा हजेरी लावली. 

दुपारी पौर्णिमा सुरू होणार असल्याने बहुतांशी घरगुती गणपतींचे सोमवारी विसर्जन करण्यात आले. परिणामी फुटाळा तलावावर यंदा नवव्या दिवशी मोठ्या प्रमाणात विसर्जन झाले. तरीही मंगळवारी गणेश भक्तांचा फुटाळ्यावर मोठ्या प्रमाणात ओघ होता. गांधीसागर, सोनेगाव आणि सक्करदरा या तलावांमध्ये यंदा विसर्जनावर बंदी असल्याने गणेश मंडळांचा संपूर्ण भार फुटाळा तलावावर होता. घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी यंदा नागपूरकरांनी कृत्रिम टॅंकला पसंती दिली. या व्यतिरिक्त सर्वच तलावांच्या ठिकाणी कृत्रिम तलावाची सोय उपलब्ध करून देण्यात आल्यानंतरही नागरिकांनी गर्दी नसल्याचा लाभ घेत तलावांमध्ये मूर्तीचे विसर्जन केले. पाचपावली ठक्करग्राम पुलाजवळ, तांडापेठ, निमकर कॉलनी, एनआयटी मैदान, प्रेमनगर, मानेवाडा चौक, तुकडोजी पुतळा चौक, तिरंगा चौक, शांतीनगर मुदलियार चौक, व्हॉलीबॉल ग्राउंड, लक्ष्मीनगर, पांडे ले-आउट, चिल्ड्रेन ट्राफिक पार्क, धरमपेठ, राजीव गांधी पुतळा, अजनी चौक, समाजभवन हिवरीनगर, रमणा मारोती, सुभाष मैदान शाळा, दिघोरीकर मैदान, बगडगंज मनपातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या कृत्रिम तलावांत तसेच बिंझाणी महाविद्यालयाच्या जलतरणात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पीओपीसह मातीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’ यांसारख्या घोषणांसह गुलालांची उधळण करीत मंडळाच्या तरुण-तरुणींनी उत्साहात गणरायाचे विसर्जन केले. विसर्जनास आलेल्या नागरिकांकडून ग्रीन व्हिजिल, रोटरी क्‍लब, एनएसएफ, राष्ट्रीय सेवा योजना यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व विद्यार्थी निर्माल्य गोळा करीत होते. 

भाविकांची रुखरुख
उत्सव कोणताही असो, त्याला डीजेची साथ हे अलीकडच्या काळातील समीकरणच ठरले. यंदा मात्र विसर्जन मिरवणुकीत अभावानेच डीजे दिसून आले. डीजे नसल्याने तरुणाईचा काहीसा हिरमोड झाल्याचे भासत होते. याबाबतची रुखरुख अनेकांनी बोलून दाखविली. अतिउत्साही कार्यकर्त्यांची ढोलताशा पथक लावून नृत्याची हौस भागवून घेतली.

‘निर्माल्य द्या, फ्रुटी प्या’
रोटरीसह विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक निर्माल्य संकलनासाठी विसर्जन स्थळी फिरत होते. फुटाळा तलावावर स्वयंसेवकांची संख्या फारच अधिक दिसून आली. मूर्ती घेऊन येणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोहोचून निर्माल्य आपल्याकडील पिशवीत घेतले जात होते. एका संस्थेने मुख्य मार्गावरच ‘निर्माल्य द्या, फ्रुटी प्या’ हा अभिनव उपक्रम राबविला. भाविकांकडूनही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला.

शांततेत विसर्जन
शहरातील पोलिसांच्या सकारात्मक सहकार्यामुळे बाप्पांचे विसर्जन शांततेत पार पडले. पोलिसांनी सकाळपासूनच विसर्जनस्थळावर बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. बंदोबस्तातील पोलिसांना शहरातील नागरिकांनी सहकार्य केले. पोलिस आयुक्‍तांनी स्वतः बंदोबस्ताची कमान सांभाळल्याने सर्वकाही सुरळीत होते. फुटाळा, अंबाझरी आणि गांधीसागर तलावावर आज मंगळवारी सकाळपासूनच पोलिस तैनात होते. गणेश मंडळांनीही पोलिसांना सहकार्य केल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. 

रस्त्यावर गर्दी नाही
वाहतूक पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे शहरात कोणत्याही रस्त्यावर गर्दी उसळली नाही. तसेच ट्रॅफिक जाम झाला नाही. त्यामुळे वाहनचालकांमध्ये गोंधळ उडाला नाही. अनेक रस्त्यावर  वाहतूक शाखेने एकेरी वाहतूक केली होती तर अनेक मार्ग वळते केल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली नाही.

डीजे बंदमुळे ढोलवाल्यांची चांदी
डीजेवर बंदी असल्यामुळे रस्त्यावर गोंगाट झाला नाही. कुठेही डीजे-डॉल्बी वाजत नसल्यामुळे सामान्य नागरिकांनी सुटकेचा श्‍वास टाकला. यावर्षी ढोल वादक पथकांची चांदी झाली. मात्र, ढोल पथकांचीही कमतरता असल्यामुळे गणपतीच्या विसर्जनात ढोल वादकांचीही संख्या कमी होती.

चोख बंदोबस्त 
फुटाळा तलाव येथे गणेशभक्‍तांच्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी सकाळी सहापासून पोलिसांची मोठी कुमक लावण्यात आली. १०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि २ वॉचटॉवरवरून पोलिसांनी विसर्जन स्थळावर लक्ष केंद्रित केले. 

‘सेल्फी  विथ बाप्पा’
विसर्जनापूर्वी गणरायासोबत निरोपाचा सेल्फी घ्यायला तरुणाई विसरली नाही. अक्षरशः लहान मुलेदेखील यामध्ये मागे नव्हती. सेल्फी घेऊन व्हॉट्‌सॲप, फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्‌विटरवर अपलोड करण्यावर अनेकांचा भर होता. 

पावसाच्या हजेरीने उत्साहात भर
उपराजधानीत सकाळपासूनच गणेश विसर्जन सुरू झाले. ढगाळ वातावरणामुळे भाविकांची चांगलीच सोय झाली. सायंकाळी गणेश विसर्जन करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. नेमके त्याच वेळी पावसाने हजेरी लावत मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. पावसात भिजतच मिरवणुकीतील प्रत्येकाने नाचण्याची हौस भागवून घेतली.

महापौरांनी बोटीतून  केली व्यवस्थेची पाहणी
तलावाकडे जाणारे मार्ग, तलाव परिसर आणि तलावाच्या आत, अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था फुटाळा तलावावर होती. अग्निशमन दलाचे अधिकारी बोटीतून फिरून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. महापौर नंदा जिचकार यांनीही स्वत: बोटीतून फुटाळा तलाव येथील व्यवस्थेचे निरीक्षण केले. याप्रसंगी मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके सोबत होते.

फुटाळ्यावरील  कोरम अपूर्ण
सोहळा कुठलाही असो, फुटाळा चौपाटी हाउसफुल्ल असते. गणेश विसर्जनाच्या पर्वावर तर अलोट गर्दी होते, हा दरवर्षीचा अनुभव. यंदा मात्र बिरसा मुंडा चौक आणि पलीकडच्या भागात गर्दी असली तरी चौपाटी मोकळी भासत होती. फुटाळ्यावरील कोरम अपूर्ण असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com