Ganesh Festival : बाप्पाचे जल्लोषी स्वागत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

पिंपरी - ब्रह्मवृंदांकडून होणारे मंत्रोच्चार, धूप आणि सुगंधीत अगरबत्तींचा दरवळ, ढोल-ताशांचा दणदणाट अशा मंगलमय वातावरणात गुरुवारी (ता. १३) सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात झाली. काही गणेश मंडळांनी दुपारी दीडपर्यंतचा मुहूर्त साधून ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली. मात्र, बहुतांश मंडळांनी मिरवणुका काढून सायंकाळी प्रतिष्ठापना केली. 

पिंपरी - ब्रह्मवृंदांकडून होणारे मंत्रोच्चार, धूप आणि सुगंधीत अगरबत्तींचा दरवळ, ढोल-ताशांचा दणदणाट अशा मंगलमय वातावरणात गुरुवारी (ता. १३) सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात झाली. काही गणेश मंडळांनी दुपारी दीडपर्यंतचा मुहूर्त साधून ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली. मात्र, बहुतांश मंडळांनी मिरवणुका काढून सायंकाळी प्रतिष्ठापना केली. 

चिंचवड येथील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्या श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना कीर्तनकार महावीर महाराज सूर्यवंशी यांच्या हस्ते झाली. मकरंद तात्या बेलसरे यांनी पौराहित्य केले. मंडळाचे सल्लागार भाऊसाहेब भोईर, दत्तात्रेय भोंडवे, मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, शासकीय लेखापरीक्षक विजय भोईटे आदी उपस्थित होते. प्रतिष्ठापनेची तयारी ज्ञानोबा जाधव यांनी केली होती. एसकेएफ गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना एसकेएफ युनियनचे माजी अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांच्या हस्ते झाली. मंडळाने अक्कलकोट ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज यांच्यावर आधारित जिवंत देखावा सादर केला आहे. उत्सव कालावधीत भजन, प्रवचन, महाआरती, सत्यनारायण महापूजा आदी कार्यक्रम होणार आहेत. केरळ पूरग्रस्तांसाठी मंडळाने अकरा हजारांची मदत केली. मंडळाचे अध्यक्ष हेमंत गाडे, देवेंद्र घोडके, मच्छिंद्र भोईर, सुहास शाह, रोहित कांचन आदी उपस्थित होते.

नेहरुनगर येथील क्रांती यूथ मंडळ ट्रस्टने ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढली. आकर्षकपणे रथ सजवून ‘श्रीं’ची मूर्ती विराजमान केलेली होती. ढोल-ताशा पथकात मुलींचा मोठा सहभाग होता. चिंचवडमधील नवतरुण मंडळानेही ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली. स्वराज्य आणि आरंभ ढोल-ताशा पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. आकुर्डीतील तरुण मित्र मंडळ सद्‌भावना प्रतिष्ठानने मिरवणूक न काढता भक्तीमय वातावरणात ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली. चिंचवड येथील अखिल मंडई मित्र मंडळाने मावळातील ढोल-ताशा पथक आणले होते. गांधीपेठमार्गे मिरवणूक काढून सायंकाळी त्यांनी प्रतिष्ठापना केली. पिंपरीतील लालबहाद्दूर शास्त्री भाजी मंडई संघटनेने बाजारपेठेतून ‘श्रीं’ची मिरवणूक काढली. ईगल मित्र मंडळाने पिंपरी गावातून मिरवणूक काढून ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली. अमरदीप तरुण मंडळाच्या मिरवणुकीत नंदादीप ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival celebration in pimpri