ठाण्यात डीजेचा आवाज वाढलेलाच!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

ठाणे - उच्च न्यायालयाने डीजे आणि लाऊड स्पीकरच्या वापरावर विसर्जन मिरवणुकीत बंदी कायम ठेवली असतानाही ठाण्यात काही ठिकाणी डीजेचा वापर करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचे दिसले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणांवर आवाजाची मर्यादा ओलांडली गेली. त्या ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्‍न पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान, डीजे आणि मोठा आवाज करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम ठेवली आहे. या बंदीचे ठाण्यात काही मंडळांनी स्वागत करून डीजेचा वापर टाळला, तर काही मंडळांनी मात्र उच्च न्यायालयाच्या नियमांचे पोलिसांदेखतच उल्लंघन केले. ठाण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच, राम मारुती रोड, गोखले रोड, घोडबंदर, कॅडबरी जंक्‍शन, नौपाडा या भागात आवाजाची पातळी ही थेट १०० डेसिबलपर्यंत पोहचली होती. रुग्णालय परिसरात दणदणाट झाल्याने त्याचा फटका रुग्णांना बसला. पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही कारवाई न झाल्याने पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला. 

विसर्जन मिरवणुकीत अनेक ठिकाणी डीजे वाजले. हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर झाला. पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे होते; मात्र आता वेळकाढू भूमिका घेतली जाईल. 
- डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते 

अहवालानंतर कारवाई
एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आवाजाची पातळी वाढत असल्यास संबंधित आयोजकांवर कारवाई करून त्याच क्षणी डीजे जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना असतानाही पोलिसांकडून मात्र ही कारवाई होत नाही, असा आरोप होत असताना आम्ही आवाजाचे मोज-माप घेतले असून, ते प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाई करणे शक्‍य होईल, असे ठाणे पोलिसांचे म्हणणे आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2018 DJ voice increased in Thane