Ganesh Festival : वास्तववादी घटनांवर आधारित देखावे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 September 2018

आवर्जून पाहावेत  असे देखावे
वीर हनुमान मित्र मंडळ - क्रांतियज्ञ 
शिवतेज मित्र मंडळ - गंगावतरण 
कस्तुरे चौक तरुण मंडळ - शिरस्ता शिवशाहीचा 
आपला तरुण मंडळ - वरसिद्ध भागवत जन्म
श्री मंगल क्‍लब मित्र मंडळ - तारकासुराचा वध

पुणे - दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार पेठ व गुरुवार पेठेतील गणेशोत्सव मंडळांनी ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक व वास्तववादी देखाव्यांवर भर दिला आहे. ‘मोबाईल गरज की व्यसन’, ‘शिवबांच्या अदालतीतील दूध भेसळखोर’, रेल्वे अपघातांवर आधारित ‘लाइफलाइन’ यांसारख्या देखाव्यांद्वारे समाजप्रबोधन करण्याचे काम मंडळांनी केले आहे. काही मंडळांनी जिवंत देखाव्यांवर भर दिला आहे.

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही वैविध्यपूर्ण जिवंत देखाव्यावर भर दिला आहे. लोहमार्ग ओलांडताना होणारे अपघात, रेल्वे/लोकलवर स्टंटबाजी करताना जीव गमवावा लागणे, या संवेदनशील विषयावर मंडळाने ‘लाइफलाइन’ हा वैशिष्ट्यपूर्ण जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाचे कार्यकर्तेच देखाव्यातील कलाकार आहेत.

श्री सुंदर गणपती तरुण मंडळाने ‘टू बी ऑर नॉट टू बी’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. मोबाईल, सिगारेट व दारू या तिन्हींच्या व्यसनामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याचे वास्तववादी चित्रण मंडळाने मांडले आहे. 

महाराष्ट्र तरुण मंडळाने ‘शिवबांच्या अदालतीतील दूध भेसळखोर’ या अन्नपदार्थांच्या भेसळीवर आधारित संवेदनशील जिवंत देखाव्याद्वारे मांडला आहे. 

शिवकाळामध्ये दूध भेसळ करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रशासन कशा पद्धतीने शिक्षा करत होते, हे सांगून सध्याच्या काळात या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

श्री गणेश आझाद हिंद मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट, श्री तांबडी जोगेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बाल विकास मंडळ, त्रिमूर्ती गणेश मंडळ, जगोबादादा वस्ताद तालीम या मंडळांनी गणेश महाल साकारला आहे. रणजित तरुण मंडळाने शिंदेशाही पगडी गणपती, खडक पोलिस लाइन गणेशोत्सव मंडळाने बालाजी मंदिर, शिवाजी चौक मित्र मंडळाने सोमनाथ मंदिराचा देखावा सादर केला आहे.

जय महाराष्ट्र तरुण मंडळ, जय बजरंग तरुण मंडळ, रणमर्द शिवाजी मंडळ, बाल साईनाथ मंडळ, बाल समाज हनुमान तरुण मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, शार्दूल मित्र मंडळ, वीर नेताजी तरुण मंडळ, झुंजार मित्र मंडळाने साधेपणाने गणेशोत्सवावर भर दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2018 budhwar peth gurwar peth ganpati decoration