Ganesh Festival : गणेशोत्सव, मोहरमला सलोख्याचे तोरण

सुधाकर काशीद
Thursday, 13 September 2018

कोल्हापूर आणि परिसर म्हणजे सामाजिक सलोख्याचा प्रदेशच! नाना जाती-धर्माचे लोक इथे एकत्रित सण-समारंभ साजरे करतात. गुण्यागोविंदाने नांदतात. ऐक्‍याचे बंध घट्ट करतात. या थोर आणि उदार परंपरेचा मागोवा आम्ही गणेशोत्सव व मोहरमच्या निमित्ताने ‘बंध सलोख्याचे’ या विशेष मालिकेच्या माध्यमातून घेत आहोत...

कोल्हापूर - शहरातील बहुतेक तालमींमध्ये मोहरमच्या पंजाची प्रतिष्ठापना झाली. आता आज (ता. १३) श्री गणेशाचीही प्रतिष्ठापना होत आहे. एकावेळी एका मंडपात किंवा एका आवारात श्री गणेश व मोहरमच्या पंजाची एकाच श्रद्धेने प्रतिष्ठापना होण्याचा हा क्षण ३२ वर्षांनंतर आला. त्यामुळे या वर्षीचा गणेशोत्सव व मोहरमच्या सोहळ्याला सामाजिक सलोख्याच्या सोहळ्याची आगळी किनार लाभली आहे आणि या दोन सोहळ्यांच्या एकत्रित आनंदी वातावरणाचा माहोल पुढील दहा दिवस सर्वत्र असेल. कोल्हापूर शहरात किमान ८२ तालमींमध्ये मोहरम व गणेशोत्सव एकत्रित आहे. 

या साऱ्या एकत्रित सोहळ्याचा केंद्रबिंदू बाबूजमाल तालीम असणार आहे. कारण मोहरममधील सर्वांत मानाचा पंजा बाबूजमालमध्ये असतो. आज त्याची प्रतिष्ठापना झाली आणि उद्या दुपारपर्यंत या पंजाच्या शेजारीच श्री गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. हिंदू व मुस्लिम धर्मीय दोघेही धर्माच्या भिंती बाजूला सारून या दोन्ही सणांमध्ये सहभागी होणार आहेत.बाबूजमाल दर्गा हे जसे धार्मिक स्थान आहे, तसे मल्लविद्येचे केंद्र आहे.

या तालमीत स्वातंत्र्यपूर्व काळात पंजाब, कराची येथील नामवंत मल्ल येऊन राहिले. त्यांनी येथील मातीत कुस्तीचा सराव केला. शाहू खासबाग मैदानातील कुस्तीची दंगल गाजवली. या तालमीशेजारी जीवबानाना जाधव या सरदारांचा मोठा वाडा होता. वाड्याचा दिंडी दरवाजा, पहिल्या मजल्यावर असलेल्या सलग खिडक्‍या, सज्जे यांमुळे हा वाडा लक्षवेधी होता. या वाड्यात पहिल्यांदा बाबूजमालमधील नाल्या हैदर पंजाची प्रतिष्ठापना होत होती. काही वर्षांनंतर त्याला सार्वजनिक स्वरूप आले व या पंजाची प्रतिष्ठापना बाबूजमाल तालमीच्या हॉलमध्ये करण्यास सुरवात झाली. जीवबानाना जाधवांच्या वाड्यातील पंजा सार्वजनिक ठिकाणी आला आणि कोल्हापूरच्या मोहरमचा मानबिंदूच होऊन गेला. 

यंदा तर या पंजाच्या शेजारीच श्री गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे ३२ वर्षांनंतर आलेल्या या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गर्दीच उसळेल. ही एकत्रित गर्दी हिंदू-मुस्लिम हा फरकच पुसून टाकणार आहे. या सोहळ्याचे वैशिष्ट्य असे, की गणेशोत्सव व मोहरम साजरा करताना दोन्ही धार्मिक विधींचे पालन काटेकोरपणे केले जाते. एकमेकांच्या सोयीसाठी एक-दोन पावले मागे-पुढेही येण्याची तयारी असते.

दोन वर्षांपूर्वी अंबाबाईच्या नगरप्रदक्षिणा सोहळ्यावेळीच या नाल्या हैदर पंजाची मिरवणूक होती. मोठ्या थाटामाटात ही मिरवूणक निघाली. योगायोगाने अंबाबाईचा रथ व नाल्या हैदर पंजा एकाचवेळी भवानी मंडपात येणार होते. अशावेळी कोण पुढे, कोण मागे हा मुद्दा एखादा प्रतिष्ठेचा करू शकला असता. पण, अंबाबाई मूळ कोल्हापूरचे दैवत म्हणून नाल्या हैदर पंजा काही वेळ बाजूला थांबवून भवानी मंडपात जाण्याचा मान अंबाबाईच्या रथाला देण्यात आला. यातून खूप चांगला संदेश सर्वत्र गेला. 
या वर्षीही मोहरमचे पंजे भेटीला सुटणार आहेत. त्याच काळात गणेशोत्सवातील देखावे व रोषणाई पाहण्यासाठी सारे शहर रस्त्यावर येणार आहे. त्यामुळेच गणेशोत्सव व मोहरमची रात्र खऱ्या अर्थाने एका वेगळ्या सलोख्यानेच उजळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Moharam integration special