घराघरांत घुमले "सुखकर्ता, दु:खहर्ता'चे सूर 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 August 2017

रत्नागिरी - डीजेवरील बंदीमुळे ढोल-ताशांसह बेंजोच्या तालावर मिरवणुका काढत जिल्ह्यात 1 लाख 67 हजार 543 घरगुती आणि 122 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनाच्या मुहूर्तावर पावसाने लावलेल्या हजेरीमुळे बळीराजाही सुखावला. गणेशोत्सवाच्या धामधुमीत चिपळूण, संगमेश्‍वरसह काही भागांत पडलेल्या मुसळधार पावसाने भक्‍तांची तारांबळ उडाली होती; मात्र पावसातही गणेशभक्‍तांचा उत्साह कायम होता. 

आज सकाळपासून गावागावांत श्री गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू होती. मुंबईकर चाकरमानी गुरुवारी (ता. 24) रात्रीच कोकणात दाखल झाले होते. त्यामुळे एसटी, रेल्वेसह राष्ट्रीय महामार्गावर गर्दी पाहायला मिळत होती. अनेक ठिकाणी सकाळी पावसाचे वातावरण होते, त्यामुळे चित्रशाळांमधील गणेशमूर्ती लवकरात लवकर घरी आणण्यासाठी घाईगडबड सुरू होती. वाडी-वस्त्यांवर श्री गणेशाच्या विविध भक्‍तिगीतांचे सूर आळवले जात होते. अनेक ठिकाणी मिरवणुकीने गणपती घरी आणण्याची प्रथा आहे. पावसाच्या सावटातही ती परंपरा जपण्याची तारांबळ ठिकठिकाणी पाहायला मिळत होती. रत्नागिरी शहरात कर्ला-जुवे-आंबेशेतची मिरवणूक त्याचाच एक भाग आहे. सुमारे सव्वाशेहून अधिक गणपती यामध्ये सहभागी होते. 

रत्नागिरीमध्ये हलक्‍या सरी पडत होत्या. त्यामुळे गणेशभक्‍तांनाही दिलासा मिळाला होता; मात्र चिपळूण, संगमेश्‍वरात उलट परिस्थिती होती. सकाळपासून धो-धो पडणाऱ्या पावसाने गणेशभक्‍तांची पंचाईत केली होती. त्यामुळे मूर्तींवर प्लास्टिकचे आवरण टाकून गणेशभक्‍त भरपावसात श्रीगणेशाला घरी आणत होते. त्यातही उत्साहाचे वातावरण होते. दुपारी साडेबारापर्यंत श्री गणेशाची भक्‍तिभावाने प्रतिष्ठापना केली गेली. त्यानंतर घराघरांत "सुखकर्ता, दुःखहर्ता'चे सूर ऐकायला मिळत होते. सायंकाळच्या सुमारास शहरातील रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट होता. सकाळपासून फुललेली बाजारपेठही सुनी सुनी झाली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 ratnagiri ganesh ustav